श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ मानिनी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(हात पिवळे करून कुन्या रामचंद्राच्या हातात सोपवून धुमधडाक्यात तुझं लग्न करून दिईन म्हनलं. पन न्हाई. दिसभर बापाची आठवन काढत रडत बसलीया. तुम्हीच सांगा हिला काईतरी.”) – इथून पुढे —-
“राधाक्का, नवरा जरी राम असला तरी त्या मृण्मयी असलेल्या सीतेच्या नशीबीसुद्धा वनवास आलाच होता ना? त्या सीतेला वाल्मिकी मुनींच्या आश्रमात तरी आश्रय मिळाला होता. हिला कोण आहे? बिचारी बापाविना पोर….” मी नकळत बोलून गेलो, त्यासरशी मृण्मयीचे डोळे पुन्हा भरून आले. आईच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं मनसोक्त रडून घेतले. पटकन डोळ्यांतले अश्रू पुसत ती म्हणाली, “सर, मला लग्नाच्या आधी स्वावलंबी व्हायचं आहे. शिकून मोठं व्हायचं आहे. त्यानंतर माझ्या आईसकट मला स्वीकारणारा राम भेटला तरच मी लग्न करेन. तोपर्यंत लग्नाचा विचारही करणार नाही. मला नुसतं पदवीधर व्हायचं नाहीये. मला डॉक्टर व्हायचं आहे. आता तूर्त मला मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी प्रशांत सरांचा कोचिंग क्लास लावायचा आहे. सांगा हिला. मी प्रवेश परीक्षेत मेरिटमध्ये आले नाही तर ती सांगेल ते करीन हा माझा शब्द आहे.”
“सायेब, एकीकडे कर्जाचे हप्ते भरतेच आहे. कोचिंग क्लासची फी कुठनं भरू सांगा?”
“राधाक्का, तुमची लाडकी लेक बोर्डात मेरिटमध्ये पास झालीय. तिला तिचा मार्ग शोधू द्या. कोचिंग क्लासच्या फीची तुम्ही काळजी करू नका. मी प्रशांत सरांशी बोलतो. माझं ऐका. तिला आता फक्त क्लासला जाऊ द्या. नंतर काय करायचं ते आपण नंतर ठरवू या.” असं म्हणत मी मृण्मयीच्या हातात पुष्पगुच्छ ठेवला आणि पेढ्यांचा बॉक्सही दिला.
मृण्मयी पटकन उठली आणि मला नमस्कार करायला आली. मी म्हटलं, “घरी जा, देवापुढे दिवा लावून पेढ्यांचा बॉक्स ठेव आणि त्याचे आशिर्वाद घे. काळजी करू नकोस, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल.”
ते दोघे बाहेर पडताच मी प्रशांतला फोन लावला. फोन उचलताच “साहेब, या महिन्याचा कर्जाचा हप्ता आला नाही काय? हाऊसिंग लोन की कार लोन? तुमचा फोन आलाय म्हणून विचारतोय.” प्रशांतनं विचारलं. त्यावर मी हसतच म्हटलं, “अरे काही खात्यांची मी काळजीच करत नसतो, त्यात तुझी कर्जखातीदेखील आहेत. बरं ते जाऊ दे, मी तुला दुसऱ्याच कामासाठी फोन करतोय असं म्हणून मृण्मयीविषयी त्याला सांगितलं. फी मध्ये किती कन्सेशन देता येईल ते सांग.”
क्षणभर थांबून तो म्हणाला, “साहेब, ती मुलगी तुमच्या नात्यातली ना गोत्यातली. तिच्या शिक्षणासाठी तुम्ही इतक्या आपुलकीने आस्था दाखवता आहात तर, मलासुद्धा काहीतरी करायला हवं ना? मग माझ्याकडून शंभर टक्के कन्सेशन. तिला प्रवेश फी म्हणून फक्त पाचशे रूपये भरायला सांगा. आणि हो, ती मेरिटमधे आली तर माझे शंभर टक्के वसूल झाल्यासारखेच ना !” असं म्हणत त्याने आपली व्यावसायिकता शाबित असल्याचं सिद्ध केलं.
मृण्मयीची जिद्द कामी आली. ती प्रवेश परीक्षेत मेरिटमधे आली. फ्लॅट बॅंकेकडे तारण होताच. गवर्नमेंट मेडिकलला अॅडमिशन मिळताच तिचं शैक्षणिक कर्ज मंजूर झालं. मृण्मयीवर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
एका शनिवारी संध्याकाळी तिच्या समाजबांधवांच्याकडून तिचा भव्य सत्कार होता. कार्यक्रमाला मलाही निमंत्रण देण्यासाठी मृण्मयीनं सुचवलं असावं. दोघे संयोजक निमंत्रण देण्यासाठी स्वत: बॅंकेत आले. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता घट्ट पाय रोवून उभे राहतात त्यांच्याविषयी मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे.
मी कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहोचलो. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हार आणि पुष्पगुच्छ देऊन मृण्मयीचा सत्कार करण्यात आला. आपल्या समाजातील एक कन्या स्वत:च्या हिंमतीवर घवघवीत यश मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवते ह्याचा समाजबांधवांना कोण कौतुक वाटत होते. प्रत्येकजण आपल्या छोटेखानी भाषणात मृण्मयीवर कौतुकाचे गुलाबपाणी मनसोक्तपणे शिंपडत होता.
शेवटी समाजाचे अध्यक्ष उभे ठाकले. बोलता बोलता ते म्हणाले, ‘आपल्या मुली शिकून पुढे जायला पाहिजेत. एका चहा-टपरी चालवणाऱ्याची कन्या असूनदेखील मृण्मयीने जे यश मिळवले आहे, ते यश म्हणजे आपल्या समाजासाठी भूषणावह आहे. मी माझ्याकडून तिला पाच हजार रूपयांची मदत जाहीर करतो आहे. इतर समाजबांधवांना देखील मी मदतीचे आवाहन करतोय. मदत करणार आहात ना?’ असं म्हणताच सभेतल्या कित्येकांचे होकारार्थी हात उंचावले गेले.
सत्काराचं उत्तर देण्यासाठी मृण्मयी उभी राहिली. “माझ्या शाळेत, कॉलेजात सत्कार झाले. परंतु आपल्या समाजबांधवांकडून मायेपोटी, अभिमानापोटी झालेला हा घरचा सत्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. आताच आपल्या अध्यक्ष महोदयांनी माझा उल्लेख चहा-टपरी चालवणाऱ्याची कन्या असा केला. मला त्यात किंचितही कमीपणा वाटला नाही हे मी आधीच नमूद करते. मुळात प्रामाणिकपणे करता येणाऱ्या कुठल्याही व्यवसायाला कमी लेखताच कामा नये. त्याच व्यवसायावर माझे वडील आजन्म स्वाभिमाने जगले. माझ्या पित्याच्या माघारी माझी आईदेखील तीच टपरी त्याच जोमाने चालवून मला शिकवते आहे. या प्रसंगी अध्यक्ष महोदयांनी माझ्यासाठी मदत तर जाहीर केलीच आहे तसंच तुम्हा सर्वांना सहृदयपणे मदतीचे आवाहन केले आहे. मी आपणा सर्वांना नम्रपणे सांगू इच्छिते की मला फक्त तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि सदिच्छा हव्या आहेत. माझ्या स्वर्गीय पित्याला आणि माझ्या आईलादेखील मी असं कुणाच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेलं आवडणार नाही. माझ्या आईबाबांच्या विश्वासार्हतेमुळे म्हणा, आणि मी उत्तम मार्काने पास झाल्याने बॅंकेने मला शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे, ते पुरेसे आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्हाला शक्य असेल तर, प्राप्त परिस्थितीमुळे व्यवसायात कोलमडून पडलेल्या आपल्या एखाद्या समाजबांधवाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी मदत करा, त्यामुळे त्याचे एक अख्खे कुटुंब उभे राहिल. धन्यवाद !!”
कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. एका विनम्र, मृदुभाषिणी असलेल्या मृण्मयीचा मानिनी अवतार मला पहिल्यांदाच पाहायला मिळाला होता.
बेंगलुरूच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच आम्ही झपझप पावलं टाकत बोर्डिंग गेटकडे निघालो.
– समाप्त –
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈