श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
☆ जीवनरंग : लघुकथा : डाकू, व्यवहार – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆
☆ डाकू ☆
एका गावांत दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावांतील कित्येक घरांत घुसून लोकांना जबर मारहाण केली आणि घरांत जो कांही मौल्यवान ऐवज सापडला तो घेऊन पसार झाले. दुसर्या दिवसांपासून गावांत पोलीसांचा अहोरात्र बंदोबस्त सुरु झाला.
पोलीस बंदोबस्त सुरु होऊन अवघे चार दिवस सुद्धा झाले नाही तोच गावकर्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांकडे मागणी केली की पोलीस बंदोबस्त तात्काळ काढून घेण्यांत यावा. डाकूंचे काय ते आम्ही स्वत; बघुन घेऊ.
मोर्चा काढणार्यांमधे गावांत कोंबड्या पोसणारे आणि गावांतील तरुण लेकी-सुनांचे पालक यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
☆ व्यवहार ☆
‘काय हो, तुमचे चोरी गेलेले सामान सापडले काय?’
‘होय, नव्वद टक्के सामान हाती आले.’
‘अरे वा, बरेच हाती आले म्हणायचे. आमचेकडे चोरी झाली होती तेव्हां तर प्रयत्नांची पराकाष्टा करुन ही जेमतेम पन्नास टक्केच सामान हाती आले होते. उरलेले सर्व चोर आणि पोलीस यांच्यातच लंपास झाले.’
‘म्हणूनच तर…आम्ही जरा व्यावहारिक मार्ग पत्करला. पोलिसांमार्फत प्रयत्न करण्याऐवजी सरळ चोरांशीच संपर्क साधला.’
© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mail: [email protected] * web-site: http://sites.google.com/view/bhagwan-vaidya
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈