सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ पोकळी… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
गराजचं शटर रिमोटने अलगद उघडलं. आणि अमिताने तिची पिवळी पोरशे कार गराज मध्ये आणली. शटर बंद झाले आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं. आयलँडवर बराच पसारा पडला होता. सिंकमध्ये भांडी साचली होती. काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे. सिरॅमिक बोलमध्ये ब्रुनोचे चिकन ड्रुल्स पडले होते. ते तिने पाहिले आणि क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला. तिने घटाघटा पाणी प्यायले आणि काऊचवर जाऊन ती बसली. एसीचं तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती. खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसही वाटत होतं. एकाच वेळी आतून खूप रिकामं, पोकळ वाटत होतं. काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं.
मोबाईल व्हायब्रेटरवर होता. तिने पाहिलं तर जॉर्जचा फोन होता.
” हॅलो ! जॉर्ज मी आज येत नाही. ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर.”
” ओके. टेक केअर ” इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.
अमिता डेक वर आली. कल्डीसॅक वरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पिट्सबर्ग मध्ये नुकताच फॉल सीजन सुरू झाला होता. मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले होते. पिवळ्या, ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होती. पण अजून काही दिवसच. नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे. कोपऱ्यात साचून राहील. वृक्ष मात्र निष्पर्ण, बोडके होतील. आणि संपूर्ण विंटरमध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील. सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील. अमिताला सहज वाटलं, ” निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साध्यर्म आहे.
या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या प्रवाहात जाणवते आहे.”
हर्षलला फोन करावा का? नको. तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता, ” बी ब्रेव्ह अमिता खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं. पण आज शक्य नाही. आमचा लंडनचा बॉस येणार आहे.”
पण अमिता जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही. त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे.
अमिता त्याला इतकंच म्हणाली होती,” इट्स ओके. मी मॅनेज करेन.” आणि तिने छातीवर दगड ठेऊन सारं काही पार पडलं होतं.
विभाला फोन करावा का असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. पण तो विचार तिने झटकला. विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं. तिला एकटीलाच राहायचं होतं. निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठिण,दु:खद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता. निदान आता तरी.
संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन. तान्या, रिया.
“ब्रूनो आता नाही” हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करत होती. सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यांवर.
अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रूनोला चालायचीच नाही. अशावेळी तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा. एक अबोल, मुका जीव पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा. त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा. इतकच नव्हे तर साऱ्या ताण-तणावावरती त्याचं बागडणं, इकडे तिकडे धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरेपीच असायची.
ब्रुनोची आयुष्यातली वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं. क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या काय कमी झाल्या का? झाल्याच की. कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली. काही दूर गेली. काही तुटली. त्या त्या वेळी खूप दुःख झाले.. पण या संवेदनांची त्या संवेदनांशी तुलनाच होऊ शकत नाही.
घरात तसा कुठे कुठे ब्रूनोचा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेकवर,पॅटीओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आत्ता दिसत होतं. मागच्या विंटरमध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर घालून आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला ! या क्षणीही अमिताला त्या आठवणीने हसू आलं.
कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही. मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा. नाकानेच फुसफुस करून, गळ्यातून कू कू आवाज काढायचा. लाडीगोडी लावायचा. टी— काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करत होता. तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं की नेबरने फोन केला,” नाईन इलेव्हन ला बोलावू का?”
नाईन इलेव्हन म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा. त्यावेळी क्षणभर अमिताला वाटले की भारतीयच बरे. उठसुट असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड माया ही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही. पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशीचे वेगळे आणि परदेशातले वेगळेच.
तसे ब्रूनोचे आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते? अवघे दहा वर्षाचे असेल. असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता.
शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची. एकटीच असायची. तिचा हा ब्रुनो. तेव्हा लहान होता. पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रूनोला न्यायचं नव्हतं कारण तिथलं हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं. गंमत म्हणजे रिया,तान्या येता जाता त्या चिनी बाई बरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचे फारच लाड करायच्या. परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती. हाच धागा पकडून तिने अमिताला,” ब्रूनोला ऍडॉप्ट कराल का?” असा प्रश्न टाकला.
रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे हे सगळेच डॉग लवर्स. त्यांची तर मज्जाच झाली. आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळाभोर, मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ, पण उंच ब्रुनो घरी आला आणि घरचाच झाला.आणि सारे जीवन रंगच बदलले.
चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले. त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोसच्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा , त्याचे ग्रुमिंग या सर्वांविषयी तिने इत्थंभूत माहिती कळवली. शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शाम्पू ,साबण ,नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती दिली
अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी जे जे हवं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्ट मध्ये जाऊन आणलंही. पॅटीओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं.
सुरुवातीला तो थोडा बिचकला. गोल गोल फिरत राहायचा. कदाचित होमसिक झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला. परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला. त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळंच भावविश्व सर्वांचच तयार झालं.
“ब्रूनो जेवला का?”
“ब्रुनोला फिरवून आणलं का?”
“आज त्याला आंघोळ घालायची का?”
“आज का बरं हा खात पीत नाही? काही दुखत असेल का याचं?”
असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे. हाच त्यांचा दिनक्रम बनला.
सुरुवातीला चिनी बाईच्या विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या. तिलाही ब्रुनोची आठवण यायची. करमायचं नाही. रिया,तान्याला तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रूनोला परत तर नाही ना मागणार ?
पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈