सुश्री सुमती जोशी
☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग ४ ☆ सुश्री सुमती जोशी ☆
पाखीचा कार्यक्रम दुसरा होता. या कार्यक्रमाचं निवेदन झाल्यावर संपूर्ण हॉलभर आनंदाची लाट उसळली. ‘फूल, फूल, ढले ढले’ रवींद्र संगीताच्या स्वर्गीय सुरांनी सगळा हॉल भरून गेला होता. पडदा उघडला. रंगमंचाच्या दोन्ही बाजूनी पांढराशुभ्र पोशाख घातलेल्या, गुलाबी हेअर बँड लावलेल्या, दागदागिन्यांनी नटलेल्या पऱ्यांच्या वेषातल्या मुली प्रवेश करू लागल्या. सगळ्याजणी एकसारख्या दिसत होत्या. रिद्धी. शिंजीनी, रूपसा कोणती हे वेगळेपणानं ओळखता येत नव्हतं. शुकतारा आणि नंदिता दोघीही उत्तेजित झाल्या होत्या. “पाखी कुठंय? पाखी?”
पहिल्या रांगेतल्या मुलींकडे बोट दाखवत नंदिता म्हणाली, “रांगेतली चौथी मुलगी म्हणजे आपली पाखी.”
नीट निरखून पहात उद्वेगानं शुकतारा म्हणाली, “नाही आई. ती मुलगी पाखीसारखी दिसतेय, पण ती पाखी नाही. आपली पाखी आणखी बारीक आहे.”
“ती मागच्या रांगेत असेल.” व्याकूळ होत नंदिता नातीला शोधू लागली.
किंचित स्मित करून चंद्रोदय उठला. “थांब पुढे जाऊन फोटो काढतो. कॅमेऱ्याची लेन्स नक्कीच पाखीला शोधून काढेल.”
शुकतारा अस्वस्थ झाली. सगळ्या रवींद्र संगीताच्या तालावर विलोभनीय नाच करत असल्या तरी त्यांचं मन पाखीला शोधण्यात गुंतलं होतं. रंगमंचावर पंचवीस मुली आहेत याचं चंद्रोदयला आश्चर्य वाटलं. ज्यांनी आपल्या मुलीला शोधलं ते पालक खूश दिसत होते. गाण्याचे मंजुळ सूर आणि नृत्याचा ताल याकडे दुर्लक्ष करत ते आनंदातिशयानं म्हणत, “ती बघ श्रेया, ती बघ तितली, ती बघ मामणी, ती बघ…” चंद्रोदयनं अनेक फोटो काढले पण कॅमेऱ्याच्या लेन्सला पाखीला शोधता आलं नाही. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तालावर नाचता नाचता शेवटच्या रांगेतल्या मुली पुढे आल्या, तरीही त्यात पाखी कुठेच दिसेना. तो अस्वस्थ झाला.
नाच संपल्यावर फुलपाखराप्रमाणे उडत उडत मुली विंगेत गोळा झाल्या. शुकतारा वेडीपिशी झाली होती. चंद्रोदयपाशी जात म्हणाली, “तुम्ही ताबडतोब माझ्याबरोबर ग्रीन रूममध्ये चला. मला काही हे बरोबर वाटत नाहीय.” चंद्रोदयला काही बोलायचा अवकाश न देता शुकतारा जवळ जवळ ओढतच त्याला घेऊन विंगेत गेली. पडदा पडला होता. पुढच्या कार्यक्रमाच्या निवेदनाचा आवाज हॉलमध्ये ऐकू येऊ लागला. ग्रीनरूमच्या दरवाजात आता अपाला उभी नव्हती. आतमध्ये मुलींचा चिवचिवाट चालू होता. शुकतारा आणि चंदोदय आत आले तेव्हा अपाला मुलींना खाऊची पाकिटं वाटण्याच्या तयारीत होती. “अगं अपाला, रिद्धी कुठंय? रिद्धी तर नाचलीच नाही.”
गोंधळलेल्या अपालानं मागे वळून पाहिलं. भुवया उंचावत ती उद्गारली, “असं कसं झालं?”
अपाला शोधू लागली. पालकांच्या शेकडो चौकशांना तोंड देणं आता तिला शक्य नव्हतं. अपाला हाका मारू लागली, “रिद्धी, कुठे आहेस तू? सगळ्या मुलींपाशी ये.” काय झालंय ते पंचवीस मुलींना समजेना. त्या अवाक होऊन अपालाकडे पाहू लागल्या. कोणीच पुढे आलं नाही. आता मात्र अपालाचं धाबं दणाणलं. शुकतारा तिच्यावर तुटून पडण्याआधीच चंद्रोदयनं शांतपणे विचारलं, “स्टेजवर किती मुली होत्या?”
“सत्तावीस मुली होत्या.” अपालानं एका दमात उत्तर दिलं.
“मोजून बघा. इथे पंचवीस जणीच आहेत.”
अपाला मोजू लागली. “एक, दोन, तीन, चार….तेवीस, चोवीस, पंचवीस! असं कसं झालं? उरलेल्या दोन मुली कुठंयत?” क्षणभर अपालाच्या तोंडून शब्द फुटेना. ती ग्रीनरूमच्या बाहेर आली आणि व्हरांडयाच्या डाव्या बाजूला असलेल्या एका खोलीत शिरली. पाहुणे मंडळींच्या स्वागतासाठी ही खोली वापरत असत. ती खोली व्यवस्थापकांनी आज त्यांना वापरायला दिली होती. खोलीत शिरल्यावर अपालाचे डोळे फिरले. मोठया सोफ्यावर बसून निशिगंधाच्या माळा आणि अनेक छोटया छोटया वस्तू गोळा करून रिद्धी आणि सोमदत्ता स्वत:च्या खेळात रंगून गेल्या होत्या. साजशृंगार झाल्यावर या दोघी सगळ्यांच्या नजरा चुकवून इथे कधी आणि कशा आल्या त्याचा अपालाला पत्ताच लागला नाही. मेकअप बिघडू नये, आपापसात भांडू नये म्हणून आटापिटा करता करता कोण आहे आणि कोण पळालंय ते अपालाला समजलं नाही. कुठेही रिद्धी आणि सोमदत्ताचा आवाज येत नव्हता. कुठला रंगमंच, कुठला कार्यक्रम आणि कुठला नाच….’खेळायच्या खोली’त खेळतांना त्या देहभान विसरल्या होत्या.
समाप्त
श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ शारदीय आनंद बाजार २०११ या बंगाली कथेचा भावानुवाद
भवानुवाद – सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈