श्रीमती अनुराधा फाटक
☆ आत्मसंवाद – प्रत्येकाच्या मनात एक लेखक लपलेला असतो – भाग 3 ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
आकाशातील असंख्य चांदण्या काही ठळक असतात तर काही अस्पष्ट! कथाबीजांचे तसेच आहे. आपल्या अवती भवती अनेक घटना घडत असतात. त्यातील काही प्रत्यक्ष आपल्या जीवनाशी निगडीत असतात तर काही ऐकलेल्या लेखकाला त्यातूनच कथा बीज मिळते आणि तो ते आपल्या प्रतिभा सामर्थ्याने फुलवत असतो अस्वस्थ करणारी कथाबीजे स्वस्थ बसू देत नाहीत.
लेखणी- मी गप्प बसू देणार नाही.
जवळच असलेली लेखणी मला पटकन म्हणाली तसं मी तिच्याकडं पाहिलं
लेखणी- अगं मी म्हणजे तुझा कम्प्युटर गं
मी पटकन जवळची लेखणी कौतुकाने हातात घेतली.
मी- की बोर्ड जवळ तुलाही ठेवीन बरं
कधी लेखणी तर कधी कम्प्युटर यांच्या मदतीने माझे कथालेखन होत होते.
आपोआप हातात येते माझ्या माझे बरेचसे कथालेखन दिवाळी अंकांच्या निमित्ताने झाले. त्यातूनच कथासंग्रह तयार झाले. अंतरीच्या गूढगर्भी,दर्भाचा कावळा, धुक्यातली सावली,ऋणानुबंध, सांजवात,वैदेही, शिळेतील अहल्या,क्षितिज, बाहुली, ब्रह्मकमळ,जीवनगाणं,सार्थक, दोन ज्योती असे माझे प्रकाशित कथासंग्रह असून ब्रह्मकमळ हा पर्यावरण कथांच्या संग्रह आहे.लेखकाच्या लेखनाचा प्रारंभ हा बहुतेक कवितेने झालेला दिसतो.जे न देखे रवी ते देखे कवी अशी सुरु झालेली काव्यरचना अनुभवाने प्रगल्भ होते
लेखणी- कम्प्युटर असतानाही तुझ्या सगळ्या कवितांचे लेखन तू माझ्या मदतीने केलेस याचा मला अभिमान वाटतो
मी- कविता पटकन लिहून होते.तेवढ्यासाठी कम्प्युटरचा सोपस्कार नको वाटतो त्यामुळे तू हातात येतेस’ असे माझे लेखन! आतापर्यंत वादळझेलताना, अंतर्नाद, मनपैंजण, गोंदण असे माझे लहान काव्यसंग्रह असून त्यापैकी ‘अंतर्नाद’ या काव्य संग्रहाला अखिल भारतीय कवियत्री संमेलनाचा सरोजिनी नायडू पुरस्कार मिळाला शिक्षिकेची नोकरी असल्याने मुलांना शिकवितानाच बालसाहित्याची बीजे मनात पेरली गेली आणि मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने बालसाहित्य लिहिले गेले.
लेखणी- कधी कधी शाळेतही तू बालसाहित्य लिहायचीस
मी- ते तुझ्याच मदतीने.
माझ्या बालसाहित्याची सुरवात बडबडगीतांनी झाली. नंतर वेताळाच्या पर्यावरण कथा,गोष्टी निसर्गाशी,बालबोध कथा,साहसी ढब्बू ,खरा शिल्पकार, खरा मित्र,साधू आणि रामू,परीराणीचा फ्रॉक,कष्टाची भाकरी,चार आण्याची चादर,प्रामाणिक छन्नू,लालू आणि सोनपरी,राजाची शाळा , जंगलपुत्र आणि इतर कथा हे कथासंग्रह, गंमतफूल, क्षमा,प्रेरणा या किशोर कादंबऱ्या आणि भारतीय रेल्वेची कहाणी हे माहितीपर पुस्तक हे बालसाहित्य असून गोष्टी निसर्गाशी या पुस्तकाला अखिल भारतीय बाल संमेलन पुणे,बाल साहित्य सभा कोल्हापूर असे तर भारतीय रेल्वेची कहाणी पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला.
माझ्या नातीने बालसाहित्य लिहायला सुरवात केली
लेखणी- तिचे लेखन मीच करते.
मी- हो, ती तुझ्या बरोबर मोबाईलचाही वापर करते.
नातीचे बालसाहित्य सुरु झाले तसे मी बालसाहित्य लेखन बंद केले
माझा साहित्य प्रवास उलगडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈