सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ V. R. S. ची किमया…☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
जय माता की.. अंबामाताकी जय.. दुर्गामाताकी जय…
बाल्कनीत उभा राहून मी रस्त्यावरची मिरवणूक पहात होतो. नवरात्र चालू होतं. दररोजच रात्री अशा छोट्या मोठ्या मिरवणुकीने लोक टेकडीवरच्या देवीच्या दर्शनाला जातात.
आज का कोण जाणे, पण हा देवीचा जयजयकार ऐकून, मला आमच्या शाखेतल्या श्री. मानमोडे साहेबांची एकदम आठवण झाली. काहीही कारण नसताना.
अगदीच काही कारण नाही असंही म्हणता येणार नाही म्हणा. त्याचं काय आहे की, हे आमचे मानमोडे साहेब, वय ५४ वर्षे ७ महिने, हे आमच्या शाखेतले एक जबाबदार अधिकारी. अतिशय साधे, शांत, सज्जन, पापभिरू, आनंदी गृहस्थ. गेली ३१ वर्षे, अगदी मनापासून नोकरी करत आलेले.. काळाच्या ओघात मिळत गेली ती प्रमोशन्स स्वीकारत आता डेप्युटी मॅनेजर पदापर्यंत पोहोचलेले…
दर गुरुवारी बँकेतल्या दत्ताच्या फोटोला, चतुर्थीला गणपतीच्या फोटोला हार आणि नैवेद्याला नारळ मानमोडे साहेबांचाच, हा जणू Book of Instructions मधला भाग, एवढे हे देवभक्त. अगदी टेबलाच्या ड्रॉवरमध्येही देवादिकांचे छोटे फोटो कायम ठेवलेले, अगदी सहज दिसतील असे. त्या देवाच्या कृपेनेच आत्तापर्यंत सर्व आलबेल आहे ही त्यांची गाढ श्रध्दा.
असं सगळं अगदी व्यवस्थित शांतपणे चालू होतं. आणि अचानक बँकेत एक झंझावात आला. V. R. S. नावाचा… अधिकाऱ्यांसाठी वय वर्षे ५५ च्या पुढे असण्याची अट होती. त्याचे फायदे, तोटे, घरच्या गरजा, सर्वांचा आपापल्या परीने सारासार विचार करून अनेकांनी त्यासाठी अर्ज केले. मानमोडेसाहेबही त्यात होते.
सर्वांची सहनशक्ती पुरेशी ताणून झाल्यावर, बँकेने retire होणा-या लोकांची यादी जाहीर केली. पण इथे मात्र देवाने मानमोड्यांची प्रार्थना कबूल केली नाही. जन्मायला काही महिने उशीर केल्याचे कारण देवून त्यांचा अर्ज reject झाला. आणि ते retire होऊ शकले नाहीत.
आणि इथूनच बँकेतल्या वातावरणाला, प्रत्येकाच्या कामाला, कामाच्या ताणाला वेगळंच परिमाण मिळालं. आमच्या शाखेतले ११ पैकी ७ अधिकारी V. R. S. मध्ये निवृत्त झाले. सुखाने-आनंदाने- बरंच मोठं डबोलं घेऊन घरी गेले. आणि कामाचं डबोलं मात्र इतरांच्या डोक्यावर अलगद ठेवून गेले. आधी एक नवीन आव्हान म्हणून.. किंवा खरं तर दुसरा काही पर्यायच नाही म्हणून, राहिलेल्यांना काम करणं भागच होतं. काळ हेच सर्वांवर औषध या नियमाने, राहिलेल्या लोकांमध्येच कामकाजाची घडी बसवावीच लागत होती. हळूहळू सगळेच जण या बदलालाही सरावले. इतके की, काही बदललंय हेही विस्मरणात जावं लागलं.
पण आमचे मानमोडे मात्र हळूहळू जणू आमूलाग्र बदलू लागले. शारीरिक कुवतीपेक्षा खूपच जास्त काम करावं लागत होतं त्यांना. त्यांच्या आवडत्या देव-देवतांसाठीही त्यांना पुरेसा वेळ देता येईनासा झाला त्यांना. ते सतत अस्वस्थ वाटू लागले. हळूहळू शरीरही त्रास देऊ लागले. सर्व अवयव आपले महत्त्व पटवून देऊ लागले. मानदुखी, पाठदुखी, बी. पी. आणि काय काय… रोज नवीन नवीन भेटीगाठी होऊ लागल्या. डॉक्टरांकडचे हेलपाटे वाढले.
आणि काही दिवसातच, V. R. S. मुळे झालेल्या बदलानेही तोंडात बोट घालावे असा एक आश्चर्यकारक बदल आमच्या मानमोडेसाहेबांमध्ये झालेला दिसू लागला. ड्रॉवरमधल्या देवांच्या फोटोंवर हळूहळू गोळ्यांच्या स्ट्रिप्स साठत होत्या. वाढत होत्या. आता देव पूर्ण झाकले गेले. मानमोडे वारंवार सगळ्या गोळ्या, मलमं जागेवर आहेत की नाही पाहू लागले. जणू नाही पाहिलं तर अचानक लुप्त होतील ती. हळूहळू तर, पूर्वी देवाला करायचे, तसा त्या औषधांनाच येता-जाता नमस्कार करू लागले ते. इकडे देवांच्या फोटोंचे हार पार वाळून वाळून गेले. प्रसाद-बिसाद तर लांबच. मानमोड्यांच्या डोक्यावर काही परिणाम वगैर तर झाला नाही ना अशी कुशंका भेडसावू लागली आम्हाला ! नाही म्हटलं तरी, आम्हा सर्वांचा, आमच्याही नकळत जीव होता ना त्यांच्यावर !
शेवटी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलंच की त्यांच्याशी बोलायचं. त्यांना मन मोकळं करायला लावायचंच. आणि एका शनिवारी आम्ही ३-४ जण काही ना काही निमित्त काढून त्यांच्या टेबलाशी जमलो. काम उरकत आणल्याने मानमोडेही जरा relaxed वाटत होते.
आणि आम्ही बोलता बोलता विषय काढला. आमची काळजी बोलून दाखवली. विचारू लागलो की ते एवढे बदललेत कसे? का? त्यांची देवभक्ती गेली कुठे? देवांची जागा औषधांनी घेऊन सुध्दा, ते परत पूर्वीसारखे शांत कसे वाटायला लागलेत हल्ली? ते मनाने तर खचले नाहीत ना? देवावरचा त्यांचा विश्वास तर उडला नाही ना? तसं असेल तर हे सगळं कशामुळे? V. R. S. मध्ये नाव नाही म्हणून? की दुप्पट तिप्पट काम पडतंय ते झेपत नाहीये म्हणून? की अनेक शारीरिक व्याधी साथीला आल्यात म्हणून?
आम्ही आमची खंत बोलून दाखविली मात्र, मानमोडे जोरजोरात हसायलाच लागले. आम्ही नुसतेच एकमेकांकडे बघत राहिलो. हसणं थांबल्यावर साहेब शांतपणे पण आत्मविश्वासपूर्ण बोलू लागले…
‘‘अरे, तुम्हाला माझी इतकी काळजी वाटते हे पाहून माझं मन अगदी भरून आलंय. आता मला सांगावंच लागेल तुम्हाला सगळं…” आम्ही जिवाचे कान करून ऐकू लागलो.
‘‘काही दिवसांपूर्वी मला साक्षात्कार झाला. असे दचकू नका. स्वप्नात येऊन देव बोलला माझ्याशी स्वत:! अहो खरंच. आमच्या बोलण्याचा सारांश सांगू का तुम्हाला? ऐका. आपण पूर्वीपासून ऐकत आलोय ना की देव वेगळ्यावेगळ्या रूपात आपल्या भक्तांच्या हाकेला धावतो ते. एकनाथांसाठी तो श्रीखंड्या झाला. जनीबरोबर दळणं दळली त्याने. कबिराचे शेले विणले. अरे पण या कलियुगात भक्तांच्या हाका इतक्या वाढल्या की देव जरी झाला तरी किती रुपं घेणार तो? नाही का! सांगा की. मग त्यानं अशी वेगवेगळी रुपं घ्यायचं आणि माणूस म्हणून भक्तांना मदत करण्याचं थांबवलंच आहे आताशा. निदान क्षुल्लक गोष्टींसाठी कुणी धावा करत असेल तर तो स्वत: नाहीच धावून येऊ शकणार यापुढे. अरे, असं आSSS वासून काय पहाताय माझ्याकडे? खरंच सांगतोय मी. आता माझंच उदाहरण घ्या ना. मी पूर्वीसारखा देवभक्त राहिलो नाही असं वाटतंय ना तुम्हाला? पण तसं काही नाहीये रे! मी पूर्वीचाच आहे. तसाच देवभक्तही आहे. फक्त देवाचं रूप बदललंय हे माझ्या लक्षात आलंय आणि तुम्हाला वाटतंय की मी बदललोय. ”
आता मात्र आम्ही पारच बुचकळ्यात पडलो. मानमोड्यांना भ्रम तर झाला नाही ना ही आमच्या मनातली शंका बहुदा आमच्या चेहे-यावर दिसत असावी. कारण आम्हालाच समजावत मानमोडे साहेब पुढे बोलू लागले… ‘‘अरे खरंच सांगतो मी नाही बदललो. पण माझ्या देवाचं रूप मात्र बदललंय ! या नव्या रूपात देव क्षणोक्षणी माझ्या हाकेला धावून येतोय. म्हणून मी निश्चिंत आहे आता. नाही ना कळत? अरे असे घाबरू नका. मी पूर्ण शुध्दीवर आहे म्हटलं. थांबा, आता मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो सविस्तर…”
आता साहेब जरासे सावरून बसले आणि आम्हालाच भांबावल्यासारखं वाटायला लागलं. आम्ही ऐकू लागलो…
‘‘असं पहा, गेल्या ५-६ महिन्यांपासून, माझं मानमोडे नाव सार्थ व्हावं या सद्हेतूने, खरंच माझी मान मोडेपर्यंत बँक मला कामाला लावतीये! पण माझी त्याबद्दल तक्रार नाही. हल्ली वरचेवर पाठ, कंबर दुखते. पण तरीही माझी तक्रार नाही. इतकंच काय, अहो तीन तीन assignments सांभाळता सांभाळता माझं बी. पी. ही वाढू लागलंय, रोज डोकंही दुखतंय. पण तरी मी चिंता करत नाही. अधूनमधून साखर वाढते, छातीचे ठोके अनियमित होतात पण तरीही मी.. माझं मन शांत रहातं ! का? कारण मला साक्षात्कार झालाय ना! अहो कसला काय? थोडं डोकं चालवा कधी तरी! अरे आता माणसांमध्ये देव शोधण्याचे दिवस नाही राहिले पूर्वीचे. आता देव निर्जीव वस्तूंच्या रूपानेही भेटतो म्हटलं ! सतत, आणि पूर्वीपेक्षा जास्त वेळा भेटतो मला तर तो. कुठे? अहो कुठे काय? त्याची किती रूपं गच्च भरलीयेत माझ्या ड्रॉवरमध्ये….. या गोळ्यांच्या, मलमांच्या रूपात ! आता तरी आलं की नाही काही ध्यानात?”
ड्रॉवर पुढे ओढून मानमोड्यांनी आतल्या देवदेवतांना एक उडता नमस्कार केला आणि ते पुढे बोलू लागले…
‘‘अहो, इतके महिने, काय वाट्टेल ते झालं तरी हा कामाचा गाडा मी ओढू शकतोय तो कोणाच्या जीवावर! आं! सांगा ना, या माझ्या कलियुगीन देव-देवतांचा तर धावाही नाही करावा लागत. उलट माझ्या दिमतीलाच जणू ते तयारच आहेत माझ्या ड्रॉवरमध्ये. या औषधांच्या रूपात! मग आता मला कसली काळजी? आता आणखी परत V. R. S. येऊ दे, परत त्यात मी reject होऊ दे. काही problem नाही. काम सहापट वाढू दे. No problem at all, कितीही काम पडू दे, कितीही दुखणी येऊ देत. चिंता नाही. माझा हा देव माझ्या मदतीला already धावून आलेलाच आहे. आणि सर्व संचारी आहे ना तो! माझ्या ड्रॉवरमध्ये राहतोय, माझ्या बॅगेत रहातोय. घरातल्या औषधाच्या पेटीत तर रहातोयच – अगदी ‘घरजमाई’ असल्यासारखा. आणि हो, माझ्या original देवात आणि माझ्यात आणखी एक गुपीत आहे बरं का! पण आता सांगूनच टाकतो तुम्हाला…
त्या देवाने मला promise केलंय, की जेव्हा मी त्याच्या या वर्तमानरूपांना कंटाळेन ना तेव्हा तो स्वत: येऊन, अगदी गुपचुप मला त्याच्या घरी घेऊन जाईल. मी जेथे असेन तेथून, अगदी on duty असलो तरीही. आणि अगदी या कानाचं त्या कानालाही कळू न देता… तेव्हा आता बोला. आणखी काय पाहिजे मला. तेव्हा हे पहा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. मी पूर्वीसारखाच आता शांत आहे, आनंदी आहे आणि हो, देवभक्तही आहे. पटली ना खात्री?”
हे इतकं सगळं ऐकून बहुधा आम्हालाही जाणवलं की, अरेच्चा, असं असेल, तर मग आपल्यालाही भेटतोच आहे की देव अधून मधून, या नव्या रूपात !
आमच्या चेहे-यावरचे झरझर बदलणारे भाव आणि नकळत ‘हो-हो’ म्हणणारी आमची हलती मान पाहून मानमोडे खूष झाले. त्यांच्या या देवाला आणखी भक्त मिळाले, मिळतच रहाणार याची खात्री वाटण्यासारखीच परिस्थिती होती ना !
आमच्या या असल्या अवस्थेत, मग हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवून, मानमोडे साहेबांनी जणू order च सोडली. हं, आता म्हणा माझ्या बरोबर…
मान दुखतेय? जय moov… जय Voreran
डोकं दुखतंय? जय जय झंडू बाम… जय डिस्प्रिन…
पाठ दुखतेय? जय ब्रूफेन
ताप आलाय? जय क्रोसीन
बी. पी. वाढतंय? जय जय स्टॅमलो… जय कार्डोज
साखर वाढली? जय इन्सुलिन, जय जय Glynase
पित्त वाढलं? जय जय जेल्युसिल, जय भोले सूतशेखर
कंबरदुखी? जय जय लम्ब्रील
आणि हो… विसरू नका…
देवाची ही इतकी रूपं एकाचवेळी अनुभवण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल…
बोला V. R. S. की जय…
स्टेट बँक माता की जय…
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈