जीवनरंग
☆ सापळा…भाग 2 ☆ श्री आनंदहरी ☆
तानाजी म्याट्रिक पास झाल्याचा सगळ्यांना आनंद झाला होता.. मार्कशीट देतांना सर म्हणाले होते,
“तानाजी, एवढे चांगले मार्क्स पडलेत आता सायन्सला प्रवेश घे. हुशार आहेस, मेहनती आहेस.. चांगला शिक. मोठा हो.”
सरांचं ते वाक्य त्याच्या मनात घोळत होतं. त्यालाही आपण खूप शिकावं असे वाटत होतं.. पण घरची परिस्थिती त्याला ठाऊक होती. सायन्स साईड, कॉलेज ही सारी स्वप्नंचं ठरणार हे तो जाणून होता पण तरीही काहीतरी करून पुढं शिकावं.. किमान डी. एड. व्हावं असं त्याला खूप वाटत होतं. ‘ बाबांशी बोलायला हवं.. पण आपण बोलण्यापेक्षा कुणीतरी जाणकार मोठ्या व्यक्तीनं बोललेलं बरं.. निदान बाबा पहिल्या झटक्यात नकार न देता ऐकून तरी घेतील.. कदाचित होकारही देतील ‘ त्याच्या मनात विचार चक्र चालू झालं होतं.
“शेटजीचा माल आणायचा हाय इस्लामपूरास्नं..”
बाबा खुंटीवरची पैरण आणि चाबूक घेत म्हणाले आणि बाहेर पडले. त्यांनी बैलगाडी जुपली. चाबूक नुसता खांद्यावर टाकला आणि ते गाडीत चढले.
बैलगाडीतून सामानाची ने-आण करुन त्यांनी आजवर प्रपंचाचा गाडा ओढला होता. शेती होती पण चुलत्यांत वाटण्या झाल्यावर पोटापूरतीसुदधा उरली नव्हती. शेती कमी असली तरी बैलं म्हणजे बाबाचे जीवलगच होते त्यामुळे त्यांनी गोठयातली बैलजोडीची जागा कधीच रिकामी ठेवली नव्हती.. दावणीला जो बैल यायचा तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दावणीला असायचा.
त्याचे बाबा बैलांची जोपासनाही खूप चांगली करायचे, त्यांची निगा राखायचे, घरात झालेली पहिली भाकरी आधी बैलांच्या मुखात घातल्याशिवाय बाबा कधी भाकरीचा तुकडा मोडायचे नाहीत. बाबांच्या खांद्यावर चाबूक असायचा पण त्या चाबकाची वादी कधी बैलांच्या पाठीवर पडली नव्हती. बाबा चाबकाचा हवेतच असा बार काढायचे की त्याचा आवाज भवतालात घुमायचा. बैलांना बाबांच्या, चाबकाच्या आवाजाचा इशारा पुरेसा असायचा.. आणि त्यांना तो कळायचादेखील.
सचोटीने काम करणाऱ्याला कामाची कमतरता कधीच नसते. त्याच्या बाबाचंही तसंच होतं. घरी वाटण्या झाल्यावर शेतातल्या उत्पन्नावर भागणार नाही हे जाणवल्यावर त्यांनी बैलगाडीने मालवाहतूक करायला सुरुवात केली. काही दिवसातच त्यांचा चांगला जम बसला होता. पंचक्रोशीतील व्यापारी तालुक्याहून माल आणायचा असला की हमखास त्यांनाच सांगायचे. आठवडी बाजारादिवशी तर जाता-येता भाडं मिळायचं. मशागतीच्या दिवसात मशागतीची कामे मिळायची तर सुगीच्या दिवसात सुगीतली, सुगीच्या माल वाहतुकीची कामे मिळायची. बाबांना कामाची इतकी सवय जडली होती की काम नसेल तर ते बेचैन व्हायचे.. बैलगाडीने माल वाहतूक करताना माल भरण्या-उतरण्याचं कामही ते स्वतःच करायचे त्यामुळे चार पैसे जास्त मिळायचे. कदाचित त्यामुळेच असेल पण अलिकडे त्यांना पाठदुखीचा भयंकर त्रास होऊ लागला होता. डॉक्टरनी विश्रांती घेण्याचा, आराम करण्याचा सल्ला दिला होता.. पण विश्रांतीच्या मंद ज्योतीवर गरिबांची भाकरी पचत नाही तिला कष्टाची ज्वाळाच लागते.. बाबा तशाही स्थितीत माल वाहतुकीची भाडी करतच होते..
‘पुढं काय ? ‘ हा प्रश्न गरिबाला तर श्वासागणिक पडत असतो.. एस.एस.सी. झाल्याचा आनंद हा त्याच्यासाठी आळवावरचं पाणीच ठरला. त्यापाठोपाठ ‘ पुढं काय ?’ हा प्रश्न एकाद्या वावटळासारखा त्याच्या मनात आणि घरात भिरभिरु लागला आणि त्यात ‘म्याट्रिक’ झाल्याचा आनंद पालापाचोळ्यासारखा उडून गेला. त्याला किमान डी.एड. तरी करायचं होतं..मग कुठंतरी शिक्षकाची नोकरी लागली असती. शिकणं-शिकवणं आपल्याला आवडतं हे त्याला ठाऊक होतं. त्याला खूप शिकायचं होतं पण परिस्थितीचं भान त्याला असल्यामुळे सध्यातरी शिकता येणार नाही हे ही तो जाणत होता..निदान डी.एड.होता आले तर नोकरी करत पुढे शिकता येईल असे त्याला वाटायचं..
त्याचा निकाल कळला तसं दुसऱ्याच दिवशी तो भाच्याचं यश साजरे करायला पेढे घेऊनच आला. मामा आल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. मामाजवळ डी. एड चा विषय काढून ‘पुढे काय ?’ ते निश्चित करता येईल असे त्याला वाटत होतं. दुपारची जेवणं झाली. सगळे सोप्यात निवांत बसले होते. तो डी. एड. चा विषय मामा आणि बाबांसमोर काढणार तेवढयात मामाच बाबांना म्हणाला,
“दाजी, माझा एक दोस्त हाय कापड गिरणीत कामाला.. त्येला तानाच्या नोकरीचं बोलून ठेवल्यालं हाय.. त्येनं म्याट्रिक झाल्याव याला सांगितलं हूतं.. तवा उद्याच्याला जाऊन येतो आमी. जाऊ न्हवं ? “
“आरं, आमी आडानी.. आमास्नी काय कळतंय त्येच्यातलं.. तूच बग काय ती…”
“दाजी, तुमी काय बी काळजी करू नगासा… काम हुईल असं दोस्त म्हणलाय.. येकडाव का नोकरी लागली का तुमी भाड्याचं काम वाईच कमी करा आन ईसावा घ्या. त्याबिगर दुकनं काय कमी हूयाचं न्हाय..”
“त्ये बगू म्होरचं म्होरं.. आदी नोकरी तरी मिळूनदेल..”
“पण मामा, मला शिकायचंय अजून.. डी.एड. तरी करतो.”
“आरं.. नोकऱ्या काय वाटंवं पडल्याती व्हय रं? मिळत्यालीला नगं म्हणू नी..आन दाजीस्नी निभंना झालंय.. त्येंनी तरी किस्तं वडायचं ?. नोकरी करीत करीत शिक की म्होरं,काय शिकायचं हाय ती.. नगं कोण म्हंतया तुला ? “
मामानं एका झटक्यात विषयाचा कंडकाच पाडला होता.
क्रमशः……
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈