? जीवनरंग ❤️

☆ EQ, दूधवाला आणि फ्री पिझ्झा…भाग -1 ☆ योगिया

EQ (Emotional Quotient), दूधवाला आणि फ्री पिझ्झा

परवाचीच गोष्ट. आम्ही दोघे एका लेक्चर ला जायचे होतो. ““How to improve the EQ (Emotional Quotient) of your child”. महत्वाचा विषय होता. विशेषतः घरात २ टिनेजर्स असताना तर नक्कीच. आमची गडबड असल्यामुळे ‘चान्स पे डान्स’. दोघांनी मिळून आमच्याकडून पिझ्झा ऑर्डर करून घेतला होता. ‘डिलिव्हरी इन हाफ ऍन अवर ऑर १ लार्ज पिझ्झा फ्री’ अशी काहीतरी स्कीम होती’. ६ वाजेपर्यंत पिझ्झा येणे येणे अपेक्षित होते.  ५.५५ झाले तशी दोघांची घालमेल सुरु झाली. आणि मनोमन प्रार्थना कि अजून ७ मिनिटाने येवू दे म्हणजे एक लार्ज पिझ्झा फ्री मिळेल. खरं तर आम्ही जेव्हा जेव्हा पिझ्झा ऑर्डर करतो तेव्हा नेहमी थोडा जास्तीचा असतोच कारण तास -दोन तासाने १-२ स्लाईस ची भूक लागतेच. तरीपण आमचीच मुलं, त्यामुळे काही फ्री म्हंटलं कि मोह होतोच , सोडवत नाही. ६.०५ झाले आणि चिडचिड सुरु झाली. ६.१५ झाले तरी पिझ्झाचा पत्ता नाही. नुसता त्रागा. बाबा आपण डॉमिनोज ला ‘सू’ करूया, छोटे चिरंजीव म्हणाले.  आई तू कस्टमर सर्व्हिस ला फोन लाव आणि कंप्लेंट कर, त्यांना सांग इट इज टू लेट , दे शुड गिव्ह २ फ्री पिझ्झाज –  मोठे चिरंजीव. आम्हाला पण निघायचे होते. उशीर होत होता..चिडचिड.  झेपत नाही तर कशाला कंमिटमेन्ट देतात. आमचे आजोबा शांत पणे सोफ्यावर बसून सगळं पहात होते , ऐकत होते. आमची चिडचिड पाहून त्यांचंही लक्ष  फाटकाकडे लागलं होतं.

“आबा..आम्ही निघतो….उशीर होतोय. पिझ्झा येईलच. पैसे पेड केले आहेत.  मुलं घेतील पण जरा त्याला दरडावून विचारा उशीर का झाला ते आणि तो फ्री पिझ्झा द्यायला सांगा.”

ते फक्त हसले. आम्ही निघालो.  रात्री उशिरा आलो. आबा झोपले होते.  आल्यावर मुलांना विचारलं कि “कधी आला पिझ्झा?, फ्री मिळाला का??”

दोघे शांत होते. “छान होता पिझ्झा. आम्ही फ्री मागितलाच नाही.”

“का??”

६.४० ला पिझ्झा वाला मुलगा आला. मी आणि दादू आंगावरच धावलो त्याच्या. दादू पेक्षा थोडाच मोठा होता. घाबरला होता. सॉरी सॉरी म्हणत होता. प्लीज कंप्लेंट करू नका म्हणाला. तेवढयात आजोबा आले आणि आम्हाला ओरडले गप्प बसा. त्याला विचारलं “कारे बाबा लंगडत आलास, मी पहात होतो. सगळं ठीक ना? “

तो हो म्हणाला. तेवढयात आजोबांचं लक्ष त्याच्या पॅन्ट कडे गेलं. गुडघ्यावर फाटलेली..थोडंसं रक्त लागलेलं. मग आजोबांनी त्याला आत बोलावलं. पॅन्ट वर करायला सांगितली. जखम झाली होती रक्त वहात होतं.

“काय झालं?”

साहेब घाईत येत होतो. एका वळणावर गाडी स्लिप झाली. पडलो. अजून दोन जणांना धडकलो. ते सगळं निस्तरता निस्तरता उशीर झाला. पण पिझ्झा मागे पेटित  होता. तो तसाच राहिला. कदाचित फक्त टॉपिंग्स थोडी सुट्टी झाली असतील. सर प्लीज कंप्लेंट करू नका. रिमार्क देतात आणि अर्धा पगार पण कट करतात. आणि त्याने आमच्याकडे बघून हात जोडले.

“अरे माफी कसली मागतोस. माझ्या नातवा एवढा आहेस तू ” “दादू जा डेटॉल -कापूस घेऊन ये.” आजोबांनी त्याला ड्रेसिंग केलं. त्याच्यासाठी चहा केला. त्याला एक पण एक पीस पिझ्झा खायला दिला . तो आजोबांच्या पाया पडला आणि गेला.

क्रमशः…

– योगिया

०१ जून २०२२

([email protected] / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments