श्रीमती अनुराधा फाटक

☆ आत्मसंवाद – प्रत्येकाच्या मनात एक लेखक लपलेला असतो – भाग 2 ☆ श्रीमती अनुराधा फाटक 

लेखणी- माझ्याशी अशी खेळत कां बसलीस?

मी- खेळत नाही.विचार करतेयं

लेखणी- कसला विचार?

मी- एवढी मोठी युगंधर कादंबरी वाचली त्यात कृष्णाच्या जीवनातील स्त्री मला आढळली नाही. मला फार राग आला आहे.

मी लेखणीशी बोलत असतानाच मोबाईल वाजला. श्री.कुंदपसरांचा फोन होता. ते काही बोलण्यापूर्वीच त्यांना मी वाचलेल्या युगंधर कादंबरी बद्दल माझे मत सांगितले , ‘ सर, मला कृष्णाच्या जीवनातील स्त्रियांबद्दल लिहावेसे वाटते’ लेखणीकडं बघत मी बोलले ‘तुम्ही लिहा.. मी प्रस्तावना देतो. ‘ कामाबद्दल बोलून त्यांनी फोन ठेवला.

लेखणी- झालं कां समाधान, गेला कां राग.आता लिही तुला काय हवं ते.मी तयारच आहे.

माझे विचार आणि लेखणीचा झपाटा एकत्र आले. ऋणवेध कादंबरीचा जन्म झाला. दोन पुरस्कार घेतलेल्या या कादंबरीचे वाचन,इंग्रजी अनुवादित ऑडिओ बुक प्रसिध्द झाले. एकदा मस्तानी बद्दल संशोधनात्मक वाचले. मला मस्तानी खूपच चांगली वाटली. तिला न्याय मिळावा असे वाटू लागले.

लेखणी- झाला ना विचार, आता  घे मला हातात आणि काम सुरु कर. लेखणीने राऊप्रिया कादंबरी  स्वीकारली. कादंबरी लेखन चालू असताना एक  दिवस मिरजेच्या ज्युबेली कन्याशाळेतील जोशीबाई माझ्याकडे आल्या.

‘ काय लिहिता?’

‘मस्तानीवर कादंबरी!’

मस्तानीवर लिहिण्यापेक्षा  मिरजेतील दुर्लक्षित वेणाबाईवर लिहा’

‘आधी मस्तानीला न्याय देते मग वेणाबाई हातात घेते’ असे मी त्यांना सांगितले.

लेखनाचा विषय डोक्यात घुसवून जोशीबाई गेल्या.

लेखणी- आता काय?

मी- काही नाही. आधी मस्तानीच!

लेखणी- बरोबर आहे. तुला जे आवडते ते आधी. मी तयार आहे.

गंमत म्हणजे राऊप्रिया कादंबरीला मिरजेचाच पुरस्कार मिळाला.

वेणाबाईंची माहिती घेण्यासाठी मी मिरजेतील वेणाबाईंच्या मठात गेले पण निराश होऊन परतले.        

लेखणी- मिळाली कां माहिती?

मी- काहीही मिळाले नाही

लेखणी- आता वेणाबाई?

मी- वेणाबाईंची इच्छा असेल तर होईल कादंबरी!

खरोखर तसेच झाले. मला माझ्या सासऱ्यांकडून अचानक दासायन हे  समर्थ शिष्यांची माहिती असलेले पुस्तक मिळाले.जुन्या पुस्तक बाजारात त्याना ते मिळाले होते. वेणाबाईची माहिती त्यात होती.बुडत्याला काडीचा आधार ! माझे कादंबरी लेखन सुरु झाले.माझ्या लेखणीने बंधमुक्त कादंबरी लिहून घेतली.तिला संत साहित्याचा पुरस्कार मिळाला. अशीच प्रेरणा मुक्ताबाईच्या लेखनाला मिळाली लेखन झाले आणि अमृत संजीवनी’ या मुक्ताबाई च्या कादंबरीनेही  पुरस्कार घेतला.पाठोपाठ आवलीचा विचार करा म्हणणारे भेटले ‘गुण गाईन आवडी ‘ आवलीच्या जीवनावरची पुरस्कार घेणारी कादंबरी तयार झाली

लेखणी- काय गं  तुझा अभ्यासाचा, विचारांचा झपाटा!

मी-  लिहून कंटाळलीस ना?

लेखणी-  माझं राहू दे.अगं तुझे हात दुखत नाहीत कां?

मी- मुलाने मला कम्प्युटर घेऊन दिला आहे आता तुझे काम कम्प्युटरचा की बोर्ड करेल.

लेखणी- कम्प्युटर असला तरी कधी ना कधी तुला माझी गरज लागेल बरं

मी- नक्कीच, तुला कशी विसरेन?

त्यानंतर खरोखरच कम्प्युटर माझी लेखणी झाला. लेखनाला वेग आला. वरदा, पूर्तता, अनुपमेय, जीवदान, आवर्त, महायोगिनी, शेवटचे घर, कालिंदी या कादंबऱ्या मी कम्प्युटरच्या मदतीने लिहिल्या आता ‘ संत सखू’वर लेखन चालू आहे.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments