श्रीमती माया सुरेश महाजन
☆ जीवनरंग ☆ पाखंड ☆ श्रीमती माया सुरेश महाजन ☆
” पाखंड” श्रध्दाळु भक्तांना पुजारी उपदेश करीत होते, “उपाशी लोकांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी पाजणे, दुःखी-कष्टी लोकांना मदत करणे हाच खरा मनुष्यधर्म आहे. गरीब लोकांत ईश्वराचा वास असतो; म्हणून त्यांची मदत केल्याने ईश्वर प्रसन्न होतो.”
प्रवचन संपल्यानंतर एक अतिशय मरतुकडा मुलगा, हातापायाच्या काड्या झालेल्या, पोट खपाटी गेलेलं, डोळ्यात दया-याचना असलेला पुजार्यासमोर हात पसरत म्हणाला, “पुजारीबाबा, कालपासून काही खाल्लं नाही, फार भूक लागली आहे. थोडासा प्रसाद द्याल तर ……”
एक सणसणीत शिवी हासडत पुजारी म्हणाला, “हरामखोर तू परत आलास? आपल्या आईबापाला जाऊन विचार की पोटाला देता येत नव्हते तर जन्माला कशाला घातले!फुकटखाऊ नुसते! येऊन धडकतात रोज-रोज गिळायला …..”
ताटात झाकलेले लाडू त्यांनी चपळाईने आपल्या उपरण्यात बांधले आणि भराभरा पावले टाकीत मंदिराच्या मागे असलेल्या आपल्या खोपट्याकडे निघून गेला. देवळाच्या आवारात त्याचे प्रवचनातील शब्द वार्याबरोबर भिरभिरत होते………
© सुश्री माया सुरेश महाजन
मो.-९८५०५६६४४२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈