श्री आनंदहरी

? आत्मसंवाद ? 

☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 1 ☆ श्री आनंदहरी

ज्येष्ठ साहित्यिका, संपादिका  सौ. उज्वलाताई केळकर यांनी ई अभिव्यक्ती आत्मसाक्षात्कार साठी स्वतःच स्वतःची मुलाखत घेण्याबाबत सांगितलं तेंव्हा पहिल्यादा नाही म्हणलं तरी दडपण आले कारण ज्येष्ठतम साहित्यिका तारा भवाळकर यांचा आत्मसाक्षात्कार वाचला होता..त्यानंतरही काही मान्यवरांनी स्वतःच घेतलेली स्वतःची मुलाखत वाचली होती. आणि खरेतर  मुलाखत घेणं आणि देणं याचा फारसा काही अनुभव नसताना ही मुलाखत घ्यायची होती. उज्वलाताईंचा आदेश ..

मग मीच माझे आयुष्य त्रयस्थपणे पाहण्याचा , स्वतःच्याच अंतरंगाशी , वर्तमानासह भूतकाळाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तेंव्हा एकच प्रश्न पडला…

‘नाहीतरी, ‘ मी पणा’ वगळून, स्वतःत त्रयस्थभाव आणून आपण स्वतःशी असा कितीसा संवाद करत असतो ? ‘  ‘मी’ ला टाळता येत नसलं तरी ‘मी पणाला’ टाळण्याचा प्रयत्न करीत आत्मसंवाद साधण्याचा केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे हा आत्मसाक्षात्कार..

मी :- नमस्कार!

आनंदहरी :- नमस्कार !

मी :-  प्रत्येकालाच स्वतःचा जीवनप्रवास हा काहीसा वेगळा आहे असे वाटत असते. तुमचा आजवरचा जीवन प्रवास कसा झाला ?

आनंदहरी :-   आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर भूतकाळ पाहत असतो. आणि म्हणून प्रत्येक पिढीच्या तोंडी ‘आमच्यावेळी असे होते.. तसे नव्हते ‘ असे शब्द असतातच. बदलत जाणाऱ्या काळाबरोबर सुखाच्या, संपन्नतेच्या व्याख्या, परिभाषा बदलत जातात ही जाणीव आपल्याला भूतकाळ आठवताना नसते असे मला वाटते. त्यामुळे भूतकाळ पाहताना त्या काळाचा, स्थिती-परिस्थितीचा आणि भवतालाचे विचार असणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण स्वतःला इतरांहून कुणीतरी वेगळे मानत असतो म्हणून आपला भूतकाळ वेगळा आहे, कष्टप्रद आहे असे वाटत असते. खरेतर अपवाद वगळता समाजजीवन हे तसेच असते. त्यात ‘आपले ‘ म्हणून फारसे वेगळेपण असतेच असे नाही.

माझा जन्म आणि बालपण पेठ सारख्या छोट्या गावात गेले. वडील न्यू इंग्लिश स्कुल, पेठ जि. सांगली या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होते. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाची गंगा खेडोपाडी वहायला सुरवात झाली होती. तो, तो काळ होता. आजूबाजूच्या दशक्रोशीतील खेड्यातील मुले चालत शाळेत येत होती. विद्यार्थ्यांकडे (आणि शिक्षकांकडेही ) सायकल असणे ही अपवादात्मक बाब होती. त्याकाळात आजच्यासारखी वैज्ञानिक प्रगती नव्हती. माणसाच्या गरजा कमी होत्या. साधी राहणी हा विचार मनामनात रुजलेला होता. बालपणापासूनचा जीवनाचा काळ हा सर्वार्थाने सुखद आणि संपन्नतेत गेला. नोकरी हीच उपजीविकेचे साधन असल्यामुळे नंतर विद्युत अभियांत्रिकीतील पदविका मिळवली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विद्युत अभियंता म्हणून नोकरी करून, कौटुंबिक जबाबदाऱ्या फारशा उरल्या नाहीत, पेन्शन नसली तरी मिळणाऱ्या उपदानातून आपण उर्वरित आयुष्य आत्तासारखेच साधेपणाने, सुखाने जगू शकतो असा विचार मनात येताच वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. असे कोणत्याही वळणवाटा न येता आजवरचे संपूर्ण आयुष्य हे सरळ रेषेसारखे व्यतीत झाले आहे.

मी :-  तुम्ही साधेपणाचा उल्लेख केला आहे.. साधेपणा म्हणजे तुम्हांला नेमके काय म्हणायचंय ?

आनंदहरी :- सुख, संपन्नता या गोष्टी त्या काळी पैशाशी जोडल्या गेलेल्या नव्हत्या, खरे तर आजही त्या तशा जोडल्या गेलेल्या नाहीत पण अनेकांना तसे वाटते हे मात्र खरे आहे. माणसाच्या गरजा मर्यादित होत्या.  स्वतःबरोबरच इतरांचा विचार जास्त केला जायचा. सुख आणि संपन्नता ही मनाची स्थिती आहे असे मला वाटते. माणूस जे आहे त्यात सुखी होता. माणूस माणसाशी आंतरिक भावाने जोडला गेलेला होता असा तो काळ होता. माणसाच्या अपेक्षा कमी होत्या. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘ पोटापूरते देई देवा…’ हाच भाव बहुतेकांच्या मनात असायचा. अडी-नडीला माणूस माणसासाठी उभा असायचा. पैशापाठी पळणे नव्हते. बोरकरांच्या शब्दात सांगायचे तर सारे ‘सुशेगात’ होते. कालौघात जीवन आणि जीवनधारणा बदलत गेलीय आणि जात राहणारच तो निसर्ग नियमच आहे.

मी :- तुम्हांला साहित्य लेखनाची आवड  कशी निर्माण झाली ?

आनंदहरी :- गायक हा आधी उत्तम श्रोता असावा लागतो तद्वत लेखक हा आधी वाचक असावा लागतो असे मला वाटते. लहानपणी गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण झाली ती आईमुळे. त्याकाळी चातुर्मासात घरात आणि घराजवळ असणाऱ्या सिद्धस्वामी मठात ग्रंथवाचन चालायचं. श्रावणात ‘ खुलभर दुधाची कहाणी ‘ सारख्या अनेक गोष्टी आई वाचायची त्यामुळे गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण झाली होती. वडील काही कामानिमित्त इस्लामपूर, सांगली, कोल्हापूरला गेले की आवर्जून गोष्टीची पुस्तके आणत  त्यामुळे शाळेत जायला लागण्याआधीपासूनच चांदोबा, छान छान गोष्टी., बिरबलाच्या गोष्टी यासारखी गोष्टीची पुस्तके घरात होती. ती वाचण्यासाठी आम्हा बहीण भावात भांडणेही लागत. नंतरच्या कालखंडात या पुस्तकांबरोबरच बाबुराव अर्नाळकर, एस.एम काशीकर, गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथा वाचण्याचा छंदच लागला. दिवाळीची सुट्टी म्हणजे दीपावली अंक वाचण्याची दिवाळीच असायचीव अजूनही आहे. उन्हाळी सुट्टी म्हणजेही वाचनाचीच दिवाळी. तेंव्हापासून वाचनाची आवड निर्माण झाली. माध्यमिक शालेय जीवनात शाळेच्या समृद्ध ग्रंथालयातून ययाती, अमृतवेल, मृत्युंजय, स्वामी सारखी अनेक पुस्तके वाचायला मिळाली.

नंतर वयोपरत्वे वाचन बदलत गेले. गुलशन नंदा सारख्या लेखकांच्या पुस्तकांसह जे जे हाती पडेल ते ते वाचायची सवय जडली. वृत्तपत्र नियमित घरी येत असे त्यामुळे ते नियमित वाचायची सवय लहानपणापासूनच लागली.

वाचायला सुरुवात केली तसे व्यक्त व्हायलाही सुरवात झाली होती, कविता, गीते ऐकायची आवडही निर्माण झाली होती. त्यामुळे बालपणातच तत्कालीन भावविश्वाच्या कविता.. यमक साधून लिहिलेल्या / रचलेल्या ओळी म्हणूया फारतर .. लिहायची सवय लागली. आठवीत असताना रहस्यकथा लिहिली होती. शालेय नियतकालिकातही लेख, कविता, कथा लिहिल्या होत्या. त्यावेळी कदाचित या नादात माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय हे जाणवून एकदा वडिलांनी सांगितले होते, ‘ मराठीत साहित्य लेखन हे चरितार्थाचे साधन होऊ शकत नाही. उपजीविकेसाठी नोकरी आणि नोकरीसाठी शिक्षण महत्वाचे आहे. साहित्यादी कला या छंद, आवड म्हणूनच ठीक आहेत. ते मनाच्या, विचारांच्या समृद्ध पोषणासाठी हवेतच पण पोट भरणे हेही महत्वाचे आहे.’ मग मात्र शिक्षण पूर्ण होऊन नोकरीत स्थिरसावर होईपर्यंत अभ्यासाकडे लक्ष राहिले. वाचन चालू राहिले तरी लेखन तसे कमीच झाले. नाही म्हणायला कविता,  क्वचित कथा लिहीत होतो.. मित्रपरिवारात त्या वाचल्या जात होत्या पण प्रसिद्धीला कुठं पाठवल्या नाहीत.जेव्हा जमेल तेंव्हा एखाद्या साहित्यिक कार्यक्रमात श्रोता म्हणून उपस्थित रहात होतो.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments