सुश्री शुभदा साने
आत्मसंवाद –भाग ३ ☆ सुश्री शुभदा साने
(मागील भगत आपण पहिले – शब्द – तुला पुरस्कारही बरेच मिळाले आहेत. आता इथून पुढे)
मी – महाराष्ट्र साहित्य सभेचा शंकर खंडू पाटील पुरस्कार, श्री. दा. पानवलकर पुरस्कार, अग्रणी पुरस्कार इ. पुरस्कार मला मिळाले आहेत.
शब्द – तू विनोदी कथाही लिहिल्या आहेस. त्या कथांमध्ये शिरताना आम्हाला खूप गंमत वाटली होती.
मी – गंभीर कथा लिहिण्याकडे माझा कल असला तरी मी विनोदी कथाही लिहिल्या आहेत. ‘हलकंफुलकं’ नावाचा माझा कथासंग्रह प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. आणखी एक सांगायचं म्हणजे मी एक विज्ञान कथाही लिहिली होती.
शब्द – अठवतय आम्हाला. मराठी विज्ञान परिषदेतर्फे कथास्पर्धा जाहीर झाली होती, तेव्हा तू ती कथा लिहीली होतीस. इतकंच नव्हे, तर तुझ्या त्या कथेला पहिल्या नंबरचं
बक्षीसही मिळालं होतं…..आजपर्यंत तू आम्हाला बालसाहित्यात खेळवलंस, प्रौढवाङ्मयात बसवलंस. आकाशवाणीकडे घेऊन गेलीस. आम्हाला हाताशी धरून तू वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांमधे विविध लेखनातून घेऊन गेलीस. नभोनाट्याच्या वेगळ्याच वाटेवर घेऊन गेलीस.
मी – हो. पण त्याचं श्रेय आकाशवाणीत असलेले, नाट्याविभागाचे अधिकारी श्री. शशी
पटवर्धन यांना आहे. एरवी असं काही लिहिण्याची कल्पनाही मला सुचली नसती. माझे वडील श्री. ज. जोशी यांची ‘रघुनाथाची बखर’ ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली होती. मला श्री. शशी पटवर्धन यांनी या कादंबरीचे १३ भागात नाट्यरूपांतर करायला सांगितले. मला हे काम कितपत जमेल, याबाद्दल मी साशंक होते. पण जसजसी करत गेले, तसतशी मजा आली. हे १३ भागांचे नभोनाट्य रूपांतर श्री.शशी पटवर्धन यांना खूप आवडलेच पण नभोनाट्य – मालिका सादर झाल्यानंतर श्रोत्यांनाही खूप आवडल्याची पत्रे आकाशवाणीकडे आली. काहींचे फोनही आले. माझ्यासाठी हा वेगळा आणि आनंददायी अनुभव होता.
शब्द – आम्ही वेगळंच म्हणतोय……
मी – काय म्हणताय तुम्ही?
शब्द – तू आम्हाला आता, मगाशी म्हंटल्याप्रमाणे तुझ्या कादंबरीत बसंव. तुझ्या कादंबरीत बसण्याची आमची खूप खूप इच्छा आहे.
मी – तो प्रयत्न मी नक्कीच करेन. तुम्ही मात्र एक केलं पाहिजे.
शब्द – काय केलं पाहिजे आम्ही?
मी – आजपर्यंत तुम्ही मला जशी साथ दिलीत, तशी साथ पुढेही मला दिली पाहिजे. देणार ना!
शब्द – देणार ना! म्हणजे काय? नक्कीच देणार! तू हाक मारलीस की आम्ही हजर.
’आप बुलाए और हम ना आये ऐसा कभी हो सकता है?
मी- मग ठीक आहे.
© सुश्री शुभदा साने
मो. ७४९८२०२२५१
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈