श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ त्या दोघी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पहिले – कुणीतरी स्मिताचा मृतदेह बाजूच्या पोलीसांच्या खोलीत असल्याचे राजनला सांगितले. राजन सुलभाच्या हाताला धरून त्या खोलीत गेला. संपूर्ण झाकलेला तो देह आणि बाजूला बसलेले अभय, तेजश्रीला पाहून सुलभा ‘‘स्मिते’’ म्हणून जोरात किंचाळली आणि बेशुध्द झाली. आता इथून पुढे – )
आठ दिवसानंतर….
गेले आठ दिवस सुलभा पार्ल्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. गेल्या आठ दिवसात तिने अन्नाचा कण पोटात घेतला नव्हता. सलाईनमधून थोडंफार व्हिटामिन जात होतं तेवढंच. तिच्या अवतीभवती राजन, त्यांची मुलगी विनया, जावई बिपीन उभे होते. एक नर्स खास सुलभासाठी बाजूलाच होती. सुलभाला थोडावेळ शुध्द येत होती सर्वांकडे पाहता पाहता तिचे डोळे भरुन येत होते आणि ओठातून स्मितू, स्मितू असे हलकेच शब्द बाहेर पडत होते. विनया तिच्या तोंडात दूध घालू पाहते पण ती हाताने चमचा दूर लोटत होती. सर्वजण मोठ्या काळजीत होते. डॉक्टर्स म्हणत होते काहीतरी करा आणि त्यांच्या पोटात दूध, अन्न जाऊ द्या. विनयाने ठरविले आता गप्प बसून चालणार नाही. दुपारी बारा वाजता सुलभाने डोळे उघडले, ती आजूबाजूला बघत होती. पुन्हा तिचा चेहरा रडवेला झाला. तेव्हा विनया आईला म्हणाली –
‘‘आई, स्मितू मावशी गेली ती परत येणार नाही पण तुझं काय चाल्लयं ? तुला बाबांचा विचार आहे ना ? तू जगली नाहीस तर बाबांनी काय करायचं ? मला माझी नोकरी आहे, संसार आहे, त्यांना तुझ्याशिवाय कोण आहे? तू गेल्यावर त्यांनी पण विष घ्यायचं का ?’’
विनयाचं हे बोलण ऐकून सुलभा गप्प झाली. हळूच तिने नवर्याकडे पाहिलं. अर्ध्या तासाने तिने विनयाकडे दूध मागितलं. थोड्यावेळाने मोसंबी रस घेतला. दुसर्या दिवसापासून सुलभा सावरली. थोड थोड खाऊ लागली.
पंधरा दिवसानंतर विनया आईला म्हणाली, -‘‘आई स्मिता मावशीचे इन्शुरन्स, म्युच्युअल फंड डिटेल्स तुझ्याकडे असेल ना?’’
‘‘हो, तिच्या नोकरीतले फंड वगैरे सोडून, सर्व गुंतवणूक माझ्याकडेच आहे. खरं तर त्या दिवशी तिने आपली सर्व गुंतवणूक, इन्शुरन्स वगैरे पाहिलं, त्यावरील वारस वगैरे पाहिलं. मी तिला म्हटलं होत, ही विमा रक्कम तुझ्या पश्चात तुझ्या वारसांना मिळणार पण एवढ्यात नाही. पण मला काय माहित तिने एवढी कोटीच्यावर रक्कम नवर्याला, मुलीला ठेवून ती गेली. मी तिला म्हणत होते अग सर्वच पॉलिसी तुझ्या नावावर कशाला? ती म्हणायची, मला माझी खात्री वाटत नाही. मला काय माहित एवढ्यात स्मितू जाईल म्हणून.’’
‘‘ते जाऊदे आई, एकदा जाऊन आणि अभय काकाला आणि तेजूला भेटून त्यांच्या सर्व पॉलिसीज, फंड वगैरे देऊन येऊ या.’’
‘‘नाही तरी ती मंडळी त्याचीच वाट पाहत असतील. काही काम ना धंदा. आता या पैशावर मजा करा म्हणावं.’’
‘‘आई, दोघही तुझी चौकशी करत असतात.’’
‘‘या पैशासाठी करत असतील. तिच्याबद्दल कुठलं आलयं त्यांना प्रेम?’’
‘‘आई असं बोलू नकोस. शेवटी अभय काका तिचा नवरा होता आणि तेजश्रीला तिने जन्म दिला होता.’’
‘‘हो ग हो मला माहिती आहे म्हणूनच मी गप्प आहे. नाही तर….’’
‘‘आई, मी अभय काकाला विचारते मग आपण जाऊया.’’
‘‘पण विनया स्मितूनंतर त्या घराच काय झालं असेल ते मला पाहावणार नाही. ती नोकरी सांभाळून घरदार व्यवस्थित ठेवायची, यांना जमणार आहे का ते?’’
‘‘जर घर व्यवस्थित नसेल ना तर आपण दोघी त्यांच घर लावून देऊ. पण आता जायलाच हवं.’’
दोन दिवसांनी विनया आणि सुलभा गोरेगांवला स्मिताच्या घरी गेल्या. सुलभा मनात म्हणत होती, स्मितू नंतर घर अस्ताव्यस्त पडलं असेल, कचरा तरी काढतात की नाही कोण जाणे? खरं तर या दोघांची तोंड पाहू नयेत असं वाटतं, पण एकदा स्मिताची गुंतवणूक त्यांच्या ताब्यात द्यायची आणि संबंध संपवायचा.
दोन मजले चढून ती दोघं वर पोहोचली. तेजश्री वाटच पाहत होती. सुलभाने आत पाऊल टाकताच पहिल्यांदा स्मितूचा मोठ्ठा फोटो हार घातलेला दिसत होता. ती फोटोतली स्मितू हसत होती. कदाचित लग्नातील फोटो इनलार्ज केला असावा. सुलभाने हॉलमध्ये नजर टाकली सर्व काही व्यवस्थित होते. कोचवरच्या गाद्या, उश्या व्यवस्थित लावलेल्या होत्या. सुलभा गॅलरीत गेली तिला माहिती होते या ठिकाणी स्मिताची छोटी बाग आहे. तिथे नवीन झाडे आणि व्यवस्थित झाडांना पाणी घातलेले होते. सुलभा स्वयंपाकघरात शिरली. सर्व भांडी स्टँडवर व्यवस्थित अडकवलेली, गॅस शेगडी व्यवस्थित पुसलेली, ओटा धुतलेला. सुलभा घर बघत होती. तिच्या मागे विनया आणि तेजश्री येत होत्या. सुलभाने बेसीन पाहिलं, स्वच्छ होतं. वॉशिंग मशिनला व्यवस्थित कव्हर घातलेलं होतं. फ्रिज उघडून बघितला, भाजी, अंडी, फळ व्यवस्थित ठेवलेली होतं. बाथरुम उघडलं. स्वच्छ होतं, साबण वगैरे जागच्या जागी होतं.
‘‘कामाला कोण येत?’’ सुलभाने विचारलं.
‘कुणीच नाही. मावशी, सर्व मी आणि बाबाच करतो. ‘तेजश्री उद्गारली.’’
‘‘मग जेवण, भांडीकुंडी ?’’
‘‘जेवण चुकतमाकत करतो, अजून व्यवस्थित जमत नाही. पण जमेल. थोडफार पुस्तकात बघून, युट्युबवर बघून.’’
‘‘आणि बाजार, भाजी वगैरे?’’
‘‘ते बाबा आणतो.’’
‘‘मग स्पोर्टस् क्लबला केव्हा जातो ?’’
‘‘ते सोडलयं त्याने’’
‘‘का?’’
‘‘त्यात फारसे पैसे मिळत नाहीत. आणि सतत दौरे असतात बाहेरगावी आणि आता बाबाने जॉब घेतलाय. सोमवारपासून हजर होणार.’’
‘‘कुठे ?’’ विनयाने आणि सुलभाने एकदम विचारले.
‘‘ब्रोकर्स ऑफिसमध्ये, बाबाचं सीएस झालेलं त्यामुळे त्याला पटकन नोकरी मिळाली ती पण मालाडला, जवळचं आहे.’’
‘‘आणि तू काय करणार आहेस?’’
‘‘माझं आता कॉलेजचं शेवटचं वर्ष, ते पूर्ण करीन मग बघू. कदाचित बाबासारखं सीएस करेन.’’
एवढ्यात बाहेर गेलेला अभय आला. त्या दोघीना बघून खुश झाला. सुलभा किती वर्षांनी अभयला पाहत होती. मागे कधी यायची तेव्हा तो क्लबमध्ये गेलेला असायचा.
क्रमश: भाग ३
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈