☆ जीवनरंग ☆ बोध कथा – अविवेकिता ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा ९. अविवेकिता
कलिंगदेशात कोणी एक राजा होऊन गेला. त्याला एक धोबी वस्त्रे उत्तम प्रकारे धुवून देत असे. एक दिवस त्याने धुतलेली, ती निर्मळ सुंदर वस्त्रे पाहून राजा खूष झाला. तो राजा मनस्वी होता. त्याने धोब्याला बोलावून म्हटले, “तुझ्या या वस्त्र स्वच्छतेमुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.” राजाने वचन दिल्यावर धोब्याचा आनंद गगनात मावेना. तो उत्तरला, “ महाराज, मला आपला मंत्री होण्याची इच्छा आहे. तेव्हा आपण माझी मंत्रीपदी नियुक्ती करावी.”
राजाला ही मागणी अनपेक्षित होती. पण वचनपूर्ती करणे भाग होते. तेव्हा राजाने दीर्घकाळापासून मंत्रीपदी आरूढ असलेल्या मंत्र्याच्या जागी धोब्याला नियुक्त केले. काही काळानंतर या राजाचा नवा मंत्री मूर्ख व असमर्थ आहे हे जाणून राजाच्या शत्रूंनी सेनेसह राज्यावर आक्रमण केले. हे वृत्त कळताच राजाने मंत्र्याला बोलावून युद्धासाठी सेना सज्ज करण्याची आज्ञा दिली. त्यावर मंत्री बोलला, “भविष्यकाळाचा विचार करून मी पूर्वीच सगळी व्यवस्था केली आहे. म्हणून शत्रूपासून आपण भयभीत होऊ नये.” राजाने त्याच्या वचनावर विश्वास ठेवला.
मंत्र्यावरचा विश्वास राजाला भोवला. शत्रूच्या सेनेने नगराला पूर्ण वेढा घातला. परत राजाने मंत्र्याला पाचारण करून विचारले, “शत्रूच्या ह्या कृतीला उत्तर देण्यासाठी काय योजना आखली आहे ?” मंत्री राजाला म्हणाला, “महाराज, शत्रूंनी नगर बंदिस्त केले तरी आम्हाला काहीही भय नाही. या राज्याचे रक्षण व पालन करणे हे अत्यंत कष्टदायक कार्य आहे. या कष्टदायक कार्याचे कसे निवारण करता येईल याची मी चिंता करत असतानाच दैवयोगाने शत्रूने हे नगर बंदिस्त केले. राज्य रक्षणाचा आपल्यालाही खूप त्रास होतोय. मी ह्या नगरात चिरकाळपासून वस्त्रे धुण्याचा उद्योग करतोय. मंत्रीपद प्राप्त झाल्यावर मी तो उद्योग सोडला. आता पुनश्च तो उद्योग सुरू करून त्या प्राप्तीतील अर्धा वाटा आपल्याला देईन व उरलेला मी घेईन आणि सुखाने जगेन. ह्या उद्योगाचे मला काहीच कष्ट वाटत नाहीत. हा सर्व विचार करून युद्धासाठी मी काहीही सज्जता केली नाही.”
मंत्र्याचे हे वक्तव्य ऐकल्यावर अपात्र, अविवेकी व्यक्तीची अयोग्य जागी नियुक्ती केल्यामुळेच हे संकट ओढवले ह्या विचाराने राजाला खूप दुःख झाले.
तात्पर्य –अपात्र,अविवेकी व्यक्तीला उच्चपदी नियुक्त करू नये.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी