सौ. नीलम माणगावे
आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 5 सौ. नीलम माणगावे
ललित लेखन करणारी तू समीक्षा करण्याकडे कशी वळलीस?
तुझं बरोबर आहे. ललित लेखन करणारी, कथा, कविता, कादंबरी मध्ये रमणारी मी.. समीक्षा करण्याकडे वळले नाही. तो माझा प्रांत नाही. तशी अभ्यासाची मला शिस्त नाही. एखाद्या साहित्यकृतीच्या मुळाशी जाऊन त्याला भिडण्याची, त्याचे अभ्यास पूर्ण विवेचन करण्याचा माझा पिंड नाही. पण भावनिक, तर्कसंगत विचार करत काही समजून घेण्याचा माझा स्वभाव आहे. त्यातूनच काही लिहून झालं एवढं खरं.
‘ उखाण्यातून स्त्री दर्शन’ या पुस्तकांमधील लेखन या उद्देशा मधूनच केलं. लग्न समारंभ, डोहाळे जेवण सारख्या शुभ प्रसंगी महिला उखाणे घेतात. त्या उखाण्या मागचा अर्थ.. त्यातून त्यांना वेगळं काही सांगायचं आहे का? याचा तो एक शोध! नवऱ्याचे कौतुक, सासर माहेर च्या नातलगांचे कौतुक जसे उखाण्या मध्ये असतेच.. तसे काही उखाण्यामधून देशभक्ती दिसून येते. काही उखाण्यात विनोद असतो. पतीला दीर्घायुष्य मिळावे, याचे मागणे म्हणजे तर उखाणे घ्यायचा केंद्रबिंदूच असतो पण बायकोला दीर्घायुष्य मिळावे असा एकही उखाणा सापडत नाही. पुरुष घेतलेले उखाणे फक्त टिंगल टवाळीचे असतात.. रुखवताचे उखाणे तर उणीदुणी काढण्यासाठीच असतात.. वगैरे गोष्टींना धरून मला जे वाटले ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
‘स्त्री आणि तिचे पातिव्रत्य”याविषयी विचार करताना काही ऐतिहासिक, पौरानिक, लोकसाहित्यातील स्त्रियांचा होणारा कोंडमारा, त्यांच्यावरील अन्याय आणि त्याला दिलेले पातिव्रत्याचे गोंडस नाव.. किती फसवे आणि स्त्रियांना कमी लेखणारे आहे हे सांगण्याचा माझ्या वकुबानुसार केलेला प्रयत्न आहे.
‘जैन महिला विकासाच्या पाऊलखुणा’.. हे संपादन आणि समीक्षेचे पुस्तक आहे..’प्रगती आणि जिने विजय’.. हे जैन समाजाचे साप्ताहिक मुखपत्र आहे. अलीकडच्या काळात त्याचे पाक्षिकमध्ये रुपांतर झाले आहे.. तर, त्याला आता एकशे वीस वर्षे झाली. जेव्हा शंभर वर्षे झाली तेव्हा, कुतूहलापोटी शंभर वर्षात स्त्रियांनी काय काय लिहिलं? हे पाहण्यासाठी मी शंभर वर्षातील अंकांचा अभ्यास केला. आणि त्यातून जैन महिलांचा विकास कसा होत गेला, याचा इतिहास मिळाला. तो आजच्या तरुण-तरुणींना समजायला हवा या हेतूने आणि तो एक ऐतिहासिक दस्तावेज आहे म्हणून हे लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. सांगण्यासारखे खूप खूप आहे पण ते सगळं सांगण्याची ही जागा नाही. एवढंच सांगते, या वाचन लेखनाने मला आनंद तर दिलाच, शिवाय मला परिपक्व बनवलं. माझ्या मनाच्या, विचारांच्या कक्षा रुंदावल्या. असही असू शकतं, याचं भान दिलं. मला वाटतं, माझ्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे. आपण आतून मोठ व्हावं यासारखा दुसरा आनंद नाही.
बरं का, मला नेहमी असं वाटत, की या साहित्यानं मला माझी ओळख दिली. माझी आयडेंटिटी मिळवून दिले. नाहीतर मी कोण होते? कुठे होते? वयाच्या चाळीस वर्षापर्यंत 14 लोकांचा फक्त स्वयंपाक करणारी, भांडी घासणारी, कपडे धुणारी, केर फरशी करणारी मी.. लिहायला लागले हाच माझ्यासाठी किती मोठा आनंद आहे..!
खरं आहे, बाईला तिचं नाव मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माझ्या लक्षात आलय की, या सगळ्यातून जाताना सुद्धा तुझ्या आत एक बालपण लपलं आहे.
हसणारं, खेळणारं, अवखळ, समजून घेणारं, नवनवीन शिकणारं एक मुल आहे, जे तुझ्याकडून बालसाहित्य लिहून घेतं… त्याबद्दल सांग.
अच्छा म्हणजे तुला बाल साहित्याविषयी ऐकायचं आहे तर
हो,सांग…
क्रमशः…
© सुश्री नीलम माणगावे
जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर
मो 9421200421
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈