सुश्री शुभदा साने
आत्मसंवाद –भाग १ ☆ सुश्री शुभदा साने
शब्द – ए ss शुक… शुक… अग शुभदा…. शुभदा साने…जरा इकडे बघ ना! ऐक तरी आम्ही काय म्हणतोय ते….
मी – कोण तुम्ही ? आणि असे घोळक्याने का उभे आहात? सांगा ना!
शब्द – ओळखलं नाहीस? तुझ्यातच तर असतो आम्ही. तुझ्या मनात…. तू जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतेस, तेव्हा आमचीच तर मदत घेतेस. आम्ही म्हणजे शब्द,
मी – खरच की रे, तुम्ही माझे सवंगडी आहात. अगदी बालपणापासूनचे. तुम्हाला शब्दमित्र म्हंटलं तर, चालेल का?
शब्द – आता कसं बोललीस? तुला आवडतं आमच्याशी खेळायला. तू लहान होतीस, अगदी तेव्हापासूनच….. आठवतय का?
मी – आठवतय ना! मी चौथीत किंवा पाचवीत असेन, तेव्हाची गोष्ट…. एके दिवशी संध्याकाळी मला खूप कंटाळा आला होता. त्याचं काय झालं, शाळेतून घरी आले, तेव्हा आई नि दादा दोघेही घरात नव्हते. दादा म्हणजे माझे वडील.
शब्द – दादा म्हणजेच सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. ज. जोशी….
मी – हं ! आगदीबरोबर! तर काय सांगत होते, आई नि दादा दोघेही तेव्हा घरात नव्हते. आणि नेहमी खेळायला येणारी माझी मैत्रीणही तेव्हा बाहेर गेली होती. थोडी हिरमुसून मी अंगणात आले. अगदी कंटाळा आला होता मला आणि अचानक काही ओळी माझ्याकडे धावत आल्या.
शब्द – अग, त्या ओळीमधे आम्हीच होतो. म्हणजे तू आम्हाला बसवलं होतस. आम्हाला आठवतय ना! ‘झाला कंटाळवाणा वेळ सख्यांशी जमेना मेळ ….’ आम्हाला एकत्र करून गुंफलेल्या त्या ओळी होत्या. नंतरच्या आठ-दहा ओळीतही तू आम्हाला असेच बसवून टाकले होतेस. तुझ्या त्यावेळच्या मन:स्थितीचे अगदी योग्य वर्णन होते.
मी – अगदी बरोबर! ती माझी पहिली कविता आणि त्यानंतर काय झालं माहीत आहे?
शब्द – काय झालं ?
मी – मला जाणवलं, अरे, हे आपल्याला जमतय बरं का? मग मला कविता करायचा नादच लागला. कुठला तरी विषय घ्यायचा आणि त्यावर कविता करून टाकायची. मग ती कविता मी वहीत लिहून ठेवायची. अशी दोन – तीन वर्षे गेली. आणि मग एकदा – –
शब्द – एकदा काय झालं?
मी – मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही मुंबईला मामाकडे गेलो होतो. तेव्हा दादा मला चक्क शांताबाई शेळके यांच्याकडे घेऊन गेले. कारण तोपर्यंत मी कविता करते, हे दादांना कळलं होतं॰ जेष्ठ आणि श्रेष्ठ कवियत्री शांताबाई यांच्याशी माझी तेव्हा ओळख झाली. त्यांनी माझ्या कविता आपुलकीने वाचल्या. काही कवितांचं कौतुक केलं. काही कवितांमधल्या चुका दाखवल्या. शांताबाईंच्या शाबासकीनं मला प्रोत्साहन मिळालं.
शब्द – मग तुझ्या कविता मासिकातून छापून येऊ लागल्या. नाही का?
मी – हो. आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी माझ्या ‘सावल्या’ या कवितेला ‘साधनाच्या काव्यस्पर्धेत कुमार गटातलं पहिलं बक्षीस मिळालं.
शब्द – केव्हा मिळाला ग हा पुरस्कार तुला?
मी – मला वाटतं १९६२ साल असेल. त्यानंतर मी बालसाहित्यात गुरफटत गेले. नंतर मला शाळेत बालकवीयत्री म्हणून सगळे ओळखू लागले. लहान मुलांच्या मासिकांसाठी मी कथा-कविता पाठवाव्या, म्हणून मला पत्रे येऊ लागली. नंतरच्या… शब्द – नंतरच्या काळात तुझे, बालकवितासंग्रह, बालकथासंग्रहप्रकाशित झाले. तुझ्या काही बालकवितासंग्रह, बालकथासंग्रह यांना पुरस्कारही मिळाले. हो ना?
मी – हो. ‘मजेचा तास’ ह्या कथासंग्रहाला वा. गो. आपटे पुरस्कार आणि आशीर्वाद पुरस्कार आणि ललितसाहित्य पुरस्कार असे तीन पुरस्कार मिळाले. ’गोष्टीचं झाड’ या कथासंग्रहाला पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार मिळाला.
शब्द – ए, हे सगळं झालं, पण तू ‘आनंदयात्री पुरस्काराबद्दल विसरलीस वाटतं?
मी – छे:! तो कसं विसरेन? छावाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘निसर्गाची भाषा’ या कथेला तो आनंदयात्री पुरस्कार मिळाला होता. आता आणखी एका पुरस्काराबद्दल सांगते.
शब्द – उत्कृष्ट बालकवितेबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल संगतीयस ना?
मी – हो. आता सांगायला लागले आहे, तर सगळंच सांगते. गंमतजंमतच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘मंजर बघतय टी.व्ही.’ ह्या कवितेची निवड उत्कृष्ट बालकविता म्हणून परीक्षकांनी केली.
शब्द- याशिवाय तुला नागपूरच्या पद्मगंधा प्रकाशनचाही पुरस्कार मिळाला होता.
मी – हो. माझ्या एकूण सगळ्याच साहित्याबद्दल तो मिळाला होता. म्हणजे बालसाहित्य आणी प्रौढांसाठी लिहिलेलं साहित्य या दोन्हीचा विचार त्यांनी केला होता.
शब्द – ए, जरा तुझ्या प्रौढ साहित्याबद्दलही बोलू या का?
मी – हो.sss बोलूया की….
© सुश्री शुभदा साने
मो. ७४९८२०२२५१
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈