? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 5 ☆ श्री आनंदहरी

आत शिरताच डाव्या बाजूला बाकड्यावर बसलेल्या त्याला आणि त्याच्यासोबतच्या दोघांना पाहून वाडेकर कुणालाही दिसू नयेसं गालातल्या गालात हसले आणि त्यांच्या जवळ जात कृतक कोपाने म्हणाले,

“लाज नाही वाटत… ज्यांनी अन्नाला लावलं त्यांच्याशी बेईमानी करायला ? अरे, किती विश्वासाने तुमच्यावर जबाबदारी सोपवली आणि तुम्हीच चोरी केलीत“

ते बोलत बोलत त्याच्यासमोर आले आणि त्याला म्हणाले,

“तुला तर आम्ही सज्जन, प्रामाणिक समजत होतो.. आणि तूच..?“

तेवढ्यात मॅनेजर साहेबांनी वाडेकरांना हाक मारली तसे ते तिकडे गेले.

“इन्स्पेक्टर साहेब, आमचे हे तिन्ही कामगार प्रामाणिक आहेत. त्यांना सोडून द्या.”

“पण साहेब, त्यांनी तर चोरी केलीय..”

“नाही वाडेकर, त्यांनी चोरीही केलेली नाही आणि ते चोराला सामीलही नाहीत.. आणि खऱ्या चोराचा शोध घेऊन इन्स्पेक्टरसाहेब त्याला पकडतीलच.. काय इन्स्पेक्टरसाहेब ?“

“शोधायला कशाला हवा.. मुद्देमाल सापडलाय आणि चोर ही इथंच आहे..”

“क्कायs ? मुद्देमाल सापडला ? आणि चोर इथंच आहे ? साहेब मी म्हणलं नाही का तुम्हांला.. ते तिघंच असणार… मग इन्स्पेक्टरसाहेब मोकळं कशाला ठेवलंय त्यांना.. ठोका बेड्या.. नाहीतर जातील पळून..”

वाडेकर असे म्हणताच इन्स्पेक्टर हसले आणि म्हणाले,

“अरे खरंच की.. पळून जातील हे माझ्या ध्यानातच आलं नाही, हवालदार,  बेड्या ठोका या वाडेकरला लगेच.. आणि टाका आत.”

इन्स्पेक्टर साहेबांचं हे वाक्य ऐकून वाडेकरांनी काही क्षण आकांडतांडव करत, नंतर आर्जवं करत ‘मी त्यातला नाही..’ असे सांगायचा, भासवायचा प्रयत्न केलाही पण नंतर मात्र सारा खेळ संपल्याची जाणीव त्यांना झाली तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला.. आपला खेळ संपलाय याची जाणीव होऊन ते मटकन खालीच बसले. त्याच्या बरोबरच्या दोघा सहकाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

“धन्यवाद इन्स्पेक्टरसाहेब, तुमच्या मुळे आमचा माल चोरी होण्यापासून वाचला आणि खूप मोठं नुकसान टळलं.“

“अहो, आभार तर तुमचे मानायला हवेत, तुमच्यामुळे खरा चोर स्वतःच्या पावलांनी चालत आला पोलीस स्टेशनमध्ये. फरार झाला असता तर खूप त्रास झाला असता शोधायला.. माल ही चटकन सापडला.  काही तासांचा जरी अवधी गेला असता तरी माल गुजरातमध्ये गेला असता आणि मग तिथून कुठं गेला असता हे सांगणेही आणि शोधणंही कठीण झालं असतं. “

“इन्स्पेक्टर साहेब, ते सारे क्रेडिट मात्र त्याचं आहे.. त्याने रात्री फोन करून त्याला आलेला संशय माझ्याजवळ व्यक्त केला नसता तर यातलं काहीच हाती लागलं नसतं. “

मॅनेजर साहेब त्याच्याकडे अंगुलीनिर्देश करीत म्हणाले.

“अरे हो, हवालदार, चहा बिस्किटं सांगा.. सकाळपासून त्यांनी साधा चहा सुदधा घेतलेला नाही.“

इन्स्पेक्टर साहेब हवालदाराला म्हणाले. चहा बिस्कीट मिळणार यापेक्षा आपली सुटका झाली या जाणिवेनं सकाळपासून सुकलेले त्यांचे चेहरे खुलले.

पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर मॅनेजरसाहेबांनी त्याच्या दोन्ही जोडीदारांना पैसे दिले आणि जेऊनखावून नंतर बसने परत यायला सांगितलं. मॅनेजर साहेब आणि मालकांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून शाबासकी देत गाडीत पुढं बसायला सांगितलं.

दुसऱ्याच दिवशी मिलमध्ये मालकांनी त्याचा खूप मोठा सत्कार करून त्याला पाच हजार रुपयांचं बक्षीसही दिले. तेंव्हा त्याच्याबद्दल तर्क-वितर्क करून चर्चा करणाऱ्यांची बोटं तोंडात गेली होती.

तो खुश झाला असला तरी मनात अस्वस्थही होता.  आपल्याला संशय आला म्हणून आणि मॅनेजर साहेबांनी विश्वास ठेवला म्हणून…नाहीतर आज आपण तुरुंगात  असतो… आणि चुकून मॅनेजर साहेबही त्यात सामील असते तर ?..  प्रत्येकवेळी नशीब, चांगुलपणा साथ देईल असे नाही त्यापेक्षा नकोच हे.. घरी जाऊ, रानात राबू..सुखाची, सन्मानाची मीठ-भाकरी खाऊ…

त्याने मनाशी निर्णय घेतला.. मॅनेजरसाहेबांना सांगितला. त्यांनी खूप सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा निर्णय झाला होता.

एसटी मधून फाट्यावर उतरुन,पेटी डोक्यावर घेऊन तो गावाच्या, घराच्या दिशेनं निघाला असताना त्यांच्या मनात आलं..’ वाडेकरांना आपण खुपतोय हे आपल्या आधीपासूनच लक्षात आलं होतं.. त्यात त्यांनी माल घेऊन जायला त्यांच्या नेहमीच्या माणसांना सोडून आपल्याला पाठवलं तेव्हापासूनच त्यात त्यांचा काहीतरी डाव असणार असे वाटत होतंच आपल्याला.. वाडेकरांनी स्वतः चोरी करून त्यात आपल्याला अडकवायचा आणि आपला पत्ता कायमचा कट करायचा डाव केला होता पण आपल्याला आधीच आलेला संशय आपण मॅनेजर साहेबांना आणि नंतर इन्स्पेक्टर साहेबांना सांगितला होता म्हणून बरं.. नाहीतर आपण खडी फोडत राहिलो असतो..’

वाडेकरांनी त्याला अडकवण्यासाठी  सापळा लावून ठेवला होता पण त्या सापळ्यात ते स्वतःच ट्रॅप झाले होते, अडकले होते… कदाचित हातात बेड्या पडल्यावर वाडेकरांना ते सारे आठवलं असेल.. कदाचित त्यांनी आपल्यासाठी लावलेल्या सापळ्यात आपण त्यांनाच ट्रॅप केलंय हे ही कदाचित त्यांच्या ध्यानात आलं असेल.. पण हे सारं घडलं कसं ? याचं कोडं  अजूनही त्यांना उलगडलं नसणार…ज्यावेळी त्यांच्या हातात बेड्या पडल्या त्यावेळचा त्यांचा चेहरा त्याला  आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. हसतच तो झपाझप पावलं टाकत घराकडे निघाला.

   – समाप्त –

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

शीक्षाप्रद कहानी