☆ तिचे माहेरपण आणि… भाग – २ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆
(राधाक्काच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेम एकाच वेळी दिसून येत होते. “आणि हो डबा मी बनवते खाली. तू त्याला तयार करून खाली घेऊन ये.”) – इथून पुढे.
राधाक्काविषयी काय सांगणार… तरूण वयात आई वडिलांशी भांडून शहरवजा तालुक्याच्या ठिकाणी आली. वाट शोधता शोधता वाट चुकली. अध्यात्माची कास धरलेल्या माझ्या बाबांनी तिला वाट दाखवली. आमचीच खालची खोली राहायला दिली. माझ्यापेक्षा थोडी मोठीच पण माझ्या पिढीतली म्हणावे इतकी जवळची. आई बाबांच्या पाठीमागे तिचा आधार राहिला. हिला ना सासूचे रितेपण जाणवू दिले ना आईची आठवण. एवढे असूनही अट्टाहासाने तिने तिची चूल वेगळीच ठेवली. आणि त्या चुलीवर पुढचे चार दिवस आम्ही ताव मारणार होतो.
बाबा ही नाही ती वही, हे नाही ते पुस्तक, हा नाही तो शर्ट आणि ही नाही ती पॅन्ट…. . त्याच्यासाठी सगळेच अवघड होते पण कसेबसे जमवले आणि मुलाला घेऊन तो खाली आला. राधाक्काने दिलेला डबा घेऊन मुलगा शाळेच्या बसमध्ये बसला. मी सुटकेचा श्वास सोडू पाहात होतो, इतक्यात राधाक्काचा मागून आवाज आला, “अजून लेकीचे बघायचे बाकी आहे.” माझा हात कपाळाला जायच्या आधीच ती म्हणाली,
“ बस बस, तुझ्यासाठी चहा आणते.”
जरावेळ वर्तमानपत्र वाचून झाले तसे मी माझ्या पद्धतीने पोहे बनवायला घेतले. त्याचा खमंग वास बहुधा नाकात शिरला असावा, लेक जागी झाली. “आई काय बनवतीयेस ” अंथरूणातूनच आवाज आला. “आई नाही बाबा ” …
” हो पण पुढचे चार दिवस आमच्यासाठी आईच.” …
” हे बघ तू माझीच फिरकी …” …
” झाले का बाप लेकीचे सुरू?” खालून राधाक्काचा आवाज.
” काही नाही प्रेमाचे भांडण “, त्याचे प्रत्युत्तर.
“ येऊ का मी वरती?” राधाक्काने वरचा सा लावताच… ” नाही नाही, मी चाललीये आंघोळीला.” लेक कधी पळाली कळालेच नाही. नाष्टा झाला, आवराआवर झाली. ती तिच्या अभ्यासाला बसली. तो मध्येच तिच्या खोलीत डोकावला.
“बाबा, एव्हाना आईची परीक्षा सुरू झाली असेल ना?”
“माझी तर सकाळीच सुरू झालीये.”
“काय म्हणालास?”
“काही नाही, झाली असेल परीक्षा सुरू. तुझे आजोबा जाणार होते म्हणे परीक्षा केंद्रावर. परीक्षा संपली की करेल फोन नव्या सूचना द्यायला.”
लेक थोडी शहाणी होती, तिचे दप्तर तिनेच भरले. ” मी वेणी घालून देऊ का? “, त्याने विचारले.
“नाही नाही, आई असती तरी हे काम राधाक्काचेच आहे.”, असे म्हणत ती खाली पळालीसुद्धा.
“तिला थोडी मदत पण कर हो”, त्याने मागून सूचना दिली, पण ती ऐकायच्या आधीच लेक राधाक्काकडे पोहचली होती.
तिचाही डबा राधाक्का देणार होती. तेव्हा तो बाकीचे आवरण्यात गुंतला. लेक शहाणी असली तरी पसारा करण्यात मात्र अगदी त्याच्यावर गेली होती. त्याने तिची खोली आवरली आणि पंख्याखाली खूर्ची टाकून बसला. “आपल्या मागे घरात काय काय चाललेले असते ते आपल्याला काहीच माहित नसते.”, तो स्वतःशीच हसला.
मुलगी शाळेला गेली आणि पाठोपाठ मुलगा शाळेतून परत आला. म्हणजे आराम करायची उसंत नाहीच.
“कपडे बदलून, हात पाय धुवून खाली ये रे. तुझे आणि बाबाचे पान एकत्रच वाढते.” मुलगा जिने चढत असतानाच राधाक्काची आज्ञा आली. आज गरमागरम आणि तेही राधाक्काच्या हातचे जेवायला मिळणार म्हणून मी आणि तोही खूश होता.
” त्याला वर गेल्या गेल्या झोपायला लाव रे. चार वाजता शेजारी शिकवणीला पाठवायचे असते.” वर येता येता आठवण वजा आज्ञा आली. त्याने मुलाकडे आणि मुलाने त्याच्याकडे पाहिले. एकूण काय, आई घरी नसली तरी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार कोणालाच करता येणार नव्हता.
मुलगा शिकवणीला गेला तसा आपणही जरा पडावे असा त्याने विचार केला. जरा डोळा लागतोय न लागतोय तोच मुलगी शाळेतून आली. “आज लवकर?” त्याने विचारले.
“हो आज शाळेत शिक्षकांचा काही कार्यक्रम होता म्हणून लवकर सोडली.”, तिने तिच्या खोलीत जाता जाता माहिती पुरवली.
“तू सकाळी आजचे वेळापत्रक बघितले नव्हतेस का?” वर त्यालाच प्रश्न. “अच्छा तेही आम्ही पालकांनीच पाहायचे का?” त्याचे आजच्या दिवसातील आणखी एक स्वगत.
“बाबा मला जाम भूक लागली आहे, काहीतरी खायला बनव “, लेकीची आज्ञा आली. तो राधाक्काने आवाज द्यायची वाट पाहात होता. पण यावेळी राधाक्का वामकुक्षी घेत असते अशी आणखी एक माहिती मुलीकडून मिळाली.
“बाबा, छानपैकी नूडल्स बनव की.”
“हे बघ नुडल्स आरोग्यासाठी चांगले नसतात आणि म्हणून आईने पण सामानात ते भरले नाहीयेत.”
“कोण म्हणाले तुला? त्या सगळ्यात वरच्या फडताळात तो मोठ्ठा डबा आहे ना, त्यात एकदम खाली पाकीटं असतात. आईने जाण्यापूर्वीच आणून ठेवलेली. फक्त मला सांगून गेली की, भूक लागली आणि बाबा घरी नसला तर तुझ्यासाठी आणि भावासाठी बनवून घे.”
“हो पण मग मी आहे ना घरी. छान उपमा बनवतो, भाऊपण येईल इतक्यात.”
भावाप्रमाणे तिचाही स्वैराचाराचा प्रयत्न साफ फसला.
संध्याकाळी तिचा फोन आला तोवर मुले खाली खेळायला गेली होती. तिची परिक्षा चांगली गेल्याचे कळाल्याने त्याला आनंद झाला, तर घरी सगळे व्यवस्थित असल्याचे कळल्याने तिला आनंद झाला. रात्री मुलांशी फोन जोडून देतो असे तो म्हटला खरे पण मुले खेळून आल्यावर जेवून कधी झोपी गेली त्यालाच कळलं नाही. आज त्यालाही खूप छान झोप लागली.
दुसरा दिवस असाच गेला. त्याने मोडकातोडका नाष्टा बनवला तर जेवणाचे मात्र राधाक्कावरच सोडले. तिसऱ्या दिवशी मुले चित्रपट पाहायला जायचे व बाहेरच खायचे म्हणून मागे लागली. बाहेर जाणे हा काही फार अवघड विषय नव्हता, तिला कळल्यावर तीही काही म्हटली नसती, पण दोघांना एकट्याने नेणे हे मोठे दिव्यच होते. मुलगा तसा अजून लहान असल्याने त्याचा हात सोडणे शक्य नव्हते आणि मुलीचे आपले हे घेऊ ते घेऊ चालले होते. अधूनमधून त्यांची भांडणे चालू होती ती वेगळीच. आता मात्र त्याला तिची उणीव भासू लागली. तिचा तरी पाय कुठे माहेरी टिकतोय, चौथ्या दिवशी पहाटेच्याच गाडीने परतली. ती येणार असल्याचा मागमूसही त्याला नव्हता. मुलगी दप्तर भरत असताना आवाज आला, ” थांब मी भरते दप्तर. तू तोवर खाली राधाक्काकडे जाऊन वेणी बांधून घे. आणि हो राधाक्काला सांग, आज मी पण आयते जेवायला येतीये.” दोघी मनमुराद हसल्या. मुलगी थोड्यावेळ आईला बिलगली आणि खाली पळाली.
आता आईला बिलगायची पाळी बाबांची होती एवढे कळण्याइतपत ती मोठी झाली होती.
– समाप्त –
लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)
C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७
+९१ ८९७५३ १२०५९ https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈