श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ शुभमंगल सावधान – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – त्यांच्या एका नातलगाने बातमी दिली, सावंतवाडीत एक एजंट आहे. तो सिंधुदुर्गात लग्नाच्या मुली पुरवतो. त्याने जिल्ह्यात काही मुली आणून त्यांची लग्न लावून दिली आहेत. त्यांचे संसार उत्तम चालले आहेत. राजूच्या बाबांनी त्या एजंटचा फोन नंबर घेतला. आणि वेळ घेऊन सावंतवाडीला त्याच्या घरी पोहोचले. ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या आधी सात-आठ जण मुलाचे आई-वडील तेथे बसलेले होते. आता इथून पुढे )
एजंटाच्या ऑफिसात एकेक पालक आत जात होता. एका तासानंतर राजूच्या बाबांचा नंबर लागला.
एजंट – तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे आणि तो काय करतो?
राजूचे बाबा -आठ्ठावीस वर्षाचा आहे, आमची आंबा बाग आहे चारशे कलमांची.
घरी कोण कोण आहेत -मी, माझी बायको आणि हा एकच मुलगा
एजन्ट – काय असते शेतकऱ्याच्या मुलाशी मुली लग्न करायला तयार होत नाहीत. तरीपण मी प्रयत्न करतो. बुधवारी आजर्याला मुली आणणार आहोत. माझे कमिशन पहिल्यांदा 80 हजार रुपये द्यायचे. मगच मुली दाखवणार. तुम्ही मुलगी पसंत केल्यानंतर लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीच्या बापाला पाच लाख रुपये रोख द्यायचे. लग्न सगळं तुमच्या खर्चाने. लग्नात जास्त माणसे जमवू नका. लग्नात मुलीच्या अंगावर दहा तोळे सोने घालायचे. मुलीच्या भावाला अर्ध्या तोळ्याची अंगठी. मुलीच्या माहेरच्या माणसांसाठी १५ चांगल्या प्रतीच्या साड्या. १५ पॅन्ट शर्ट पीस. लग्नाला जी माणसे कारवार होऊ देणार त्यांच्या गाडीचा खर्च. हे सर्व कबूल असेल तर मला उद्या संध्याकाळपर्यंत कळवा. आजऱ्याला जायचं असेल तर आठ आसनी चांगली गाडी घेऊन यायची. माझ्या फोनवर काय ते उद्या संध्याकाळपर्यंत कळवा. मुलींना मागणी खूप आहे. अजून कितीतरी लोक भेटायला यायचे आहेत. काय ते कळवा.
राजूचे बाबा बाहेर पडले. एसटी पकडून गावी आले. बायकोला आणि राजूला सर्वच बातमी सांगितली. मुलींच्या अटी ऐकून राजूची आई गप्पच झाली. पण नाईलाज होता. आपल्या भागातून लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. शेवटी त्या एजंटला पैसे देण्याचे ठरले. बाबांनी दुसऱ्या दिवशी एजंटला फोन केला. त्यांनी बुधवारी सकाळी आठ वाजता आपल्या घरी सावंतवाडीत यायला सांगितले. येताना एजंटचे कमिशन 80 हजार रुपये आणि आजऱ्यला जाण्यासाठी चांगली इनोवा गाडी आणण्यास सांगितले. राजूला हे सर्व पसंत नव्हते. तो असल्या भानगडी नकोच म्हणत होता. परंतु राजूच्या आईने जोर धरला.’ एकदा लग्न होऊ दे ‘असा तिचा आग्रह होता.
रविवारी गावातील एक आठ आसनी गाडी भाड्याने घेऊन तिघेजण सावंतवाडीत आले. एजंट ला ८0 हजार रुपये दिले आणि सोबत दोन लग्नाचे मुलगे आणि त्यांचे आई-वडिलांसह आजऱ्याला रवाना झाले. आजऱ्याला एका दुसऱ्या एजंटच्या घरात कारवार होऊन दोन मुली आणि त्यांचे वडील आले होते. तेथेच मुली दाखवल्या गेल्या. मुली मात्र दिसायला छान होत्या. पण भाषा कन्नड. राजूच्या घरच्यांना कन्नड येत नव्हते आणि त्या मंडळींना मराठी येत नव्हते. दोन मुलींपैकी एक मुलगी राजूच्या आईने पसंत केली. तिचे वडील आणि ते आणि हे दोन एजंट राजूच्या आई-बाबांच्या समोर बसले. लग्नाच्या आदल्या दिवशी पाच लाख मुलीच्या वडिलांना द्यायला पाहिजेत तरच मुलगी लग्नाला उभी राहील हे निक्षून सांगितले. लग्नाच्या वेळी मुलीच्या अंगावर दहा तोळ्याचे दागिने घातलेले पाहिजेत तरच मुलगी लग्नाला येईल. हे असे सांगितले त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. नाहीतर मुलीला घेऊन आम्ही माघारी येऊ अशी धमकी दिली. या सर्व अटी मान्य करून राजूचे आई-बाबा गाडीत बसले आणि एजंटला सावंतवाडीत उतरवून आपल्या घरी आले.
एकंदरीत सर्व विचार करून दोन मार्च ही लग्नाची तारीख ठरवली. लग्न राजूच्या शेजारील घराच्या दारात करायचे ठरले. एजंटला तारीख कळवली. त्यांनी एक मार्च रात्री पर्यत गावात पोहोचवण्याचे मान्य केले. राजूच्या बाबांनी दहा तोळ्याचे दागिने करायला दिले. मुलीच्या भावासाठी अर्ध्या तोळ्याची अंगठी करायला दिली. कणकवली जाऊन “मालू क्लोथं ‘ मधून साड्या तसेच पॅन्ट पीस शर्ट पीस खरेदी केले. घराची रंगरंगोटी केली. जास्त लोकांना आमंत्रण दिले नाही. फक्त जवळच्या माणसांना आणि जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिले.
कारवारहुन मुलीकडची माणसे, दोन्ही एजंट, सायंकाळी सात वाजता हजर झाले. एजंटनी आल्या आल्या राजूच्या वडिलांकडून पाच लाख रुपये रोख मोजून घेतले. मुलीचे दागिने ताब्यात घेतले. कपडेलत्ते ताब्यात घेतले.
रात्री हळदी कार्यक्रम झाला. सर्वांनी कौतुकाने राजुला हळद लावली. हळदीची गाणी म्हटली डान्स केले. लाऊड स्पीकर मोठ्यामोठ्याने हळदीची गाणी म्हणत होता.
दोन मार्चला लग्न लागले. मुलीच्या अंगावर दहा तोळ्याचे दागिने दिसत होते. गावातील भटजींनी लग्न लावले. मग इतर लग्नाचे विधी आणि सर्वांसाठी जेवण. खास देवगडहून आचारी बोलावले होते. मग देवळापर्यंत वरात, वरातीत नाचणे, बेंजो, फटाके वाजले.
राजू ची बायको घरात आली ती एक सारखी कन्नड मधून मोबाईल वर बोलत होती. सर्वांना वाटत होते आपल्या गावातील जवळच्या माणसांशी बोलत असेल. राजूच्या घरी पुन्हा रात्री माटाव जेवण. यावेळी खारे जेवण. बकरा मटन, चिकन, रस्सा, भात आणि भाकरी आणि तरुण मंडळी साठी बाटल्यांची खास सोय. रात्री अकरा पर्यंत जेवणाची धामधूम सुरू होती.
हळूहळू सकाळ पासून दमलेले शेजारी, नातेवाईक आपापल्या घरी गेले, लाऊड स्पीकर बंद झाला. दोन दिवस धामधूम झाल्याने लोकांना झोप येत होती. लाईटी बंद केल्या गेल्या.
राजू रात्री बारा वाजता खोलीत गेला तेव्हा त्याची बायको कॉटवर गाढ झोपी गेली होती. सकाळी लग्नात घातलेले दागिने तसेच अंगावर होते. राजू ने चटई आणि चादर घेतली आणि तो खाली जमिनीवर झोपला.
दोन रात्री झोप न मिळाल्याने सर्वजण गाढ झोपी गेले. सगळीकडे शांतता. सकाळी सहा वाजता राजूची आई जागी झाली. बाहेर ओट्यावर आली तर घराच्या पुढच्या दाराची कडी काढलेली दिसत होती. तिला आठवले रात्री तिनेच दाराची कडी लावली होती. मग दार कोणी उघडले? हे तिच्या लक्षात येईना. काल रात्री मुक्कामास राहिलेले पाहुणे अजून झोपेत होते,, राजू आपल्या खोलीत होता, मग दार उघडे कसे? दाराची कडी कोणी काढली?
एवढ्यात खोलीतून राजू बाहेर आला. आईने त्याला पुढचे दार उघडे असल्याचे सांगितले. राजू ने परत खात्री केली, सर्वजण झोपेत होते. मग तो आपल्या खोलीत गेला तर काल लग्न केलेली त्याची बायको कॉटवर नव्हती. तिची कपड्यांची बॅग पण दिसत नव्हती. राजूला वाटले परसात कुठेतरी गेली असेल. त्यानी परसात शोधले. विहिरीजवळ पाहिले. ती कुठेच दिसेना. त्याने आईला तसे सांगितले. आईने पुन्हा त्याच्या खोलीत येऊन पहिले, तिची बॅग जागेवर नव्हती. एवढ्या शेजारची माई त्यांच्याकडे आली “राजूच्या आई, काल रात्री चार वाजता मी बाहेर इल्लाय तर तुमच्या घरासमोर तीच कारवारची गाडी उभी होती आणि तुमच्या घरातून कोण त्या गाडीत बसलेला काय गे?’.
राजूच्या आईच्या काळजात धस झाले. म्हणजे काल लग्न केलेली नवरी रात्री पळाली की काय? तिने नवऱ्याला उठवले. राजूचे बाबा हडबडून उठले, झोपलेले सर्व नातेवाईक उठले. पुन्हा एकदा परस, विहीर, शेजारी पाजारी शोधले. सावंतवाडीच्या एजंटना फोन लावले. तेव्हा ते फोन उचलत नव्हते. मग एका नातेवाईकाच्या फोनवरून त्यांना फोन लावला, तेव्हा त्यांनी फोन उचलला, त्यांनी हात झटकले ” लग्न लावून मुलगी तुमच्या घरात येईपर्यंत माझी जबाबदारी आता मुलगी नाहीशी झाली ती तुमच्या घरातून. माझी जबाबदारी नाही ‘. राजूच्या बाबांनी डोक्याला हात लावला. राजूची आई मावशी रडायला बसल्या. राजू चा चेहरा पडला. आई रडते हे पाहून तो पुन्हा रडायला लागला. कुणीतरी म्हणाले पोलीस कम्प्लेंट करा. राजूच्या बाबांनी पोलिसात तक्रार दिली. काल लग्नात कोणीतरी मोबाईलवर काढलेले तिचे फोटो दाखवले. पोलीस इन्स्पेक्टर ला काहीतरी शंका आली. त्याने एक फाईल बाहेर काढली. फोटो पडताळून पाहिले. “अहो, या मुलीने आपल्याच तालुक्यात दोन वेळा दोन मुलांबरोबर लग्न केले आहे. हे पहा त्या लग्नातील फोटो. ती मंडळी लग्नात घातलेले दागिने आणि पैसे घेऊन पोबारा करतात. आम्ही त्या एजंटची पण चौकशी केली होती. ते म्हणतात, आम्हाला कर्नाटकचे एजंट येऊन फोटो देतात ते आम्ही आमच्या भागात दाखवतो. आम्ही त्या मुलींना किंवा त्यांच्या आई-वडिलांना ओळखत नाही. त्यामुळे तो तपास इथेच थांबला ‘. तुमची तक्रार येथे नोंदवा तसेच किती दागिने घेऊन ती मंडळी पळाली ते पण लिहा. चौकशी करतो’.
राजूच्या बाबांनी डोक्याला हात लावला. पोलिसांनी मग त्या गाडीचा तपास केला, ती गाडी हलकर्णी भागातील भाड्याने घेतलेली गाडी होती. ती गाडी त्या मंडळींनी आंबोली जवळ पैसे देऊन सोडली,’.
रात्री सगळेजण डोक्याला हात लावून बसले होते. जवळजवळ १५ तोळे सोने, सहा लाख रुपये, अडीच लाख रुपये लग्नाचा खर्च. एवढ्याच राजूच्या आईला आपल्या दागिन्यांची आठवण झाली, काल रात्र घाई घाई तिने दागिने काढून डायनिंग टेबलावर ठेवले होते, ती टेबलावर जाऊन पाहू लागली पण ते दागिने पण नाहीसे झाले होते.
क्रमश: भाग-२
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर