☆ तिचे माहेरपण आणि… भाग – १ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆
ऐनवेळी गोंधळ नको म्हणून त्याने एसटीची तिकिटे आधीच आरक्षित करून ठेवली होती. अगदी तिला आवडते तसे खिडकीतले तिकीट आणि अगदी पुढची जागा. त्याने सामान वरती लावले, तिला खिडकी उघडून दिली आणि खाली उतरला. बस निघेपर्यंत तिच्या सूचना चालूच होत्या आणि एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे आठवणीच्या वहीवर तिच्या सूचना नोंदवून घेत होता. बस स्थानकातून बाहेर पडली तशी त्याची पावले मागे वळाली.
ती तिच्या परीक्षेला गेली होती. पण खरी परीक्षा त्याचीच होती. माहेरच्या गावी परीक्षा केंद्र खालच्या सरकारने नव्हे तर वरच्या सरकारने ठरवून दिले होते. ” कधी नव्हे ते सणांव्यतिरिक्त माहेरी येणे होतेय, राहू देत की लेकीला चार दिवस “, सासूबाईंचा थेट त्याला फोन. पडत्या फळाची आज्ञा मानत, मी देखील,
“हो ना, तेवढाच मोकळा वेळ मिळेल तिला.”, असे म्हणत त्याने त्यांच्या होकारामध्ये होकार भरला.
“तुम्हाला काय जातंय होय म्हणायला, दोन लेकरं आहेत पोटाशी. त्यांचे कोण पाहणार? तुम्ही सकाळी जाणार कामावर, ते संध्याकाळी उजाडणार. आणि उजाडले तरी कोपऱ्यावर मित्र मंडळीत जाणार. माझी लेकरं राहायची उपाशी. त्यांना शाळेत सोडणार कोण – आणणार कोण, शंभर धंदे असतात माझ्यापाठी. आईला काय जातंय म्हणायला ‘ ये चार दिवस म्हणून ‘ .” तिने दांडपट्टा चालवला.
तिचे माहेरी राहणे बहुधा रद्द होते आहे पाहून तो आतून सुखावला. पण मग पट्ट्याची पट्टी झाली आणि तिही खाली उतरली. त्याचा आनंद काही फार काळ टिकला नाही.
“आईचेही बरोबर आहे म्हणा. सणवार सोडले तर एरवी कुठे तिच्याकडे जाणे होतेय. आणि सणवार म्हणजे पाहुण्यांची उठबस. बरं घरात दुसरं बाई माणूस नाही. भावाचं लग्न लावून दे म्हटले तर तो बसलाय तिकडे राजधानीत. आम्हाला बोलायला उसंत काही मिळत नाही. मी काही सांगेन म्हणते, ती काही सांगेन म्हणते, जरा बाबांच्या मांडीवर डोके ठेवेन म्हणते, पण कसले काय. तिकडे जाऊनही रांधा वाढा उष्टी काढा. आता जाईन तर छान गप्पा होतील. आवडी निवडीचे हक्काने मागून खाता येईल. बरे मागे मुलांचा व्यापही नाही. ते काही नाही. आई म्हणते ते बरोबरच आहे. परीक्षा झाली की, तशीच आईच्या घरी जाते आणि चांगली चार दिवस राहून येते. कळू देत मुलांनाही माझी किंमत.” … तिचा खालचा सूर कधी वरती गेला तिलाही कळाले नाही. तो मात्र चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवता आत गेला.
आपल्याला इथेच ठेवून आई एकटीच माहेरी जात आहे म्हटल्यावर मुले जाम खूश. बाबा काय दिवसभर बाहेर असतो. म्हटल्यावर दिवसभर घरावर आपले साम्राज्य म्हणून मुले आनंदली. लेकीची शाळा दुपारची तर लेकाची सकाळची. दोघांनी टीव्ही, संगणक, मोबाईल व इतर खेळांच्या वेळा आपापसात वाटून घेतल्या. चार दिवस अभ्यासाला सुट्टी. पण चार दिवस बाबा सुट्टी काढून घरी थांबणार आहे कळल्यावर त्यांच्या आनंदावर विरझण पडले, अगदी मगाशी बाबांच्या आनंदावर पडले तसे. बाबांना त्यांच्या साहेबांशी बोलताना तिघांनी चोरून ऐकले होते. हो तिघांनी म्हणजे आईनेसुद्धा. तिने तर लगेच पिशवी भरायला घेतली.
“अग हो, वेळ आहे ना अजून. आधी परीक्षा मग माहेरपण. तेव्हा आधी अभ्यास मग पिशवी भरणे.” त्याने उसने अवसान आणून रागे भरले. तिचा पुढचा आठवडा माहेरपणाचे नियोजन करण्यात, तिच्या पश्चात घरात करायच्या कामांची त्याला व मुलांना सूचना देण्यात आणि मधेआधे वेळ मिळेल तसा अभ्यास करण्यात गेला. आणि शेवटी त्याच्यासाठी महाप्रलयाचा तर तिच्यासाठी महाआनंदाचा दिवस उजाडला.
गाडी सकाळचीच होती आणि तिची कालपासून तयारी सुरू होती. तिच्या डोळ्यांतले पाणी आता हे तिघे चोरून पाहात होते. हो, पुन्हा तिघेच. यावेळी बाबा त्या दोघांना सामील झाले होते. तिचा पाय निघत नव्हता. तरी बरं ती निघाली तेव्हा मुले साखरझोपेत होती. धाकट्याचं मी पण येणार हे पालूपद आठवडाभर चालूच होतं, पण तिने काही त्याला दाद दिली नाही.
तिने देवापुढे निरांजन लावले. देवाला धूप अगरबत्ती दाखवली. नमस्कार करून पिशव्या उचलायला गेली. ” सगळे घेतलंय ना बघ एकदा.”, त्याने बाहेरूनच गाडी काढता काढता आवाज दिला. ” हं काही राहिले तरी मी माघारी थोडीच फिरतीये.” उंबरा ओलांडतानाच तिचे प्रत्युत्तर आले. ” अगं तसं नव्हे, परीक्षेचे सगळे घेतले का?”, असे मला म्हणायचे होते. त्याने सारवासारव करतच गाडी सुरू केली.
पुढे तिच्या पिशव्या आणि मागे ती अशी ओझ्याची कसरत करीत ते स्थानकावर पोहोचले. बस अजून फलाटावर लागायची होती. दोघांनी गरमागरम चहा घेतला. तसे तिचे माहेरी जाणे आता काही कौतुकाचे राहिले नव्हते. लग्नाला जेवढी वर्षे झाली नसतील त्याहीपेक्षा अधिक वेळा ती माहेरी गेलेली होती. दोन जीवांची आई झाली तशी सोबतच्या पिशव्या वाढल्या, पण जाणे कमी झाले नाही. पण यावेळी तिची कच्चीबच्ची बरोबर नव्हती आणि म्हणून जीव तुटत होता.
“अगं राहतील व्यवस्थित. आता मी चार दिवस रजा घेतली आहे ना, मग काय काळजी करतेस. आणि सोबतीला राधाक्का आहेच की. तूच तर नेहमी म्हणतेस ‘ मुले तुझी कमी आणि राधाक्काची जास्त वाटतात.’ मग कशाला काळजी करतेस. तू फक्त परीक्षेवर लक्ष केंद्रित कर आणि मग माहेरपणावर. इकडली काळजी इथेच फलाटावर सोडून दे.”, तिला बसवता बसवता त्याने धीर दिला. पण खऱ्या धीराची गरज तर त्याला होती. हे तो कोणाला सांगणार.
तिची गाडी दिसेनाशी झाली तशी त्याने गाडी काढली आणि घराची वाट धरली. गाडी लावून घराकडे वळला तशी जिन्यातच राधाक्का भेटली. ” पोरं अजून झोपली आहेत. लेकीला झोपू दे हवे तर, पण मुलाला उठवावे लागेल, नाहीतर उशीर होईल शाळेला.”, राधाक्काच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेम एकाच वेळी दिसून येत होते. “आणि हो, डबा मी बनवते खाली. तू त्याला तयार करून खाली घेऊन ये.”
– क्रमशः भाग पहिला
लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)
C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७
+९१ ८९७५३ १२०५९ https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈