सुश्री सुमती जोशी
☆ आत्मसंवाद – फिरुनी नवी जन्मेन मी – भाग तिसरा ☆ सुश्री सुमती जोशी ☆
आई म्हणून घडत असताना आपली मुलं आपल्याला अनेक धडे देत असतात. आपण शिकत जातो, साच्यात बंदिस्त न होता स्वत:ला नव्यानं घडवू लागतो. वयानं लहान असली तरी कधीकधी ती आपल्याला नवीन काहीतरी सुचवत असतात. माझ्याही बाबतीत तसंच काहीसं घडलं. माझा धाकटा मुलगा आँकॉलॉजी या विषयात सुपर स्पेशलायझेशन करायला तीन वर्षांसाठी अहमदाबादला जायला निघाला, सूनही तिच्या पी.एच.डी.च्या कामात व्यस्त होती. निघतांना तो मला म्हणाला, “आई, मी आता तीन वर्षे इथे येणार नाही. तुला काही करायचं असलं तर कर.” हे वाक्य माझ्या जीवनाला कलाटणी देणारं ठरलं. उत्क्रांती लिहून झाल्यावर आलेलं रिकामपण खायला उठत होतं. एखादी नवीन भाषा का शिकू नये? असं वाटल्यावर शोधाशोध सुरू झाली. गोरेगावला प्रतिमा गोस्वामी एका म्युनिसिपल शाळेत बंगालीचे वर्ग घेत असत. त्यांना फोन लावला, पण सप्टेंबर महिना उलटून गेला असल्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारला. चिवटपमाणे परत फोन केला. जूनमध्ये वर्ग सुरू झालेले असल्यामुळे चार महिने बरंच काही शिकवून झालं होतं. ते मी पुन्हा शिकवणार नाही, या अटीवर मला एकदाचा प्रवेश मिळाला. पुस्तकं कोलकात्यावरून मागवावी लागत असल्यामुळे त्याही बाबतीत ‘आनंद’च होता. पण झेरॉक्सची सोय असल्यामुळे तोही अडथळा सहज पार करता आला. शाळा, धुळीने भरलेले वर्ग, छोटया मुलांना बसता येईल असे लहान लहान बेंचेस वगैरे अडचणींकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. बंग भाषा प्रचार समितीतर्फे चालवलेल्या या कोर्समध्ये प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे तीन परीक्षा द्यायची सोय होती. माझ्यापाशी तीन वर्षांचाच कालावधी होता. अर्जुनाला दिसणाऱ्या पक्ष्यांच्या डोळ्याप्रमाणे माझी मानसिकता झाली होती. अक्षरं गिरवणं, जोडाक्षरं लिहिणं, अकारांत, आकारांत या क्रमाने शब्द, छोटी वाक्यं असं लेखन चालू होतं. पहिली परीक्षा पार पडली. दुसऱ्या परीक्षेचे वर्ग सुरू झाले. पण विद्यार्थ्यांची संख्या विसावरून तीनवर रोडावली. प्रतिमादीही वयोवृद्ध होत्या. शाळा उघडण्याचा व्याप त्यांनाही नकोसा वाटत असावा. त्यांच्या घरीच क्लास होऊ लागले. लहानशा गॅलरीतल्या बिछान्यावर दीदी स्थानापन्न होत आणि आम्ही भोवताली. दुसऱ्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं इयत्ता आठवीला शोभतील अशी. साहजिकच दीदींना अभ्यासक्रम पूर्ण करायची घाई असे. बंगाली सोडून इतर भाषेतला एकही शब्द त्या उच्चारत नसत. प्राण गोळा करून कान देऊन ऐकायचा आम्ही प्रयत्न करत होतो. बोलायला फारसा वाव नसे. प्रश्नांची उत्तरं लिहिणं, निबंधलेखन, पत्रलेखन, सारांशलेखन असे अनेक विषय अभ्यासात होते. दिदींनी आम्हाला सर्वात चांगली सवय लावली. त्यांनी कधीही उत्तरं डिकटेट केली नाहीत. ‘तुम्हाला येईल तसं लिहा, मी तपासून देईन’ हे त्यांचं घोषवाक्य. त्यामुळेच आम्हाला स्वत: विचार करून लिहायची सवय लागली. दुपारी तीन ते पाच, आठवडयातून दोन वेळा क्लास होत. संसार सांभाळून जमेल तसा अभ्यास. तिसऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम मारुतीच्या उड्डाणासारखा. गीतांजली, कादंबरी, नावाजलेल्या लेखकांच्या कथा. प्रश्नोत्तरांबरोबर काव्याचा अर्थ, समीक्षा, कादंबरीतल्या व्यक्तिरेखांचं विवेचन, निबंध, कल्पनाविस्तार आणि व्याकरण याचाही समावेश होता. सायन्सची डिग्री घेतलेल्या माझ्यासारखीला हे फारच डोईजड होणारं होतं. अभ्यास करायची तयारी होती. माझ्या वयाच्या साठाव्या वर्षी मी लेखी आणि तोंडी दोन्ही परीक्षा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांमधून पहिला क्रमांक मिळाल्याचा दीदींचा फोन आला. ते साल होतं २०१०. तीन वर्षे केलेला आटापिटा सुफळ संपूर्ण झाला. सहज म्हणून मी एका कथेचा अनुवाद केला. तो प्रकाशित झाला. तेव्हापासून अनुवाद करायचा नाद लागला. या एका दशकात मी अनुवाद केलेली सात पुस्तकं-बंगगंध, सुचित्रा भट्टाचार्य यांच्या निवडक कथा भाग १ आणि २, वसुधारा, तुटलेली तार, आकाशप्रदीप या कादंबऱ्या आणि ‘काही जमणार नाही तुला’, ही छोट्यांची कादंबरी उन्मेष प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली. बुकगंगावर ती उपलब्ध आहेत. साठोत्तरीचा हा प्रवास म्हणजे आनंदयात्रा.
समाप्त
© सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈