सुश्री सुमती जोशी
☆ आत्मसंवाद – फिरुनी नवी जन्मेन मी – भाग दुसरा ☆ सुश्री सुमती जोशी ☆
जीवनात बरेचदा योगायोगानं घटना घडत असतात. आपण मात्र सगळ्याचं श्रेय घ्यायला टपलेले असतो. यात गैर काही नाही. तो मनुष्य स्वभाव आहे. नाना जोशी यांनी मला ‘उत्क्रांती’ या विषयावर लिहायला सांगितलं. उत्क्रांती हा विषय आकाशाला गवसणी घालण्यासारखा. ‘उत्क्रांतीचा डार्विनने मांडलेला सिद्धांत’ हा नानांना अभिप्रेत असलेला विषय होता. मी त्याला आधुनिक विज्ञानाची जोड द्यायचे ठरवले. म्हणजेच जनुकीय शास्त्रानुसार डी.एन.ए. आर.एन.ए. या रेणूंची रचना कशी असते, जनुक म्हणजे काय, याचा सगळ्यांना समजेल असा अर्थ सांगायचा. संशोधनाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी व्हावा असाच उद्देश असतो. या संशोधनाचा उपयोग माणसांचं जीवनमान उंचावायला, जीवन सुसह्य व्हायला झालाय का? हे मुद्दे विचारात घेऊन त्यांचा उहापोह करावा अशी माझ्यापुरती सीमारेषा मी आखून घेतली.
या विषयाकडे वळण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगायला हवा. माझ्या घराजवळ असलेल्या एका शाळेत राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी वर्ग चालवले जात. इयत्ता आठवी आणि नववीचे विद्यार्थी त्यात सहभागी होत. सी.बी.एस.सी.च्या बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम यात समाविष्ट केलेला असे. इतका विस्तृत अभ्यासक्रम आठवी आणि नववीच्या मुलांच्या गळी उतरवणं ही तारेवरची कसरत होती. पश्चिम उपनगरातल्या विविध शाळातली हुशार मुलं इथे प्रवेश घेत. शिवाय नाममात्र पैसे मिळत असल्यामुळे खरी आवड असणारी माणसंच इथे शिकवायला येत. हे वर्ग दुपारी एक ते पाच या दरम्यान असल्यामुळे ही वेळ माझ्यासारख्या गृहिणीला सोयीची होती. शिवाय मायक्रोबायॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या विषयातली पदवीधर असल्यामुळे मी शिकवू शकेन असा मला विश्वास वाटत होता. हे काम मी एकूण एकवीस वर्षे करत होते. साहजिकच डार्विनचा उत्क्रांतिवाद, जनुकांचा शोध, मूळ रेणूंची रचना याविषयी मला सखोल ज्ञान होतं. हे अवघड विषय आठवी, नववीच्या पातळीवर जाऊन सोपे करून कसे शिकवावेत याचं तंत्र मी माझ्यापुरतं विकसित केलं होतं. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावर पुस्तक लिहितांना मला याचा अतिशय उपयोग झाला.
या विषयावरची अनेक पुस्तकं एशियाटिक सोसायटीच्या वाचनालयात होती. त्यांचं अभ्यासपूर्ण वाचन मी सुरू केलं. माझ्या स्वत:च्या नोट्स काढू लागले. सुमारे वर्षभर अभ्यास करून पूर्वतयारी केल्यावर मी प्रत्यक्ष लिहायची सुरुवात केली. संगणक युगाचा प्रारंभ झाला होता. आमच्या घरी डेस्क टॉप घेतलेला होता. त्यावर मराठी फॉन्ट डाऊनलोड करून कसं लिहायचं ही साक्षरता व्हायला हवी होती. म्हणजे हा मुळारंभ आरंभ…होता. ते साध्य झाल्यावर मी लिहू लागले. काही नवीन पुस्तकं खरेदी केली. एकीकडे तेही वाचन चालू होतं. जुन्या लेखनात नव्याची भर पडत होती. संगणकावर लेखन करत असल्यामुळे कापा-चिकटवा-गाळा-पुसा या गोष्टी अनायासे करता येत होत्या. लिहिता लिहिता पृष्ठसंख्या तीनशेच्या वर गेली. अर्थात एडीटिंग करणं अत्त्यावश्यक ठरणार होतं. त्यासाठी मला माझ्या यजमानांची मोलाची मदत झाली. एकशे सत्तर पानांत हा सिद्धांत मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि हे पुस्तक राजहंस प्रकाशनाकडे पाठवलं. ते दोन हजार आठ साल असावं. राजहंसचे डॉक्टर सदानंद बोरसे यांनी त्याला मान्यता दिली. दोन हजार दहा या साली डार्विनचा सिद्धांत प्रकाशित झाल्याला दीडशे वर्षे होत होती. डिसेंबर महिन्यात ‘उत्क्रांती’ हे मी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं. या विषयावर तोपर्यंत मराठीत काही लिहिलं गेलं नव्हतं. डार्विन म्हटला म्हणजे लोक त्याच्या बीगलच्या रोमांचकारी सफरीचा वृत्तांत लिहित, पण कोणीच त्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत सोपा करून लिहिला नव्हता आणि जनुकीय विज्ञानाशी त्याची सांगडही घातली नव्हती. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही निघाली. राज्य शासनाच्या त्या वर्षीच्या विज्ञान पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड झाली. अनेक योगायोग जुळून आल्यामुळे हे लेखन करता आलं. अर्थात त्याला अभ्यासाची आणि अथक परिश्रमांची जोड द्यावी लागली होती.
क्रमश:….
© सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈