श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवन यात्रा
☆ आत्मसंवाद…भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मी – का ग, आज गप्पगप्पशी आहेस आणि जरा गंभीर दिसतियस.
उज्ज्वला – मी? नाही बाई!
मी – खरं म्हणजे तू खुशीत असायला हवस. नुकतीच तुझी २ पुस्तके प्रकाशित झालीत. ‘कृष्णस्पर्श ‘ रिप्रिंट झालय आणि एवढ्यातच आणखीही २ पुस्तके येणार आहेत.
उज्ज्वला – तशी खुशीतच आहे मी. पाचा उत्तराची कहाणी हे माझ्या स्वत:च्या कथांचं पुस्तक आलय. आनुवादीत नव्हे. दुसरं मात्र अनुवादीत आहे. प्रातींनिधिक पंजाबी लघुकथा. अरिहंत प्रकाशनाने ही छापलीत.
मी –आणि येणार्याल पुस्तकात तुझ्या टोरॅंटोच्या मैत्रिणीचा पुस्तक आहे. तू पण खूश. ती पण खूश.
उज्ज्वला- होय. हंसा दीप तिचं नाव. या चार-पाच वर्षातलीच तिची नि माझी ओळख. तीही ई-मेल, फोनद्वारेच आणि मुख्य म्हणजे लेखनातून पण ती माझी अगदी सख्खी मैत्रीण झालीय. तिच्या कथांचा अनुवाद ‘आणि शेवटी तात्पर्य’ म्हणून येतोय. छान, खुसखुशीत आणि वास्तववादी कथा आहेत तिच्या. माझ्यापेक्षा तीच जास्त उत्सुक आणि अधीर झाली आहे पुस्तक बघायला.
मी – मला वाटतं , नवदुर्गा काढतेय हे पुस्तक.
उज्ज्वला- बरोबर आहे. याबरोबरच गौतम राजऋषी यांच्या कथांचा ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ हेही पुस्तक येतय. अगदी वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे हे. लेखक स्वत: मिल्ट्रीमध्ये कर्नल आहेत. युद्धाचा अनुभव घेतलेले आहेत. त्यांचं पोस्टिंग बव्हंशी काश्मीर घाटी, पीरपंजालची पहाडी, संरक्षण रेषेच्या जवळपासची ठाणी इ. ठिकाणी झालय. तिथलं वातावरण, तिथल्या सैनिकांचं आणि लोकांचं जीवन आणि मानसिकताही, या पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या कथा आहेत. अगदी वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. या पुस्तकाचं खूप चांगलं स्वागत होईल असं मला वाटतं.
मी –मग असं असताना तू इतकी गंभीर का?
उज्ज्वला – सहज मनात येतय, आपल्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावा. खरं म्हणजे लेखिका व्हायचं मी काही लहानपणापासून ठरवलं नव्हतं.
मी – पण मला वाटतं, तू लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून कविता करतेस. उज्ज्वला- हो. पण माझी पहिली कविता मात्र फुकटच गेली. म्हणजे गंमतच झाली तिच्याबाबतीत.
मी – काय झालं ग?
उज्ज्वला – अग, मी ८ वीत होते तेव्हा गोवा मुक्तिसंग्रामाचा लढा जोरात चालू होता. त्यातले एक मुख्य सेनानी हेमंत सोमण. एकदा शाळेत बातमी आली, हेमंत सोमणांनी तिरंगा फडकावला आणि पोर्तुगीजांनी त्यांना गोळी मारली. त्यांचा बळी गेला. बातमी ऐकली आणि मी उत्स्फूर्तपणे लिहिलं,
‘हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला
तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘
इथून मग त्यांच्या बलिदानाशी कविता येऊन थांबली. दुसर्याी दिवशी बातमी आली, की हेमंत सोमणांना गोळी नाही मारली. पकडून तुरुंगात टाकलं. मग माझ्या कवितेला काहीच अर्थ उरला नाही. अर्थात माझी कविता फुकट गेली याचं मात्र मला मुळीच वाईट वाटलं नाही. हेमंत सोमण वाचले, हे महत्वाचं.
मी- आणखीही काही कविता तू लिहिल्या होत्यास ना शाळेत?
उज्ज्वला – चार-पाच वेळा काही तरी चाल मनात सुचली, ती गुणगुणताना त्यावर शब्द सुचत गेले.
मी- आठवते तुला त्यातलं काही?
उज्ज्वला- दोन ओळीच आठवताहेत. एक चाल गुणगुणताना लिहिलं होतं,
‘ संध्यारजनी आली आली
गाई – वासरे घरा परतली.’ बाकी काही आठवत नाही. म्हणजे ते सगळं तितकं महत्वाचं नव्हतंच.
मी – कॉलेजला गेल्यावर तुझ्या कविता लेखनाला बहार आला होता, नाही का?
उज्ज्वला- बहार वगैरे असा नाही पण कविता करणार्याा आणि मुख्य म्हणजे कवितेवर प्रेम करणार्या– मैत्रिणी मिळाल्या. हिने काल कविता लिहिली, आपण का नाही? आशा इरिशिरीने कविता लिहिल्या तेव्हा. त्यात हौसेचा, अनुकरणाचा भाग जास्त होता. मौलिकता कमीच. तो काळ रोमॅंटिक होता. प्रेम या कल्पनेवरच प्रेम होतं तेव्हा. त्यामुळे प्रेमावर त्याहीपेक्षा वियोगावर कविता जास्त लिहिल्या गेल्या. काव्यबहरातला बराचसा बहर या स्वरूपाचा होता. त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो.
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
[…] […]