डॉ. श्रीमती तारा भावाळकर

संक्षिप्त परिचय

जन्म – 1 एप्रिल 1939

एम.ए. पी एच.डी. पुणे विद्यापीठ, हिन्दी पंडीत, अनुवाद पंडीत

शालांत शिक्षणानंतर सर्व शिक्षण बहिस्थ पद्धतीने. नोकरी करत.

विशेष अभिरुची – नाटक, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लेखन, भाषण, दिग्दर्शन, अभिनय , समीक्षा, संशोधन, अनेक चर्चासत्रातून सहभाग, अनेक भाषणे, राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावर शोधांनिबंध सादर. लोकसाहित्याची स्त्रीवादी समीक्षा हे नवे संशोधन लेख, समीक्षा, संशोधन, कथा, व्यक्तिचित्रे इ. विविध विषयांवर 36 च्या वर पुस्तके प्रकाशित

पुरस्कार – काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कारासह 32 च्या वर पुरस्कार

अध्यापन हा व्यवसाय.  सध्यानिवृत्त

संपर्क – 3, ‘स्नेहदीप,’ डॉ.  आंबेडकर रास्ता , सांगली 416416 दूरभाष – 0233 2373326 भ्रमणध्वनी – 9881063099

श्रीमती उज्ज्वला केळकर

 ☆ आत्मसाक्षात्कार – डॉ. ताराबाई भावाळकर – भाग १ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना! डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने कलमक्षेप केला आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या.

  – उज्ज्वला केळकर 

काय आहे, मीच माझी मुलाखत घ्यायची म्हणजे… आपण बोलायला लागलं की आत्मप्रौढी येते पण ७५ वय ओलांडल्यानंतर आपल्या परंपरेप्रमाणे वानप्रस्थ सुरू होतो. माझा वानप्रस्थ सुरू होऊनसुद्धा आता ७ वर्षे झाली. हा काल आहे माझ्यातली ‘मी’ संपवायचा. विनोबाजी स्वत:ला तृतीय पुरुषी संबोधत असत. म्हणजे, विनोबा असं म्हणतो…. विनोबा तसं म्हणतो. तसंच आज मला ताराबाई या रूढ नावाने ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीला काही प्रश्न विचारायचे आहेत. अपेक्षा अशी ताराबाई प्रामाणिक उत्तरे देतील.

तारा – ताराबाई तुम्हाला लेखक बिखक म्हणून म्हणून ओळखतात. म्हणून त्यांनी हे मुलाखतीचं प्रयोजन मांडलं. तर असं काय लिहिलंत हो तुम्ही?

ताराबाई – १९७५ पासून म्हणजे वयाच्या ३४व्या वर्षापासून वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत एकूण ३५-४० पुस्तके ताराबाईंच्या नावावर आहेत.

तारा – लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून लोक तुम्हाला ओळखतात. सगळं लेखन याच विषयावर आहे का तुमचं?

ताराबाई – नाही. नाही. ताराबाईंची पहिली अभिरुची आहे नाटक. सुरुवातीचं प्रकाशित झालेलं पुस्तक एक एकांकिकाच आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली. पीएच. डी. चा संशोधनाचा विषय नाटकचं आहे. त्यापूर्वीही नाट्यविषयक  दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. ‘यक्षगान आणि मराठी रंगभूमी वगैरे…

नाट्याभिनय ही मूळची आवड. हौशी रंगभूमीवर १४ वर्षे विविध भूमिका केल्या. दरवर्षी वैयक्तिक अभिनयाचा पुरस्कारही मिळवला. १९७५ साली एका भूमिकेसाठी राज्यनाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्यपदकही  मिळाले. तोपर्यंत नाट्याचा आणि नाटकाचा संस्थात्मक अनुभव, दिग्दर्शन वगैरे येत गेलं. त्यानंतर मात्र रंगमंचावरील अभिनय सोडला आणि संशोधन सुरू केलं. त्यावेळी इतरांना संधी द्यावी, असा ताराबाईंचा हेतू होता. शिवाय, नोकरी आणि त्यातल्या अडचणी याही होत्याच.

तारा – बरं! तुमच्या नाट्यविषयक पुस्तकांसंबधी जरा विस्ताराने सांगाल का?

ताराबाई – काय आहे, ताराबाईंचे वर्गात जाऊन घेतलेले शिक्षण हे केवळ शालेय शिक्षणापुरतेच मर्यादित होते. नंतर वयाच्या १८ वर्षापासून ते ६० वर्षापरायांत, म्हणजे ४२ वर्षे त्यांनी नोकरी करत करतच परीक्षा दिल्या. शिकण्यासाठी महाविद्यालयात त्या कधीच गेल्या नाहीत. महाविद्यालयात त्या गेल्या, ते एकदम शिकवायलाच. मग तिथे नाट्यविषयक संशोधन हे एक प्रकरण आलं. त्यावेळी नाट्यविषयावर एक प्रबंध लिहिला, तो म्हणजे,’ मराठी पौराणिक नाटकाची जडण घडण – प्रारंभ ते १९२०’॰  शिकायला एकही दिवस महाविद्यालयात न जाणार्‍या ताराबाईंना, पुणे विद्यापीठात उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला. पुढे त्या लिखित प्रबंधाचं पुस्तक झालं. त्याचं नाव ‘मिथक आणि नाटक’. त्यानंतर लोकनागर रंगभूमी, मराठी नाटक वाटा आणि वळणे, नाट्याचार्य खाडीलकरांचे चरित्र वगैरे नाट्यविषयक पुस्तके झाली. लोकनागर रंगभूमी या विषयावर पुणे विध्यापीठात रानडे व्याख्यानमालेत व्याख्यानेही झाली.

तारा – हे सगळं नाटकाविषयी झालं, पण मग लोकसाहित्याकडे कशा गेलात?

ताराबाई – ताराबाई गेल्या-बिल्या नाहीत. त्या त्याच्यात होत्याच. त्या लोकसंस्कृतीतच जन्मल्या. लोकसंस्कृतीतच वाढल्या. त्याचे अनुभव अबोधपणे मनाच्या तळाशी कुठे तरी साचले असावेत. त्यात मग, लोकसाहित्य’ हा विषय महाविद्यालयात शिकवायची वेळ आली. मग तात्विक अभ्यास करायला सुरुवात झाली. त्याच्यातच पुढे अंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्ष नावाची भानगड आली. तेव्हा मग लोकपरंपरेतील जी स्त्री आहे, तिच्यावबद्दल काही तरी लिहावसं वाटलं.

तारा –म्हणजे ताराबाई तुम्ही एकातून दुसरीकडे भरकटत गेलात म्हणा की! एकीकडे तुम्ही स्वत:ला स्त्रीवादी म्हणतात, तिकडे गेलात, नाटकात पण गेलात आणि हे नंतर लोकसाहित्य.

ताराबाई – काय आहे ताराबाई अखंड भरकटतच राहिल्या आहेत. एकातून दुसरं असं काहीच नाही. एकाच वेळेला अनेक विषय आणि विचारांचे गुंते ताराबाईंच्या डोक्यात असतात. त्यांचं परस्पर अभिसरण, आवक—जावक चालू असते. त्यामुळे अमूक एक विषय खुंट्यासारखा घट्ट धरला. त्यावर लेखन केलं, पुस्तक तयार झालं, असं काही ताराबाईंच्या बाबतीत झालं नाही. त्यांचं नाट्यविषयक लेखन चालू असतं, त्याचवेळी लोकसाहित्यावर लेखन चालू असतं, त्याचवेळी स्त्रीविषयक एखादा विचार डोक्यात आला की त्यावर लेखन सुरू होतं. एकाच वेळेला अनेक विषय डोक्यात असतात आणि लेखनामध्येही असतात. त्यामुळे एकातून दुसरं वगैरे काही होत नाही.

नाटकाचा अभ्यास करताना, लोकरंगभूमीचा विचार करणं अपरिहार्य होतं. मग त्याच्यातच लोकपरंपरेतील स्त्री आणि नंतर ७५ मध्ये आलेला स्त्रीवाद ताराबाईंना लोकसाहित्यातही जाणवायला लागला.

तारा – म्हणजे काय ताराबाई, जरा उलगडून सांगा ना!

क्रमश  ….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments