डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ फुंकर… भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
वर्षभर आजारी आणि अंथरुणाला खिळलेले आबा अखेर देवाघरी गेले. रीतीप्रमाणे चार लोक येऊन सांत्वन करून, चार गोष्टी सांगून गेले आणि घरात माई अगदी एकट्या पडल्या. त्यांना सगळं मागचं आठवलं. नंदिनी तिकडे दूर परदेशात ! आणि अरुणला तेव्हा आबांचं प्रेम कधीच नव्हतं. त्यांचा अतिशय शीघ्रकोपी स्वभाव, आणि दुसऱ्याला सतत मूर्खात काढायची वृत्ती. त्यामुळे माणसे कधीच जोडली गेली नाहीत. नोकरीत खपून गेलं, पण एकदा रिटायर झाल्यावर कोण ऐकून घेणार ! आबांची हुशारीही दुर्दैवाने अरुणकडे आली नाही. तो वारसा मात्र नंदिनीला मिळाला आणि अतिशय तल्लख बुद्धी घेऊन आलेली नंदिनी डॉक्टर झाली आणि आपल्याच वर्गमित्राशी लग्न करून परदेशात गेली ती कायमचीच. माई आबा अगदी कौतुकाने दोनचार वेळा तिच्याकडे जाऊनही आले. पण मग पुढेपुढे त्यांना तो प्रवास, ती थंडी झेपेना. जमेल तशी नंदिनी येत राहिली पण तिचंही येणं हळूहळू कमीच होत गेलं. आबांनी हरप्रयत्न करूनही अरुण जेमतेम बी.कॉम. झाला आणि पुढे मला शिकायचं नाही यावर ठाम राहिला. खूप वशिले आणि ओळखी काढून आबांनी अरुणला खाजगी नोकरीत चिकटवून दिला. निर्विकारपणे अरुण ती नोकरी करू लागला. ना कसली जिद्द,ना कसली पुढे जाण्याची इच्छा! माईना अरुणचं काही वेळा वाईट वाटे. लहानपणी अरुण चांगला हुशार होता शाळेत. बोलका, खेळात भाग घेणारा,अभ्यासातसुद्धा चांगले असत मार्क्स त्याला. पण नंदिनी शाळेत गेली आणि त्याच्यापेक्षा तीन वर्षानी लहान असूनही अभ्यास, खेळ , वक्तृत्व सर्व गोष्टीत चमकू लागली तेव्हा शाळेत आपोआप अरूणची तुलना तिच्याशी होऊ लागली आणि घरीही आबा सतत त्याला तुच्छ वागवू लागले. अरुण अबोल झाला मनाने खचूनच गेला आणि पहिल्या दहा नंबरात असणारा अरुण पार शेवटच्या नंबरात जायला लागला. माईंनी खूप प्रयत्न केले, त्याला शिकवणी लावली, पण त्याची घसरण थांबलीच नाही. हसरा आनंदी अरुण अबोल घुमा झाला आणि त्याला जबर इन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स आला. दिवसदिवस त्याचा आबांशी संवाद होत नसे आणि माईंशी मात्र तो जरा तरी खुलेपणाने बोलत असे. नंदिनीनेही कधीही अरुणला विश्वासात घेतले नाही, की त्याच्यावर प्रेम केले नाही. त्या दोघा भावंडात अजिबात ओढ प्रेम काहीही नव्हते कधीही. नंदिनी भावाच्या सदैव वरचढच राहिली. माईना हे समजत होते पण त्या काही करू शकायच्या नाहीत. उलट काही सांगायला गेलं तर नंदिनी म्हणायची, “दादा अगदी मंद आहे माई ! शाळेत सुद्धा नुसता शेवटच्या बाकावर बसलेला असतो. बाई मलाच म्हणतात,जरा शिकव तुझ्या दादाला.लाज वाटतेअगदी ! असा कसा ग हा.” माई हताश व्हायच्या पण दोन्ही मुलं आपलीच ! शिकवणी लावली म्हणून तो निदान बरे मार्क्स मिळवू लागला. नंदिनी लग्न करून गेल्यावर अरुणला उलट हायसेच वाटले. जरातरी तो घरात माईंशी बोलायला मन मोकळं करायला लागला. माई आता त्याच्या लग्नाचा विचार करायला लागल्या. आबा कुत्सितपणे म्हणाले, “ कोण देणार याला मुलगी ? एवढ्याश्या पगारात भागणार आहे का दोघांचे तरी? मग मात्र माई संतापल्या.“ तुम्ही कधी त्याला आपले म्हणालात? सतत त्या नंदिनीचा उदोउदो ! अहो, स्वभाव बघा की त्याचा. किती चांगला आहे अरुण आपला. त्याचे गुण, मदत करायची वृत्ती, गरीब, समंजसपणा दिसत नाही का तुम्हाला? आहे ना त्याला घरदार ! भरेल हो पोट आपलं आणि बायकोचं. तुम्ही नका करु बरं काळजी..असेल त्याच्या नशिबात ती नक्की येईल समोर. इतकाही कमी पगार नाही त्याला. तो सांगत नाही तुम्हाला कधी ,पण मागच्या महिन्यातच पगारवाढ झाली आणि सुपरवायझर झाला माझा अरुण.” ‘माईंच्या डोळ्यात पाणी आलं. ……त्या दिवशी सहज म्हणून जुन्या वाड्यातल्या कुसुमताई माईंकडे भेटायला आल्या. “ छान आहे हो फ्लॅट माई ! मी प्रथमच येतेय ना इतक्या वर्षांनी.” मग नंदिनीची, तिच्या मुलांची चौकशी करून झाली आणि म्हणाल्या, “ अरुणचं कसं चाललंय? किती पगार आहे त्याला? “ माईंनी सांगितल्यावर म्हणाल्या
“चांगला आहे की मग ! लग्न करताय का? आहे एक मुलगी. पण आईबाप गरीब आहेत हो ! मुलगी खरोखर चांगली आहे बघा, पण पैसा नाही म्हणून लग्न रखडलंय. मुलगी लाख आहे, पण लग्नात काही मिळणार नाही. घेता का करून? बघा बाई.हवी तर घेऊन येते उद्या. अरुण, आबा, तुम्ही बघा भेटा तिला “ माई हरखून गेल्या. “ कुसुमताई,आणा तिला उद्याच.बघू या. काय योग असतील तसं होईल बघा. “
दुसऱ्या दिवशी कुसुमताई जाईला घेऊन आल्या. काळीसावळी पण तरतरीत जाई त्यांना बघता क्षणीच आवडली. किती चटपटीत होती मुलगी. साधीसुधी साडी होती अंगावर पण नीट नेसलेली आणि छान गजरा मोठ्या लांब डौलदार शेपट्यावर. म्हणाली, “ मला खूप शिकायचं होतं हो, पण ऐपत नाही माझ्या आईवडिलांची ! मग मी डी.एड. केलं आणि मला शाळेत नोकरी आहे. इतका इतका पगार आहे मला.मी नोकरी केलेली चालणार आहे ना तुम्हाला? “ अरुणला जाई आवडलीच. माईंनाही जाई पसंत पडली. आबा म्हणाले, “ छान आहे मुलगी. ती हो म्हणू दे आपल्या चिरंजीवांना म्हणजे झालं ! “
जाईचा होकार आला आणि तिच्या आईवडिलांनी साधंसुधं लग्न करून दिलं. जाई माप ओलांडून घरात आली. जाई घरात आली आणि माईंचं घर चैतन्याने भरून गेलं. कधी नव्हे ते आबा स्वयंपाकघरात बसून चहा घेत अरुण माईंशी बोलू लागले.माई माई करत जाई सतत त्यांच्या मागे असायची. शाळेत जायच्या आधी ती सगळा स्वयंपाक उरकून जायची. ‘तुम्ही फक्त कुकर लावा माई, मी डबे भरलेत आमचे दोघांचे !’ माईंचा हात हलका झाला जाईमुळे. रोज शाळेतून आली की शाळेतल्या गमती ऐकताना आबासुद्धा त्यात भाग घेऊ लागले. अरुणमध्ये आमूलाग्र बदल झाला जाईमुळे. मुळात तो हुशार होताच पण जी काजळी त्याच्या व्यक्तिमत्वावर बसली होती ती जाईने झटकून टाकली.
गोड बोलून तिनं त्याला त्याच्या फॅक्टरीत पुढच्या परीक्षा द्यायला लावल्या. माईना हा बदल अतिशय आवडला. हसतमुख जाई कधी दोन दिवस माहेरी गेली तर करमायचे नाही माईंना. तिच्या गरीब, साध्यासुध्या माहेरघरी किती अदबीने स्वागत होई माई अरुण आणि आबांचे ! तिची सुगरण आई छान पदार्थ आवर्जून पाठवी अरुणरावांनाआवडतात म्हणून. आपली गुणी मुलगी या श्रीमंत घरात पडली म्हणून कौतुकच वाटायचे तिच्या आईवडिलांना माईंचे. जरी अरुण आबांच्या दृष्टीने कमी होता तरी जाईच्या माहेरी त्याची पत चांगलीच होती. त्यांना त्याचा पगार खूपच वाटायचा. जाई सासरी रमून गेली आणि अरुण माईंचं तर पान हलेना जाई शिवाय.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈