श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवन यात्रा
☆ आत्मसंवाद…भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिलं- श्रोत्यांनाही कविता आवडतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून म्हणजे टाळ्यांवगैरे वरून कळत होतं. आता इथून पुढे – )
मी – पण काय ग, काव्यक्षेत्रात तू अशी स्थिरावली असताना, तू एकदम कविता करणं बंद कसं केलस?
उज्ज्वला – मी बंद केलं असं नाही, कविता माझ्या हातून निसटून गेली. माझं जसं गद्य लेखन वाढलं, ललित, वैचारिक लेख, व्यक्तिचित्रण , पुस्तकावरील अभिप्राय, तसतशी कविता माझ्यापासून दूर जाऊ लागली. मी १९७० मध्ये सांगलीला डी.एड. कॉलेजमध्ये नोकरीला लागले. कॉलेज मुलींचं, वसतिगृहयुक्त होतं. तिथे वेगवेगळ्या गावाहून, बर्या चशा खेड्यातून मुली राहायला यायच्या. त्या प्रत्येकीचे प्रश्न वेगळे, समस्या वेगळ्या, कथा-व्यथा वेगळ्या. त्यांच्या बोलण्यात मला कथांची बीजे दिसायची. पुढे मी कथा लिहायला लागले.
मी – कधीपासून बरं? आठवतय?
उज्ज्वला – साधारण १९७६पासून मी कथा लिहायला लागले. याशिवाय आसपास घेतलेल्या अनुभवातूंही मला कथाबीजे मिळाली आहेत. मी तुला २-३ अनुभव सांगते. म्हणजे मी तिथे नोकरी करत नसते, तर तशा कथा माझ्याकडून लिहून झाल्या नसत्या असं मला तरी वाटतं. मी – सांगच! नाही तरी मी तुला तुझ्या कथांबद्दल विचारणारच होते.
उज्ज्वला – आता साल माझ्या लक्षात नाही. आमच्या कोलेजमध्ये राधा नावाची मुलगी होती. ती पूर्व प्राथमिककडे होती. त्यावेळी शासनाने पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक असे २ भाग केलेले होते.
पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडीचे आणि इ. १ ली ते ४ थी पर्यन्त शिकवणार्याा शिक्षिका तर प्राथमिक म्हणजे इ. १ली ते ७वी पर्यन्त शिकवणार्याण शिक्षिका. मुली म्हणायच्या डी.एड. झालं की राधाची नोकरी पक्की. ‘कसं काय?’ मी विचारलं. इतर मुलींच्या बोलण्यातून कळलं, तिच्या गावात बालवाडी आहे. एक बाई त्या चालवतात. पण त्या ट्रेंड नाहीत. त्यामुळे सरकारी अनुदान नाही. तिढा खराच होता. राधाचे सासरे सरपंच आहेत. त्यामुळी राधाची नोकरी नक्की. माझं मन मात्र तिच्यापाशी रेंगाळत होतं, जी आजूनपर्यंत तिथली बालवाडी चालवते आहे. राधा डी.एड. झाली की तिला शाळेत शिक्षिकेची नेमणूक द्यायची, म्हणजे शाळेला सरकारी अनुदान चालू होईल. शाळेच्या विकासासाठी अनुदान आवश्यकच होतं. पण, जिने ३-४ वर्षं काटकसरीत आणि कमी पगारात शाळा चालवली होती, तिचं काय? त्यातून माझी ‘पायाचा दगड’ ही कथा लिहिली गेली. मराठी आणि हिन्दी दोन्ही भाषांच्या वाचकांना ती आवडली.
मी – खरं म्हणजे याच सुमाराला तू मुलांसाठीही कथा लिहिल्यास नाही का?
उज्ज्वला – हो. त्यालाही एक कारण झालं. शासनाच्या लघुशोध प्रकल्पाच्या माहितीचं एक सर्क्युलर आलं होता. त्यात एक विषय होता, किशोर मासिकाच्या ५ वर्षांचा अभ्यास व सुधारणेसाठी शिफारसी. विषय छान होता. किशोरचे ६० अंक वाचून होणार होते. म्हणून मी हा प्रकल्प निवडला. तो वर्षभरात पूर्ण केला. तो करता करता मुलांसाठी गोष्टी लिहायला मला सुचल्या. तसंच आणखी एक गोष्ट दिसली. मुलांसाठी लिहीलेल्या नाटिका कमी आहेत. मग मी नाटिकाही लिहिल्या. माझी नाटीकांची ५ पुस्तके झाली. त्यापैकी गवत फूल गात राहिलेला बाल कुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला.
मी – तुझी एकूण बलवाङ्मायाची किती पुस्तके झाली आणि पुरस्कार कुणाला मिळाले? माझी बालवाङ्मयाची ३०-३२ पुस्तके झाली. दोन दोन आवृत्याही निघाल्या. त्यात कथा, नाटिका, चरित्र, भौगोलिक , कादंबरी, कविता सगळ्या प्रकारची आहेत. त्यात ‘गरगर गिरकी ‘ या कविता संग्रहाला साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा व ‘बदकाचे बूट’ ला बाल कुमार साहित्य संमेलनाचा आणि द्क्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला.
मी – डी.एड.ल असताना एका संस्थाभेटीतूनही तू कथा लिहिली होतीस, नाही का?
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈