श्रीमती अनुराधा फाटक
☆ आत्मसंवाद – प्रत्येकाच्या मनात एक लेखक लपलेला असतो – भाग 1 ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
प्रत्येकाच्या मनात एक लेखक लपलेला असतो. योग्य वेळ येताच त्याची लेखणी त्याला स्वस्थ बसू देत नाही जणू लेखकाची लेखणीच त्याचे एक मन असते. माणसाचे सहावे इंद्रिय हे त्याचे मन असते अशी दोन मने लेखकाला लेखन प्रवृत्त करत असतात.
उगार या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गावी माझी नोकरी सुरु झाली आणि शाळेत मुलांना मराठी शिकवताना माझी ही दोन्ही मने सावध झाली. कानडी भाषेचा प्रभाव येथील मराठीवर असल्याचे मुलांना मराठी समजावून सांगताना जाणवले तशी माझी दोन्ही मने मला गप्प बसू देईनात.
मी- भाषा सुधारेल असं मुलांसाठी काहीतरी करायला हवं.
लेखणी- अगं मी आहे ना तुझ्या हातात मग गप्प कां बसलीस
मी- तू मला थोडीच गप्प बसू देशील?
लेखणी- मग घे ना कागद..
मी- आणि खरोखरच मी शब्दांचे अनेक अर्थ, वाक्प्रचार यांचा वापर करून दैनंदिन जीवनातले शब्द लिहिले.’शब्द लहरी ‘ हे माझे पहिले पुस्तक तयार झाले.शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वासाठी ते उपयुक्त ठरलेल्या या पुस्तकाला भारतीय शिक्षण मंडळाचा पुरस्कार मिळाला.
कुणीतरी सुचवावं, मी विचार करावा आणि लेखणीने कागदावर उतरवावे अशी माझी साहित्य निर्मिती!
एकदा शाळेत शिक्षकांची शेतकरी जीवनावर चर्चा झाली आणि माझ्या मनात शेतकरी आणि शिक्षक यांची तुलना सुरु झाली.
लेखणी- आज काय आहे डोक्यात?
मी- शेतकरी आणि शिक्षक यांची तुलना
लेखणी- मी आहेच लिहायला
मी- तेच करणार आहे शिक्षक आणि शेतकरी यांच्यात साम्य दाखविणाऱ्या ‘जडणघडण’ पुस्तकाची निर्मिती झाली.त्यालाही भारतीय शिक्षण मंडळाचा पुरस्कार मिळाला. इतिहास शिकवताना रामायणाचा उल्लेख आला तेव्हा विष्णूच्या अवताराबद्दल मुलांना विचारले असताना त्याना काही माहिती नसल्याचे लक्षात आले मुलांसाठी ‘दशावतार’ लिहिले त्याला संत, साहित्याचा पुरस्कार मिळाला.त्यानंतर श्रीमती लीला दीक्षित यांच्या सांगण्यावरून बालमन आणि बालसाहित्य ‘असे लेखन केले. समर्थांच्या शिष्यपरंपरेबद्दल लिहा असे काही जणांनी सुचविले तेव्हा ‘समर्थांची प्रभावळ’ पुस्तक लिहिले.
‘भारुडातून नाथदर्शन ‘ या पुस्तकातून भारुडांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला. औषधाशिवाय आजीजवळ बरेच असते ते ‘आजीचा बटवा’ मधून व्यक्त झाले. माझे प्राध्यापक श्री कुंदत सर यांच्या सांगण्यावरून लिहिलेले ‘महानुभाव साहित्यातील बालजीवन’ हे पुस्तक महानुभाव संप्रदायाचे संदर्भ ग्रंथ ठरले.आपण वर्षानुवर्षे हदग्याची गाणी म्हणतो पण अर्थ माहीत नसतो त्या गाण्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ‘ हदगा ते महाहदगा’ मध्ये केला.’विणतो कबीर शेले’ हे कबीरावर वेगळे लेखन केले. रावा प्रकाशकांच्या सांगण्यावरून ‘ दत्त संप्रदायातील त्रिमूर्ती आणि समर्थशिष्य कल्याण ही पुस्तके लिहिली. अशी माझी वैचारिक साहित्य सेवा!
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈