सुश्री सुमती जोशी
☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 3) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆
अशोक निराश झाला. प्रकाशन संस्थेच्या मालकांचा – माधवरावांचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला. रात्री जेव्हा मी त्यांच्यासमोर उभा राहीन, तेव्हा ते उपहासानं टोचून टोचून बोलतील, ‘चार दिवसात एकाही शाळेत पुस्तकं खपवता आली नाहीत ना? तुम्ही सगळे एकजात कुचकामी. जा आता.’ असं काहीबाही सांगून बॅग खांद्यावर देऊन मला बाहेरचा रस्ता दाखवतील.
समोर उभा असलेला सनातन ओरडला, “चला बाहेर. आता दरवाजा बंद करायचाय.”
जणू काही घडलंच नाही असं दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला अशोकनं. घसा अगदी कोरडा पडला होता, आता आणखी किती पायपीट करावी लागणारेय कोणास ठाऊक?
“इथे कुठे पाणी मिळेल का प्यायला?”
सनातननं निर्विकारपणे उत्तर दिलं, “तीन दिवसांपासून टयूबवेल खराब झालीय. दुरुस्त करावी लागेल.”
“टयूबवेल नाही, माझं नशिबच खराब आहे.”
“कुठून आलात तुम्ही?” काहीशा नरमाईनं सनातनने विचारलं.
“कोलकात्याहून. इथे रामनगर शाळेत आलो होतो. तिथे काम झालं नाही, पण तिथल्या शिपायानं तुमच्या शाळेचं नाव सांगितलं.”
“कसे आलात?”
“नदीच्या काठाकाठानं चालत आलो.”
किती दूरवरून चालत आलाय हा! हा विचार मनात आल्यावर सनातन वरमला.
“एवढं चालल्यावर तहान लागणारच! कळशीत थोडं पाणी शिल्लक होतं. तेही आत्ताच ओतून टाकलं. पाणी नाही, म्हणून तर शाळेला सुट्टी.”
अशोकनं काहीही उत्तर दिल नाही. बॅग घेऊन जिन्यापर्यंत आल्यावर सनातनने विचारलं, “कोणती पुस्तकं घेऊन आलायत?”
“बंगाली व्याकरण. पाचवीपासून दहावीपर्यंतची उत्तम पुस्तकं आहेत.”
कितीतरी शाळांच्या शिपायांनासुद्धा चांगली जाण असते. एकदा प्रयत्न तर करून पाहू या, असा विचार करून अशोकनं विचारलं, “तुम्ही पहाता का ही पुस्तकं?”
“मी शाळेचा शिपाई. मी पाहून काय उपयोग? भवेश सरांबरोबर बोलणी केली पाहिजेत.”
“ते बंगाली भाषा शिकवतात का?”
“हो. या शाळेतले ते सर्वात जुने शिक्षक. परवा आलात की तुम्ही त्यांना भेटा.”
“भवेश सर कुठे राहतात?”
जिन्यावरून उतरता उतरता मध्येच थांबत सनातन म्हणाला, “तुम्ही एक काम करा. इतक्या लांब आलाच आहात, तर भवेश सरांची भेट घेऊन जा. समोरच राहतात ते. आता सर घरीच असतील. मी पाठवलंय, असं सांगायची गरज नाही.”
अशोकला एक चतकोर आशा वाटू लागली. तो पटकन म्हणाला, “तसं काही असलं, तर फारच चांगलं. आज जर काही पुस्तकं देता आली तर बरं होईल. पुस्तकांची माहिती सांगायला हवी असली तर पुढच्या वेळी वर्गात जाऊन सांगीन.”
“मी त्याच वाटेनं घरी चाललोय. तुम्हाला भवेश सरांचं घर दाखवतो.”
दोघं जिन्यावरून खाली उतरले. सनातनने प्रवेशद्वाराला कुलूप घातलं. अशोक शेजारीच उभा होता. उन्हं कलली होती. दमला असला तरी अशोक उल्हासित झाला होता. त्यानं चौकशी केली, “बस स्टॉप इथून किती लांब आहे?”
“मास्तरांच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला रिक्षा मिळेल. चार रुपयात तो तुम्हाला कदमगाछी बस स्टँडवर नेऊन सोडेल. तिथली कितीतरी मुलं आमच्या शाळेत आहेत. वास्तविक हीच या परिसरातली सर्वात जुनी शाळा. यंदा शंभर वर्षे होतील आमच्या शाळेला. आमचे मुख्याध्यापक म्हणत होते, शाळेचा शताब्दी उत्सव मोठया प्रमाणार साजरा करायचाय.”
क्रमश: ….
श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.
अनुवाद – सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈