☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ काव्य संग्रह – “पारिजात” – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ श्री विशाल कुलकर्णी ☆ 

कवीमन हे कोणत्याही मानवी शक्तीद्वारा बनविले जात नसून ते जन्मावे लागते हे सरस्वती देवीचा वरदहस्त लाभलेल्या ठाणे येथील विदुषी संगीता कुलकर्णी यांचा  “पारिजात” हा काव्यसंग्रह..

या काव्यसंग्रहामध्ये उण्यापु-या ऐक्केचाळीस कवितांचं संचयन आहे.

या काव्यसंग्रहातील त्यांची पहिली कविता ” सद्गुरू स्तवन ” ही कविता म्हणजे कृतज्ञतेची एक भावांजलीच आहे अगदी मनापासून आळवलेली अशी सुंदर मनाला भिडणारी  जाणवणारी.. अस्सल प्रेमवीर आणि असली प्रेमिका ” पहिलं प्रेमपत्र ” या कवितेत उत्तम प्रकारे त्यांनी रंगवून टाकली हे त्यांचे कौशल्य मानावे लागेल.. प्रेमावरच्या कवितांनी बाजी मारलेली आहे..

सुश्री संगीता कुलकर्णी

सुगंध, पुस्तकाचे जग, स्पंदन, जागी अजून मी, काही क्षण स्वतःसाठी, साजणा,संजीवनी,माझ्या जीवनात, आस्वाद, रेशीमगाठी या कवितांमधील भावना अतिशय सुरेखरितीने  त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ” ना-ती” ही कविता तर मनाला चटका लावणारी तर ” अनोळखी ” ही कविता तर अतिशय वेगळी अशी. सर्वांनी अनुभवलेली काळजाला भिडणारी अतिशय सुंदर..

“असचं जगायचं” या कवितेत तर आपलं आयुष्य आपण असचं जगायचं? असा प्रश्न विचारला आहे..

आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार हे हटकून येत असतातच. जीवन म्हणजे

ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे.खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही असे म्हणतं आठवणींना घेऊन बसावं कधी समुद्र किना-यावर चारचौघात बसण्यापेक्षा आयुष्य जास्त सुंदर वाटतं असं त्या ” आयुष्य सुंदर असतं” या कवितेतून त्या सांगतात. तर  “श्रावणधारा” या कवितेत श्रावणातल्या ऊन- पावसाचे सुंदर खेळ मेघांवर उठलेला मल्हाराचा सूर

आभाळातल्या इंद्रधनूचा गोफ आवेग उत्कटता सारे या कवितेत सहजतेने उमटलेले आहेत..

सावली माणसाची साथ कधीच सोडत नाही. क्षणाचाही विलंब न करता जवळ येत असते.सावली सारख्या सोबत असणा-या आयुष्याला साजेशी असलेली ” माझी सावली” ही कविता.

रिमझिम ऊन पावसाच्या लपंडावात निसर्गाची गळाभेट पाहणारी निसर्गाचा खेळ हवाहवासा वाटणारी निसर्गाची समृद्धी अनुभवत पायवाटेवरून चालताना गुणगुणणारी कवयित्री ” रिमझिम ” या कवितेत भेटते..  पाऊस या विषयावरची गुंफण सुरेखच.. मृगजळ असलेल्या आपल्या जीवनात एक वेगळं आयुष्य घडविणारी, सुखाचा आसमंत फुलवणारी अखंड तेवणारी प्रेमाची ज्योत ” मृगजळ ” या कवितेत भेटते..

पुस्तकांच्या जगात आपण नेहमीच वावरतो पण ” पुस्तकांचे जग” ही आणखी एक वेगळी कविता..या कवितेच्या रूपात आपण आणखीच वावरतो…” महानायक ” ही कविता सृष्टीच्या ईश्वराशी दिलाने एकरूप होऊन जीवन गाण्याला ताल शब्दसूर मिळतील अशी कविता अप्रतिम..

कवयित्रीाने या संग्रहात वेगवेगळ्या विषयांवर अतिशय सुंदर सहज अशा कविता लिहिल्या आहेत. अध्यात्म, व्यक्तिरेखा निसर्ग, आत्मचिंतनवर प्रेम या विषयांवरही त्यांच्या कविता आहेत. मनाला भिडणा-या जणू काही स्वतःच अनुभवलेल्या..

अतिशय सुंदर वाचनीय अतिशय प्रगल्भ अशा कविता या पुस्तकात आहेत.

मनःपूर्वकता हा कवितेचा विशेष तर सहजता उत्स्फूर्तता हे अलंकरण आहे

 

©  श्री विशाल कुलकर्णी

ठाणे

9821554495

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments