श्री आनंदहरी
आत्मसंवाद
☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 3 ☆ श्री आनंदहरि ☆
मी :- तुम्ही कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या आहेत.. आणखी काही लिहिले आहे का ? आणि ते कुठे कुठे प्रसिद्ध झाले आहे ?
आणि तुम्ही यापैकी नेमक्या कोणत्या साहित्यप्रकारात जास्त रमता किंवा तुम्हाला स्वतःला कोणत्या साहित्यप्रकारात लिहायला जास्त आवडते ?
आनंदहरी :- खरे तर मी शब्दांत आणि माणसांत जास्त रमतो. मला वाटते वेगवेगळे साहित्यप्रकार ही फक्त वेगवेगळी रूपे आहेत याचा आत्मा एकच आहे. आपण व्यक्त होत असतो तेव्हा ते शब्दच स्वतःचे रूप घेऊन येत असतात असे मला वाटते. कथा, कविता, कादंबरी बरोबरच मी एकांकिका लिहिण्याचाही प्रयत्न केला. मराठी- मालवणी बोलीत एक बाल एकांकिका लिहिली होती. ती मार्च २००७ च्या ‘किशोर ‘ मासिकात प्रसिद्ध झाली . ती एकांकिका सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बसवण्यातही आली होती. अनेक मासिके, नियतकालिके अनियतकालिके, दीपावली अंक यामधून तसेच काही वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यांमधून साहित्य प्रसिद्ध झाले आहे. तसे मी फारसे काही लिहिले आहे असे मला वाटत नाही. पाऊलखुणा, वादळ आणि बुमरँग या तीन कादंबऱ्या, ‘ती’ची गोष्ट, राकाण हे दोन कथासंग्रह आणि तू.., कोरडा भवताल व काळीज झुला हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. स्वामी स्वरूपानंदाच्या ‘ श्रीमत् संजीवनी गाथा ‘ वरील लेखमाला, व अन्य साहित्य अद्यापि पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेले नाही.
मी :- तुमचे साहित्य हे नकारात्मक, दुःखांत असते असे म्हणले जाते,त्याबद्दल काय सांगाल?
आनंदहरी :- समाजाला वास्तवाची जाणीव करून देणे, भान देणे हे साहित्यिक, विचारवंत यांचे काम असते असे मला वाटते. वास्तव हे कधीच सकारात्मक किंवा नकारात्मक नसते तर ते फक्त वास्तव असते. पारतंत्र्यातील अन्याय, अत्याचार हे दुःखद होते ते वास्तव समजले नसते तर स्वातंत्र्याचा लढाच उभारू शकला नसता. वास्तव हे सुखद असो वा दुःखद असो ते तसेच मांडले गेले पाहिजे.. वास्तवाच्या यथार्थ जाणिवेतच क्रांतीची बीजे रुजतात असे मला वाटते. साहित्यात कधी समस्या आणि समाधान ही मांडले पाहिजे हे ही खरे आहे पण समाजाला स्वयंविचारी बनवण्यासाठी वास्तवाची परखड जाणीवही करून दिली पाहिजे असे मला वाटते. माणसाच्या जीवनाला विविध रंग असतात, विभ्रम असतात. ते तसे साहित्यात यायला हवेत. माझ्या साहित्यात वास्तव लिहिताना कधी दुःखांत लिहिलं गेलं .. पण दुःखांत म्हणजे नकारात्मक नव्हे.. रात्रीच्या अंधारानंतर जसे उजाडते, विश्व प्रकाशित होते, तसेच दुःखानंतर सुख असते.. ‘ सुख-दुःख समे कृत्वा ‘ असे म्हणलं जातं.. पण आपण सामान्य माणसे त्यामुळे आपल्याला ते समान कसे भासेल? साहित्य हे जीवनस्पर्शी आणि जीवनदर्शी असते त्यामुळे साहित्यात सुख-दुःख येणार तसेच माणसाच्या मनातील सर्व भावभावना, षड्रिपु यांचा समावेश साहित्यात असणारच.. त्यामुळे माझ्या साहित्यात मन व्यथित करणाऱ्या दुःखांत कथा आहेत तशाच हलक्या फुलक्या, मनाला आनंद देणाऱ्या, ताणमुक्त करणाऱ्या मिस्कील कथाही आहेत.
मी :- तुमच्या साहित्यकृतींना काही पुरस्कार मिळाले आहेत त्याबद्दल काय सांगाल?
आनंदहरी :- पुरस्कार किंवा स्पर्धा या लेखनासाठी प्रेरणा देणाऱ्या असतात. आरंभीच्या काळात त्यांची आवश्यकता असते. माझ्या कादंबऱ्यांना, कोकण मराठी साहित्य परिषदेचा कै. वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, नवांकुर पुरस्कार , चिं. त्र्यं.खानोलकर कादंबरी पुरस्कार, कवी अनंत फंदी पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले. त्यामुळे आनंद झाला, लिहीत राहण्याची प्रेरणा मिळाली. आरंभीच्या काळात प्रेरणा मिळण्यासाठी पुरस्कार हे मिळालेले चांगलेच पण पुरस्कार मिळाले तरच ते साहित्य चांगले असते असे मला वाटत नाही. वाचकांचे अभिप्राय, पोचपावती हा मोठा पुरस्कार असतो असे मला वाटते.
मी :- कोणते साहित्य हे चांगले,दर्जेदार साहित्य आहे असे तुम्हांला वाटते?
आनंदहरी :- अमुक एक साहित्य चांगले, दर्जेदार, अमुक हलके असे मी मानत नाही. कारण साहित्य हे समाजाचा, त्यातील व्यक्तींच्या जगण्याचा, त्यांच्या अनुभवाचा,अनुभूतीचा आणि त्यांच्या कल्पनाविश्वाचा आरसा असतो..आणि जीवन काही साचेबंद असत नाही.. ते इतकं वैविध्यपूर्ण आहे की, ते शब्दबद्ध करता येणं काहीसं अवघड आहे. जीवनाचे अनेक पैलू आहेत, असतात. भय हे माणसाच्या मनात, कल्पनेत असतेच मग भय, रहस्यमयता, गूढता हीसुद्धा मानवीजीवनाची अविभाज्य अंगे आहेत मग त्याचा अंतर्भाव असणारे साहित्य हे साहित्य नव्हे काय ? बाबुराव अर्नाळकर यांच्या रहस्य कथांनी, साहित्याने अनेक पिढ्यांना वाचनाची गोडी लावली, ओढ लावली, सवय लावली त्यांना साहित्यिक मानले जात नाही. जगदीश खेबुडकर यांसारख्या दिग्गज गीतकार, कवीला साहित्यिक मानले जात नव्हते ( नाही ) असे जेव्हा ऐकायला,वाचायला मिळाले तेंव्हा खेद वाटला.. जीवनाच्या विशाल, विविधांगी पटाला शब्दबद्ध करणाऱ्या साहित्याला आपण संकुचित तर करत नाही ना ? असे वाटत राहते.
मी :- तुम्ही वाचण्यासाठी पुस्तकांची निवड कशी करता..? निवडक साहित्य वाचता की… ?
आनंदहरी :- निवडक साहित्य वाचतो असे काही जण म्हणतात. निवडक म्हणजे नेमके काय ? ते कोण ठरवते. खूप प्रसिद्धी लाभलेले,चर्चेत आलेले साहित्य म्हणजे निवडक की कुणी शिफारस केलेले साहित्य म्हणजे निवडक ? हे नव्या लिहिणाऱ्यांवर अन्याय करण्यासारखे नाही काय ? निवडकच्या नावाखाली असे नवीन लिहिणाऱ्यांचे साहित्य वाचलं न जाणे संयुक्तिक आहे काय ? न्याय्य आहे काय ? जे उपलब्ध होईल ते निदान वाचून पाहिले पाहिजे.. नाहीच बरे वाटले तर बाजूला ठेवणे हे योग्य आहे. एक इंग्रजी वाक्य आहे, Never judge the book by it’s cover.. मला वाटते हे वाक्य प्रत्येक वाचकाने हे ध्यानात ठेवले पाहिजे. हे खरे आहे की, वाचकाचे मन ज्या प्रकारच्या साहित्यात रमते त्या प्रकारचे साहित्य तो वाचतो, वाचणार कारण ते त्याला वाचनानंद देणारे असते पण त्याचबरोबर इत्तर प्रकारचे, इतर लेखकांचे साहित्य वाचून पाहायला हवे.. किमान पुस्तक चाळले तरी नेमकं काय लिहिलंय, कसे लिहिलंय हे समजू शकते. मी स्वतः सर्व प्रकारची पुस्तके वाचतो. सर्व विषयावरील पुस्तके वाचत असतो.
क्रमशः ….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈