सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग १ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ सुधा ओम ढींगरा
टेक लेफ्ट..’ तो कार डावीकडे वळवून दूरवर घेऊन गेला. ‘नव टेक राईट ऑन स्टॉप साईन. …’ त्याने स्टॉप खुणेशी गाडी उजवीकडे वळवली आणि ड्राईव्ह करत तो त्याच जागी पुन्हा आला, जिथून त्याने सुरुवात केली होती. दिशा निर्धारित यंत्राच्या निर्देशांचा, तो गेले अर्धा तास पालन करत होता आणि शहरात वसलेल्या घरांच्या समूहाला तो प्रदक्षणा घालत होता. पण अजूनही त्याला हव्या त्या घरापाशी तो पोचला नव्हता.
‘अरे यार, तू मला किती फिरवणार? मला हव्या या घराशी पोचवणार की नाही? ‘ नेव्हिगेटरकडे बघत तो चिडून म्हणाला.
दिशा निर्धारित यंत्राच्या निर्देशांनुसार तो त्या सब-डिव्हिजनमध्ये पोचला होता॰ त्याला हवं ते घर तिथेच, त्याच सब-डिव्हिजनमध्ये होतं. त्याचा पत्ता त्याला दिला गेला होता आणि आता तिथे तो निघाला होता, पण गेले दहा-बारा मिनिटे नेव्हिगेटर त्याला कधी डावीकडे, तर कधी उजवीकडे फिरवत होता. पण कुठल्याही घराशी थांबायला मात्र संगत नव्हता. एरिया नवीन होता. काही घरं नुकतीच तयार झाली होती. काही तयार होत होती. त्यामुळेच कदाचित ती गुगल मॅपमध्ये नव्हती आणि त्यामुळे नेव्हिगेटर दिशा निर्देश देऊ शकत नव्हता. ज्या रस्त्यावर त्याला हवं ते घर होतं, तो रस्ताही कळत नव्हता.
एवढ्यात त्या ला रस्त्यावरून, म्हणजे साईडवॉकवरून चालत जाणारा एक भारतीय दिसला. त्याने आपली कार त्याच्याजवळ नेऊन थांबवली आणि खिडकीची काच खाली केली. आपल्या हातातला पत्ता त्याच्यापुढे करत विचारलं, ‘सर, हे घर कुठे आहे, आपण सांगू शकाल?’ दक्षिण भारतातली ती एक प्रौढ व्यक्ती होती. पत्ता बघून ते म्हणाले, ‘ मी इथे मुलाकडे आलोय. नवीन आहे इथे मी. मला काहीच माहीत नाही…. त्यांना विचारा.’ त्यांनी समोरच्या घरातील, एका गोर्या माणसाकडे बोट दाखवलं. तो आपल्या बागेला पाणी देत होता.
त्याने कार तिथेच थांबवली आणि पत्ता घेऊन तो त्या माणसाकडे गेला.
‘हॅलो ….’
‘हाय…’
‘कॅन यू टेल मी वेयर इज दीज हाऊस?’
त्या गोर्या माणसाने त्याच्या हातातून पत्ता घेतला आणि हसत म्हणाला, ‘ तू घराच्या अगदी जवळ आला आहेस. तू घरासाठी चकरा मारताना मी पाहिलं तुला.’ त्याने आपल्या एका हाताच्या तळव्यावर दुसर्या बोटाने रेघा काढत त्याला रस्ता समजावला. ‘ थॅंक्स’ म्हणत तो कारपाशी आला. रस्ता दाखवण्याची ही पद्धत त्याला खूप आवडली. आत्ता त्या माणसाने दाखवलेल्या रस्त्यानुसार तो पुढल्या गल्लीत उजवीकडे वळला. गल्लीच्या शेवटी ते घर त्याला दिसलं. घर नव्याने तयार झालेलं होतं आणि त्याच्याशेजारी एक नवीन घर बनत होतं. त्याने थोड्या आंतरावर कार पार्क केली.
तो योग्य जागी आला होता खरा, पण कारमधून उतरण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्याच्या मस्तकाच्या आखाड्यात वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात कुस्तीच चालली होती जशी. त्यामुळे त्याच्या डोक्यात गोंधळ चालला होता. त्याला आश्चर्य वाटलं, अचानक मागे सरलेल्या वर्षांनी त्याला असं कसं बांधून ठेवलं.
भूतकाळाचा त्याच्यावर इतका दबाव पडला होता की तो त्याला कारसीटपासून हलूच देत नव्हता. कसा जाणार तो त्या घरात? तो जसा काही कारच्या सीटला जखडला गेला होता.
भूतकाळाचा हाच तर वैताग असतो. त्याचे पापुद्रे सुटू लागले की सुटतच जातात. आठवणी पिंगा घालू लागल्या की पाठ सोडतच नाहीत. त्याच्याबाबतीत हेच तर होतय. गेले दोन दिवस घालवलेला वेळ वर्तमानावर दबाव आणतोय. स्वत:ला सामान्य करण्यासाठी त्याने कार सीटवरच मागच्या बाजूला डोके टेकले आणि डोळे मिटून घेतले.
एका फोन कॉलवरील स्नेहाळ आवाजाने त्याला भावूक बनवलं होतं…. ‘हॅलो…’
‘इज दिज मिस्टर आनंद.’
‘यस.’
‘मिस्टर आनंद आपल्याशी कोणी तरी बोलू इछितय. घ्या. बोला.’
तो हैराण झाला होता. कुणाला त्याच्याशी बोलायची इच्छा होती? एवढ्यात मधात घोळलेला एक मधुर आवाज त्याच्या कानावर पडला. – ‘नंदी…’ फोनच्या या बाजूला आणि त्या बाजूला आवेगाच्या पावसाचे थेंब झरझरू लागले. दोन्ही बाजूला तन-मन भिजून चिंब झालं. कामाची घाई होती, तरीही आनंद तासभर त्या आवाजाशी बोलत राहिला. तो त्याला भेटायला उत्सुक झाला. कधी एकदा त्याला भेटतो, असं आनंदला होऊन गेलं. एका प्रोजेक्टचा शेवटचा दिवस उद्या होता, त्यामुळे दोन दिवसांनंतर भेटायचं नक्की ठरलं. दोन दिवस तो अशा बागेत फिरत होता, जिथे सप्तरंगी फुले फुलली होती. त्यांचा सुगंध तो ऑफीस, घर, बिछाना, इतकच काय, आपल्या श्वासातही अनुभवत होता. एक अजबशी खुमारी चढत होती. मधुर मधुर आवाज, ‘नंदी… नंदी…’ म्हणत त्याला बोलावत होता. हा आवाज लहानपणी तो देवघरातून ऐकत होता.
लहानपणाचा त्या घराचा सुगंध त्याच्या आत आत अजूनही वसलाय. बनारसी, बालदेव आणि हरी त्यांच्याकडे कामाला होते, पण ते त्याचे मोठे काका- छोटे काका होते. त्याने घरात प्रेम आणि मधाळ आवाजच ऐकला होता. कामगारांच्या बरोबरही कोणी मोठ्या आवाजात बोलत नसत. त्याला नेहमीच वाटतं, लहानपणी त्याच्या आत सामावलेला स्नेहाचा सुगंध त्याला इतका सुगंधित करत राहिला, की तो कुणाचा तिरस्कार करूच शकत नाही. तिरस्काराची बीजे अनेकदा रोवली गेली, पण प्रेमाच्या छायेत ती वाढू शकली नाहीत.
प्रथम तर त्याचा विश्वासच बसला नाही. इथे विदेशात येऊन कुणी, जे बर्याच दिवसांपूर्वी हरवलं होतं, ते विश्वासाने त्याला शोधून काढेल, त्याला फोन करेल, या खात्रीने फोन करेल की त्यांच्याविषयीची त्याच्या मनातली प्रेमाची ठिणगी विझलेली नसणार आणि खरोखरच नंदीच्या मनातली, जी प्रेमाची ज्योत त्यांनी लावली होती, ती अजूनही जळतेच आहे. विदेशात आल्याबरोबरच तो आनंदाचा नंदी झालाय आणि खरोखरच आपल्या आतली ती प्रेमाची ज्योत त्याने कधीच विझू दिली नव्हती. तो त्यांना कधीच विसरला नव्हता. त्याच्या बालपणीची दहा वर्षे त्यांच्याशी जोडलेली होती. इथे आल्यावर तर तो स्वत:ला त्यांच्या अधीकच जवळ आल्याचं अनुभवत होता. इथे आठवणींच्या आधारेच तर माणूस आपली सुख- दु:खे भोगत असतो. हां! आनंद बनून तो काही वर्षे त्यांच्यापासून दूर राहिला. आता नंदी बनून तो त्यांच्याजवळ आलाय.
नंदी आणि आनंदचं अंतर्द्वंद् कधीपासून सुरू झालं? मम्मीने नंदीला आनंदपासून हिसकावून घेतलं आणि आनंद एकटा झाला. आनंदसाठी तो मोठा कठीण काळ होता. अवघा दहा वर्षाचा होता तो तेव्हा, पण तो जसजसा मोठा होईल, तसतसा त्याने आपल्या आतल्या नंदीला संभाळून जीवंत ठेवला होता.
आठवणींचे पक्षी फडफडू लागले. डोक्यात गोंधळ माजला. आठ्ठावीस वर्षापर्यंत तो ज्या परिवेशात वाढला, तिथे प्रचंड विरिधाभास होता. तो जसा जसा मोठा होत गेला, तसतशी त्याला समज येऊ लागली. आता तर त्याला खूप गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. परदेशातील वातावरण आणि कार्यप्रणाली याने त्याचा विवेक जागृत झालाय. बुद्धिमत्ता अनेकांमध्ये असते, पण बुद्धिमान कमी असतात. या देशाने त्याची अंतर्दृष्टी व्यापक बनवलीय. गोष्टींकडे बघण्याच्या दृष्टीत परिवर्तन आलय. भिन्न भिन्न देशातील भिन्न भिन्न लोकांसोबत काम करण्याने एक वेगळ्याच प्रकारची सजगता त्याच्या ठायी आलीय.
तो आपल्या वडलांना सांगू इच्छित होता की वयाच्या त्या थांब्यापर्यंत ते जे काम करू शकले नाहीत, ते काम करायला तो निघालाय. परंतु त्याने जेव्हा जेव्हा आपल्या पप्पांना फोन लावला, तेव्हा तेव्हा, त्याच्या मम्मीनीच तो उचलला, त्यामुळे तो काहीच बोलू शकला नाही. मम्मीला कळणं, म्हणजे घरात वाद-विवाद, क्लेश. इथे आल्यानंतर त्याने मम्मीच्या अनेक गोष्टींना विरोध केला होता. मम्मी त्याला काही म्हणायची नाही, पण घरात पप्पांची धडगत नसे. त्यांना मम्मीचं तिरकस बोलणं ऐकून घ्यावं लागे-
‘तुमचा मुलगा तुमच्यावर गेलाय. मोठा चलाख आहे. मनमानी करणारा. माझी पर्वा तुम्ही कधी केलीत, म्हणून तो करेल. एक मुलगीच तेवढी आहे, जी मला समजून घेते. ‘
कधी काळी तो आपल्या आईवर खूप प्रेम करायचा. पण दिल्लीला आल्यानंतर, तो आणि त्याचा भाऊ दोघेही आपल्या पाप्पांच्या निकट आणि मम्मीपासून दूर होत गेले. छोट्या छोट्या बाबीत, त्याची मम्मी, पप्पांना खाली बघायला लावायची, त्यांचा अपमान करायची, ते भावाभावांना मुळीच आवडत नसे. प्रत्येक वेळी त्याचे पप्पा मान खाली घालून मम्मीची प्रताडना सहन करायचे. त्यांच्या डोळ्यात समुद्र उसळताना त्याने पाहिलय. जेव्हा तो कोपर्यातून वाहू लागेल, असं वाटे, तेव्हा ते आपल्या खोलीत निघून जात. त्याला अनेक वेळा आपल्या पप्पांचा राग येई. वाटे, ते बोलत का नाहीत?
वयाची दहा वर्षे होईपर्यंत त्याने आपल्या मम्मीचं अतिशय सुंदर रूप पाहिलं होतं. नंतर त्याने जे पाहिलं, त्यामुळे तो घाबरूनच गेला.
क्रमश: भाग १
मूळ हिंदी कथा 👉 ‘कभी देर नहीं होती…’- मूळ लेखिका – सुधा ओम ढींगरा
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈