श्री आनंदहरी
आत्मसंवाद
☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 4 ☆ श्री आनंदहरि ☆
मी :- चांगल्या साहित्याचा मानदंड काय आहे किंवा असावा असे तुम्हांला वाटते ?
आनंदहरी :- मला वाटते चांगल्या वगैरे न म्हणता साहित्याचा मानदंड असे म्हणावे. साहित्यिक हा स्वांतसुखाय लिहितो असे म्हणतात आणि ते खरेही आहे. पण एकदा स्वांतसुखाय लिहून झाले की ते वाचकांचे होते. साहित्य हे वाचकाला वाचावेसे वाटणे, त्याने साहित्याशी एकरूप होणे, तद्रूप होणे हा म्हणजे वाचनियता हा साहित्याचा एकमेव मानदंड आहे असे मला वाटतं.. साहित्य आणि मानवी जीवनाचा विचार मनात येतो तेंव्हा मला चक्रधर स्वामींच्या हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ठ आठवते.. साहित्य, मानवी जीवन हे हत्तीसारखे असते आणि आपण असतो पाहणारे, त्याचा अनव्यार्थ लावू पाहणारे, शोधू पाहणारे, त्या गोष्टीतील अंधांसारखे; कारण आपण जे जीवन पाहतो, साहित्य वाचतो, लिहितो ते हिमनगाचे केवळ टोक असते. आणि शाश्वत निसर्ग आणि अशाश्वत माणूस याचा विचार करता ते तसे असणारही आहे.
मी:- तुमची साहित्य लेखनामागची भूमिका काय आहे ?
आनंदहरी :- फक्त साहित्यिक, विचारवंतांचीच नव्हे तर बहुतांशु व्यक्तींची विचार-आचाराची व्यक्तीगत अशी भूमिका असते, जी त्या व्यक्तीच्या संस्कारातून, वाचन, चिंतन, मननातून आणि भवतालीच्या स्थिती-परिस्थितीमुळे, सभोवती घडणाऱ्या घटना-प्रसंगामुळे निर्माण झालेली असते. प्रत्येक साहित्यिकाने स्वतःची अशी स्पष्ट भूमिका घेतलीच पाहिजे असे म्हणले आणि मानले जाते. आणि ते खरेही आहे. पण मला वाटते आपली जी भूमिका असेल तिच्या केंद्रस्थानी माणूस असायला हवा.. आणि ती भूमिका काळाच्या कसोटीवर प्रत्येकवेळी घासून पाहिली पाहिजे. काल घेतलेली भूमिका आज जर निरर्थक ठरत असेल तर आपल्या भूमिकेवर आपल्या मनात विचारमंथन होऊन ती जर त्याज्य ठरत असेल तर हटवादीपणाने किंवा स्वयंअहंकाराने त्या भूमिकेला चिकटून न राहता ती भूमिका बदलणे उचित व न्याय्य असते.
मी :- साहित्य आणि जात, धर्म, पंथ याबद्दल तुमचे विचार काय आहेत ? साहित्यिक म्हणून तुमची जबाबदारी काय आहे असे तुम्हाला वाटते.
आनंदहरी :- जात, धर्म, पंथ हे सारे मानवनिर्मित आहेत. समाजव्यवस्थेचा एक भाग म्हणून या साऱ्याची निर्मिती झालेली असते. जी व्यवस्था समाज एकसंघ ठेवण्यासाठी निर्माण झालेली असेल, समाजजीवन व्यवस्थित राहावे म्हणून निर्माण झालेली असेल ती परिवर्तनीय आणि लवचिक हवी, असायलाच हवी. त्यामुळे समाज विघटित होत असेल, विभागला जात असेल, समाजात प्रेमाऐवजी द्वेष निर्माण होत असेल तर ती व्यवस्था निश्चितच बदलायला हवी किंवा त्यागायला हवी. असे मला वाटते त्यामुळे मी ते सारे मानत नाही आणि त्यामुळेच माझ्या साहित्यात त्यांचे अस्तित्व नसते..
या साऱ्याचा माणसाच्या आस्तिकतेशी, नास्तिकतेशी संबंध नाही. मला तर वाटते प्रत्येकजण हा आस्तिकच असतो कारण त्याची कशा ना कशावर, कुणा ना कुणावर भक्ती ही असतेच. श्रद्धा असतेच. देवत्व हे काही मूर्तीतच शोधायला हवे, मानायला हवे किंवा प्रार्थनगृहातच जाणायला हवे असे नाही. लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार झाले त्यामुळे आणि नंतरच्या आयुष्यातील चिंतन, मनन या साऱ्यांमुळे मी आस्तिक आहे पण ही आस्तिकता अंध नाही. माझी श्रद्धा ही डोळस श्रद्धा आहे. माझी माणसांवर भक्ती आहे, माणुसपणावर श्रद्धा आहे. माझा पांडुरंग हा मंदिरात,किंवा मूर्तीत नाही. तर तो,
कर कटावरी नाही
त्याच्या हाती असे जोत
असा दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करत राहणारा आहे.
मला तर वाटते कोणताही विचार किंवा विचारधारा ही काळ आणि परिस्थितीसापेक्ष असते. ती जर कालानुरूप बदलत असेल तरच मानवाला उपयुक्त ठरते. अन्यथा ती त्याज्य ठरते याची जाणीव आपल्या मनात असायलाच हवी.
चिरकाल, कालातीत असे काहीच नसते.निश्चित असेही काही नसते.. ही अनिश्चितता तर आपण गेल्या वर्षा-दीड वर्षात अनुभवत आहोत.. तरीही आपल्याला सारे काही कळूनही वळत मात्र काहीच नाही.. ही खरोखरच गांभीर्याने विचार करण्याची गोष्ठ आहे. आपल्याला निसर्ग खूप काही शिकवत असतो. फक्त आपण आपला अहंकार, आपल्यातील ‘मी’ पण सोडून देऊन ते समजून घ्यायला हवे.. मी’ पणा सोडल्याशिवाय आपण माणूस होऊ शकत नाही असे मला वाटते आणि हे सारे आपल्या साहित्यातून समाजात रुजवण्याची, समाजाच्या ध्यानात आणून देण्याची जबाबदारी प्रत्येक साहित्यिकाची आहे असे मला वाटते.
आत्मसाक्षात्कारच्या निमित्ताने मला माझ्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची, स्वतःला जाणून घेण्याची संधी मिळवून दिली त्याबद्दल मी ई-अभिव्यक्तीच्या संपादकांचा आभारी आहे.धन्यवाद!
समाप्त
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈