श्री मंगेश मधुकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ “क ट्ट प्पा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
शेठचं आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण झालं. आजोबांनी सुरु केलेला व्यवसाय नंतर वडील, स्वतः शेठ यांनी सचोटीने, मेहनतीने नावारूपाला आणला. पुढच्या पिढीने काळानुरूप बदल करून झळाळी आणली. पिढ्यानपिढ्याची मेहनत फळाला आली. दहा बाय दहाच्या जागेत सुरु केलेलं दुकान सत्तर वर्षानंतर भव्य तीन मजली झालं. शेठ आणि कुटुंबीय प्रचंड आनंदात होते. नवीन वास्तूचे उदघाटन दणक्यात करायचे यावर एकमत झाले, परंतु उदघाटनाला कोणाला बोलवायचं यावर खल सुरु होता. घरातले सगळेच उत्साहाने सहभागी होते.
“ कुठल्या तरी मोठ्या माणसाला बोलवू ”
“ फिल्मस्टार आला तर पब्लिसिटी चांगली मिळेल ”
“ हिरो नको,हिरोईनला बोलवा ”
“ नको,हे लोक लाखात पैसे घेतात. आपल्याला परवडणार नाही ”
“ माणूस फेमस पाहिजे.म्हणजे त्याच्या जोडीने आपल्या दुकानाची हवा होईल.”
“ असल्या पब्लिसिटीची गरज नाही. आपलं काम आणि नावं फार मोठंय ”
“ मग क्रिकेटर?”
“ नको,”
“ कोणालाही बोलवा. फक्त राजकारणी, नेते मंडळी अजिबात नको ”
“ मग राहिलं कोण?? ”
उदघाटनावरून चर्चा रंगली. घरातील लहान मुलांपासून–मोठ्यांपर्यंत सगळे हिरीरीने मत मांडत होते. प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय सुचवत होता.बराच वेळ होऊनही एकमत झालं नाही. शेठ मात्र शांत होते. निर्णय होत नव्हता म्हणून थोरल्यानं शेठना विचारलं.
” बापुजी,तुमचं मत !!”
“ कोणाला बोलवायचं तो तुमचा अधिकार. उदघाटन दिमाखात करा, पण पाहुण्यांसाठी उगाच फालतू पैसा खर्च करू नये असं माझं मत आहे ”
“ तुम्ही सुद्धा एक नाव सुचवा ”
“ नाही नको.”
“ का?? “
“ मी सुचवलेलं नाव आवडणार नाही ” .. शेठ.
“ आतातर सांगाच ” – सगळयांनी एकदम आग्रह केला.
“ सगळे चेष्टा कराल.त्यापेक्षा राहू दे ”–शेठ.
“ बापुजी, सस्पेन्स वाढवू नका. खात्रीने सांगते ते नाव वेगळं असणार ”
“ त्यामागे नक्कीच काहीतरी विचार असणार. तुम्ही सांगा.”
“ आप्पांच्या हस्ते उद्घाटन करावं ”–असं शेठ बोलल्यावर ते गंमत करताहेत असं वाटून सगळे मोठ्याने हसले.
“ आपला एवढा मोठा कार्यक्रम आणि तुम्ही ….”
“ काहीही काय?? ”
“ तेच ना, खरं नावं सांगा ”
“ मनापासून सांगतोय. गंमत नाही ” –शेठ
“ या नावाला माझा विरोध आहे ”
“ माझा बिनशर्त पाठींबा आहे ” –माई
“ आप्पांच्या हस्ते उद्घाटन, का? कशासाठी? ”
“ कितीही केलं तरी आप्पा आपले नोकर !!”
“ एक मिनिट,मान्य नसेल तर ठीक आहे. पण आप्पांविषयी काही बोलू नका ” – शेठचा आवाज वाढला. एकदम शांतता पसरली.
“ माफ करा. जरा आवाज चढला. पण आप्पांविषयी बरेच गैरसमज आहेत. आम्ही विनाकारण नोकर माणसाला मान देतो असं सगळ्यांनाच वाटतं.”
“ बापुजी,रागावू नका. पण आता विषय निघालाच तर स्पष्टच विचारतो. त्या आप्पांचे एवढे कौतुक?? ”
“ आप्पांविषयी तुम्ही जरा जास्तच भावूक आहात. पण दुकानात केलेल्या कामाचे आपण त्याना पैसे देतो. हा एक व्यवहार आहे. आपल्याकडे असे बरेचजण काम करतात. आप्पा अनेक वर्षापासून काम करतायेत हाच काय तो फरक. पण म्हणून मग ….” – शेठच्या दोन्ही मुलांनी नापसंती व्यक्त केली.
“ आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पहायचा नसतो. काही माणसं ही व्यवहारापलीकडची असतात. आप्पाविषयी सांगायचे तर माझ्या जन्माच्या आधीपासून ते दुकानात काम करतायेत. दुकान सुरु झाल्यावर सहा महिन्यातच गावाकडून आलेला एक अनाथ, गरीब, गरजू मुलगा कामाला लागला आणि नंतर दुकान हेच त्याचं आयुष्य झालं. एकोणसत्तर वर्ष आणि सहा महिने आप्पा या दुकानात काम करतायेत. डोळे झाकून विश्वास ठेवावा असा माणूस. प्रामाणिकपणाचा मापदंड, दुकानातली खडा न खडा माहिती. आपली चौथी पिढी दुकानात आलीय आणि अजूनही ऐंशी पार केलेले आप्पा दुकानात काम करतात.” – शेठ
“ हे भारी आहे. मला आप्पांना भेटायला आवडेल.” – शेठची नात.
“ लग्नानंतर आप्प्पांची ओळख सासऱ्यांनी घरातला माणूस म्हणून करून दिली. घरात आप्पांना कधीच नोकर म्हणून वागणूक दिली गेली नाही आणि आप्प्पांनीसुद्धा मान मिळाला म्हणून आपली मर्यादा ओलांडली नाही. आजही आपल्यापैकी लहानमोठा कोणी दुकानात गेले कि आप्पा उभे राहतात. हात जोडून नमस्कार करतात. वयाकडे न पाहता मालकांचा मान राखतात.” – माई
“ हे मी बघितलंय ”
“ मी सुद्धा हा अनुभव अनेकदा घेतलाय ”
“ आपलं दुकान म्हणजेच आप्पांचं आयुष्य. गावाकडून आले आणि इथलेच झाले. आजोबांनी एक खोली घेऊन दिली, त्याचे सगळे पैसे सुद्धा आप्पांनी फेडले. स्वतःविषयी कधीच बोलले नाहीत. अनेकदा विचारलं पण तेव्हा हसून उत्तर टाळलं. दुकानावर त्यांचा अतिशय जीव, दुकानाच्या बदलत्या रूपाचे आप्पा हे एकमेव आणि चालता बोलता साक्षीदार आहेत. त्यांच्याइतका योग्य माणूस दुसरा नाहीच म्हणूनच… .” शेठ एकदम बोलायचे थांबले. पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.
“ माझा आग्रह नाही. तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात.” – शेठ
“ उदघाटन आप्पांच्या हस्ते करायचे हे सर्वांना मान्य ” – माईंनी विचारताच आपसूक सगळ्यांचे हात वरती गेले.
“ आप्पांची ओळख कशी करून द्यायची? ”
“ बाहुबली सिनेमात महिष्मती साम्राज्यासाठी जसे कट्टप्पा तसे आमच्या दुकानासाठी आप्पा !!! ”
… थोडक्यात शेठनी समर्पक ओळख सांगितली तेव्हा सगळ्यांनी जल्लोष केला.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈