☆ जीवनरंग : अनपेक्षित – सुश्री माया महाजन ☆
पती-पत्नी दोघांनी मिळून मुलांना मोठ्या कौतुकाने लाडाकोडात मोठे केले. उत्तम खाणे-पिणे महागड्या शाळांतून शिक्षण, ब्रॅण्डेड कपडे, पादत्राणे-प्रत्येक मागणी पूर्ण करत गेले. मुलं पण बुद्धिमान होती, उच्चशिक्षित होऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकर्या मिळविल्या. मोठ्या हौसेने त्यांची लग्न करून दिली. आता लेक सुना नातवंडामध्ये आयुष्य सुख-समाधानात जात होते.
वृद्धावस्था आली तसा दोघांना आता थकवा जाणवू लागला. त्यामुळे घरातच असत. नवर्याचा खोकला आणि बायकोचं गुडघे दुखीने कण्हणे ऐकले की मुलांच्या सुनांच्या कपाळावर आठ्या पडत. काही दिवसानंतर म्हातारा-म्हातारीला असे जाणवू लागले की मुलं सुना त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांच्याशी बोलायला कोणाला वेळ नाही आणि कोणी त्यांची तब्येतही जाणून घ्यायला उत्सुक नाहीत. हळूहळू त्यांच्या जेवणखाणाची कोणी काळजी करेना.
एक दिवस म्हातारे जोडपे असेच काळजी करीत बसले असताना त्यांचा आठ वर्षांचा नातू तिथे आला आणि विचारू लागला, ‘‘आजोबा, ओल्ड एज होम काय असतं?’’ आश्चर्याने आजोबांनी विचारले, ‘‘का बरं?’’ नातू म्हणाला ‘‘मम्मी पप्पा म्हणत होते की म्हातार्या लोकांसाठी ते खूप छान घर असतं. तुम्हाला तिथे पाठविण्याविषयी बोलत होते.’’ म्हातारा-म्हातारीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला बस् आता आणखीन नाही सहन होत. पंधरा दिवसांनंतर घरासमोर एक टॅक्सी थांबली. म्हातार्या जोडप्याने आपले सामान टॅक्सीत ठेवले. मुलांना-सुनांना सांगितले आम्ही दुसर्या कॉलनीत फ्लॅट घेतलाय, आता तिथेच राहणार मुला-सुनांना वाटले चला न मागताच इच्छा पूर्ण झाली. सुंठी वाचून खोकला गेला. वाईटपणा घ्यायची वेळ नाही आली.
दोनच दिवसानंतर पाच-सहा लोक हातात काही पेपर घेऊन आले. मुलांना दाखवत म्हणाले, ‘‘हे घर आम्ही विकत घेतलंय हे तोडून इथे हॉस्पिटल बांधणार आहेात. तुम्हाला एक आठवड्यातच घर रिकामं करावं लागेल, नाही तर…’’
मुलांच्या, सुनांच्या पायाखालील जमीनच हादरली. आई वडिलांशी केलेल्या दुर्व्यवहाराचा, अत्याचाराचा परिणाम इतक्या लवकर होईल याचा त्यांना अंदाज नव्हता आला.
मूळ हिंदी कथा – अप्रत्याशित – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा
मो.- ९३२५२६१०७९
अनुवाद – सुश्री माया महाजन
मो.-९८५०५६६४४२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
बेहतरीन रचना
नेमका उपाय सुचवणारी कथा.मस्तच.