श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवन यात्रा
☆ आत्मसंवाद…भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिलं – त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो. आता इथून पुढे-)
उज्ज्वला – तरीही काही बर्या कविता त्यावेळीही माझ्याकडून लिहिल्या गेल्या. मी एस. वाय. बी.ए. ला असताना कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा कविता संग्रह काढायचा ठरला. ‘शिल्प’ नावाने तो निघालादेखील त्यात माझी ‘बंधन ‘ही कविता निवडली गेली होती. एव्हाना चांगली कविता आणि वाईट कविता याबद्दलची माझी समाज काहीशी वाढली होती.
मी – त्यावेळी मासिकातूनही तू कविता पाठवायचीस ना!
उज्ज्वला- हो. चांगली लिहून झालीय असं वाटलं तर पाठवायची. ‘माणूस’ म्हणून पाक्षिक तेव्हा निघायचं. त्यात मी कविता पाठवायची आणि समोरच्याच पानावर गोपीनाथ तळवलकर यांनी कवितेचा आस्वाद घेतलेलं लेखन असायचं. माझ्या कवितांचं त्यांनी खूप कौतुक केलं होतं. तिथे पाठवलेल्या कवितांच्या संदर्भात एक मजेशीर आठवण आहे.
मी – कोणती ग?
उज्ज्वला – ‘धुंद धुक्यातील अशा पहाटे’ अशी एक कविता मी पाठवली होती. लहानशीच कविता. कवी वामन देशपांडे यांना ती इतकी आवडली होती की त्यांची पाठ झाली. पुढे योगायोगाने त्यांची ओळख झाली स्नेह संबंध जुळले. एकदा अशीच काही मंडळी जमली होती. एकमेकांना कविता वाचून दाखवत होतो. मी ती कविता वाचली. ते म्हणाले, ‘ही कविता तुमची नाही.’ मी म्हंटलं ‘का माझीच आहे.’ ते म्हणाले ‘ही कविता मी कुठे तरी मासिकात वाचलीय. मी म्हंटलं, ‘माणूस’ मध्ये पाठवली होती. तीच तुम्ही वाचली असेल. तर त्यांचं म्हणणं असं की खाली कवायत्रीचं नाव वेगळं होतं.’ मी म्हंटलं, ‘असणारच. कारण मी ती लग्नापूर्वी लिहिलेली व पाठवलेली कविता होती. त्यावेळी मी उज्ज्वला केळकर नसून कुमुदिनी आपटे होते.’ तेव्हा कुठे त्यांची खात्री पटली, कविता माझीच होती म्हणून. यानंतर पुन्हा जेव्हा जेव्हा भेट होईल, तेव्हा या कवितेची आठवण काढून आम्ही खळखळून हसतो.
मी – पण आपण केलेली कविता कुणाला तरी आवडते, लक्षात ठेवावीशी वाटते, ही गोष्टदेखील आनंददायक आणि प्रेरणादायक होती, नाही का?
उज्ज्वला – हो नक्कीच
मी – मग पुढे?
उज्ज्वला – पुढे काय? चार-चौघींसारखं लग्न झालं. मी संसाराला लागले. कविता करण्यापेक्षा कविता जगायला लागले. कवितेचा प्रवाह नव्हे, थेंबुटे ओंजळित येऊ लागले. या मधल्या काळात चांगल्या कवींच्या खूप चांगल्या कविता वाचल्या. चांगली कविता म्हणजे काय, हे मनात स्पष्ट झालं.
या काळात, उमेद वाढवणारी आणखी एक घटना घडली. किर्लोस्करने जिल्हावार नवनवोन्मेषांचा शोध घेण्यासाठी एक उपक्रम राबवायचे ठरवले. जिल्हावार कविसंमेलने घ्यायची. त्याची जबाबदारी एखाद्या स्थानिक संस्थेकडे द्यायची. त्यांनी कविता मागवायच्या निवडायच्या व तेवढ्याच कविता संमेलनात वाचायच्या. दोन दोन कविता मागवल्या होत्या. संमेलनाचे वेळी किर्लोस्करचे संपादक कुणा तरी मोठ्या कवींना घेऊन येणार होते. तिथे वाचल्या गेलेल्या कवितांपैकी ७ कविता किर्लोस्करमध्ये छापण्यासाठी निवडल्या जाणार होत्या. सांगलीत एकूण 300 कविता आल्या, असे प्रस्ताविकातून कळले. त्यापैकी संमेलनात वाचायला 30 कविता निवडल्या होत्या. त्यापैकी ‘जन्म आणि ‘पेपर’ आशा माझ्या 2 कविता वाचायला निवडल्या गेल्या. त्यापैकी ‘पेपर’ ही कविता त्यांनी किर्लोस्करमध्ये छापण्यासाठी निवडली. त्यानंतर संपादक ह. मो. मराठे यांचे पत्र आले, ‘पेपर’मध्ये कथेचे बीज आहे. तुम्ही परवानगी देत असाल, तर त्यावर मी कथा लिहीन.‘ मी नकार देण्याचं काही कारणच नव्हतं. एक मोठा कथाकार माझ्या कवितेवर कथा लिहितो, म्हंटल्यावर मी हुरळूनच गेले. पुढे त्यांनी कथा लिहिली. ती प्रसिद्धही झाली, पण मला वाचायला मिळाली नाही. त्यानंतर दुसरी ‘जन्म ‘ही कविता मी ‘स्त्री’मध्ये पाठवली. तीही छापूनही आली.
या सगळ्या गोष्टींमुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. आपण लिहितो, ते लोकांना आवडतं, हे नक्कीच प्रेरणादायी होतं. त्या काळात अनेक वेळा कविसंमेलने होत आणि मी बहुतेक ठिकाणी हजर राहत असे. श्रोत्यांनाही कविता आवडतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून म्हणजे टाळ्यांवगैरे वरून कळत होतं.
क्रमश:….
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈