सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

“ऐकलंस का  मनमित्रा, आज कुठे भटकायला जायचं नाही बरं ! इथेच माझ्याबरोबर राहायचं.”

“का बरं”

“आज ना, मला माझ्याशी संवाद करायचा आहे. माझ्याबद्दलंच लिहायचंआहे”.

“अरे बापरे ! स्वतःबद्दल लिहिण्याएव्हडी मोठी कधी झालीस तू?”

“तसं नाही रे! पण माझ्या एका मैत्रीणीने खूपच आग्रह केला म्हणून……”

“आलं लक्षात. म्हणजे नाव मैत्रीणीचं आणि गाव तुझं.”

“थोडंस तसंच म्हण ना . मलाही माझ्या छोट्याश्या लेखन संसारात डोकावून बघायला आवडेल ना!”

” मला वाटतं की तुझ्या लेखन संसारापेक्षा तुझा वाचन संसारच मोठा आहे.”

“अगदी खरं!  वाचनाची खूप आवड. लहानपणी बाबुराव अर्नाळकर यांच्या धनंजय- छोटूच्या,  लहान अक्षरातल्या रहस्यकथा सतत वाचल्यामुळे डोळ्याला फार लवकर चष्मा लागला तो कायमचा!

“आणि दिवाळीच्या दिवसात, रात्री उशिरापर्यंत, गॅलरीमधे आकाश कंदीलाच्या प्रकाशात दिवाळी अंक वाचत बसल्याबद्दल अनेक वेळा आईचा ओरडा  खाल्लास तो आठवत नाही का?”

“आठवतो तर! पण वाचन कायम राहिलं. रहस्यकथा मागे टाकून त्या वयात आवडलेल्या इसापनीती, अरेबियन नाईटस्,नंतर खांडेकर, फडके यांचा टप्पा ओलांडून पुलं, गोनीदा, र.वा दिघे, जी.ए.कुलकर्णी अशा अनेक नामवंत साहित्यिकांचा सहवास वाचनातून घडला. ऐतिहासिक, पौराणिक कादंबऱ्यांची गोडी लागली.”

” कविता पण आवडायच्या ना?”

“हो तर! कॉलेजच्या उमलत्या वयात काव्यानंदात रमले.  अनेक कविता तोंडपाठ होत्या. इंदिरा संत, पद्मा गोळे, सरोजिनी बाबर, शांता शेळके, बापट करंदीकर पाडगावकर यांची कवीसंमेलनं यात मैत्रिणींबरोबर रमून गेले. आरती प्रभू, ग्रेस, मनमोहन यांच्या गूढरम्य कवीतेबद्दलही आकर्षण होते. अलीकडे तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेले प्रणव सखदेव, किरण गुरव, मेघना पेठे, मोनिका गजेंद्रगडकर यांचे साहित्यही वाचले.

” या सगळ्या वाचनात जास्त भर कशावर  होता?”

“मला आत्मचरित्रं वाचायला खूप आवडतात. अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध लेखक /लेखिकांची आत्मचरित्रं वाचून जीवनाच्या अनेक प्रवाहांचे दर्शन झाले.”

” आत्मचरित्रातून त्या व्यक्तीचा जीवनप्रवास संपूर्णपणे उलगडून दाखविला जातो असं वाटतं का तुला?”

” आत्मचरित्रं सत्याच्या खूप जवळ जाणारी असतात. तरीही प्रत्यक्ष जीवन जगणे आणि त्यावर लिहिणे यात थोडाफार फरक असणारच!   अनेकांचे संघर्ष, त्यांची धडपड, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवलेले यश हे सारं माणसाची जीवनावरील श्रद्धा आणि  ध्येय गाठण्याची धडपड आपल्याला खूप काही शिकवतं.  एक खंत मात्र आहे.”

“कसली?”

“माझं इंग्रजी वाचन खूप कमी आहे. मुलाने आणि नातवाने,  मी इंग्रजी साहित्य वाचावं, त्या भाषेतले विविध विषयांवरील समृद्ध,  सविस्तर अनुभव घ्यावे, लेखनाचा आवाका म्हणजे काय, हे मला समजावे म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांच्या आग्रहामुळे मी जेमतेम सात-आठ इंग्रजी कादंबऱ्या, पुस्तकं वाचू शकले. फाऊंटन हेड, रुटस््, लिटल प्रिन्स, लिटल वुमेन वगैरे मध्ये सहज रमले. पण हात पटकन वळतो तो मराठी साहित्याकडेच!”

“अगदी वाचन एके वाचन चालू होतं का?”

“अजिबात नाही. लहानपणापासून अनेकानेक सांस्कृतिक कार्यक्रम बघण्या- ऐकण्याची संधी मिळाली. अहमद सेलर बिल्डिंगच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मेळे, नाटकं, चक्री व्याख्यानं, अभिरूप न्यायालय यांची मेजवानी मिळाली. अशा उत्सवातून आणि शाळेच्या वत्कृत्व स्पर्धेत भाग घेतल्यामुळे सभाधीटपणा आला. त्याचा चांगला फायदा झाला.”

“आठवतंय का ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक?”

“हो अरे. गणेशोत्सवात मोठ्या माणसांनी केलेल्या या  नाटकात एक छोट्या मुलीची छोटीशी भूमिका होती. ती करण्यासाठी माझी निवड झाली.  खूप मजा आली. बक्षीसही मिळालं.”

“मला वाटतं त्या वेळी टीव्ही वगैरे भानगड नव्हती.”

“छे अरे! टीव्ही कुठला, रेडिओवरच्या गाण्यांचे स्वर सुद्धा लांबून कानावर यायचे. पण आम्ही बरोबरीच्या मुलामुलींनी खूप मजा केली. सुट्टीमध्ये सागर गोटे, विटी- दांडू, गोट्या लगोरी, दोन आणे तास भाड्याची सायकल घेऊन फिरवणे —-“

“आणि आरडा-ओरडा करून खुणा करत खेळलेले पत्ते आठवतात ना?”

“हो. पण संध्याकाळी परवचा, रामरक्षा, इतर स्तोत्र हे मात्र म्हणावंच लागे.”

“मला वाटतं तेंव्हा मनाच्या मशागतीसाठी खूप चांगले वेगळे मार्ग होते.”

“अगदी बरोबर. आम्ही दादरचा लोखंडी ब्रीज ओलांडून अमर हिंद मंडळ इथे जात असू.  गोविंदस्वामी आफळे यांची किर्तने, सुधीर फडके यांचे गीत रामायण , वासंतिक व्याख्यानमाला यांचा आनंद घेतला. प्राध्यापक शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांच्यापासून धनश्री लेले यांच्या पर्यंत अनेकांच्या वक्तृत्वाने कान तृप्त झाले.”

“सिनेमा, नाटक, संगीत यांची आवड होती ना”?

” हो.साहित्य संमेलने, चतुरंगचे कार्यक्रम यांना हजेरी लावली. ह्यांच्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकायला आवडू लागले. अशी आवड असणारा आमचा एक छोटा ग्रुप तयार झाला. एन.सी.पी.ए. मध्ये पाहिलेले ‘हयवदन’, टाटा थिएटरमध्ये पुलंच्या सुसंवादासह अशोक रानडे यांनी उलगडलेली आणि ‘फैय्याज’ यांच्या स्वरांनी सजलेली बैठकीची लावणी, पुलं आणि सुनीताबाई यांनी शिवाजी मंदिरमध्ये बा.भ.बोरकर यांच्या कवितांचे केलेले वाचन सारेच अविस्मरणीय!

“तुम्ही वरळीच्या नेहरू सेंटरलासुद्धा जात होतात ना?”

 “नेहरू सेंटरमध्ये कमलाकर नाडकर्णी, काझी साहेब यांच्या उत्तम आयोजनामुळे अनेक प्रकारची नाटके, शास्त्रीय संगीत, झाकीर हुसेन, हेमामालिनी अशा अनेकांच्या दर्जेदार कार्यक्रमांचे साक्षीदार झालो दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, सावरकर सभागृह इथले कार्यक्रम ऐकले.भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांच्यामुळे घराजवळच सांस्कृतिक कार्यक्रमांची गंगा अवतरली आहे. इतक्या समृद्ध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या चांदणभरल्या आभाळातून आनंदाचे अमृतकण वेचता आले ही भाग्याची गोष्ट.”

“म्हणजे लिखाणासाठी सुपीक जमीन तयार होती म्हणायची”.

“तसं म्हणायला हरकत नाही पण मी लेखनाचा कधी विचारच केला नव्हता”.

“मग ‘लिहावं’ असं का वाटलं?”

“त्याचं काय झालं, ‘मनस्विनी’ म्हणून आमच्या बँकेच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. दर महिन्याला आम्ही एकत्र जमतो. एखादा विषय ठरवून त्यावर प्रत्येकीने बोलायचे, इतर माहितीची देवाण-घेवाण, कविता वाचन, तसेच प्रत्येकीने दिलेल्या वर्गणीतून एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी देतो. अगदी खारीचा वाटा!

एकदा गणपतीसाठी चिवडा करायचा म्हणून मी दाणे भाजत होते. तेवढ्यात एका मनस्विनीचा फोन आला. ती म्हणाली,’ पुष्पा, लोकसत्ता- चतुरंगमधील ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ ही लेखमाला तू वाचतेस ना?’ मी म्हटलं, ‘हो’. अगदी आवडीने. तर ती हक्काने  म्हणाली, ‘तर मग ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ या लेखमालेसाठी तुला, आपली ‘मनस्विनी आणि तू’ यांच्या नात्यावरील लेख लिहायचा आहे.  तू तो लिही आणि ‘चतुरंगला’ पाठव. मी काही म्हणायच्या आधीच तिने फोन ठेवून दिला आणि नंतर मी केलेला फोन उचलला  नाही. माझ्यावर जबाबदारी टाकून ती मोकळी झाली.”

आत्मसंवाद भाग-१ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments