सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ तिसरं पुस्तक – सौ.गौरी गाडेकर ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी☆
कथासंग्रह – तिसरं पुस्तक
लेखिका – सौ.गौरी गाडेकर
पृष्ठसंख्या – 188
सौ.गौरी गाडेकर यांच्या कथा नेहमी दिवाळी अंकात असतात. मी अगदी काॅलेजात असल्यापासून अनुराधा, माहेर, कथाश्री मधून वाचत आले आहे. त्यांच्या कथा नुसत्या अंकात येतच नव्हत्या तर त्यांना पारितोषिके पण मिळालेली आहेत. त्यांचे कथा संग्रह 1) नातं 2) आउटसायडर सहज आणि आता तिसरं नांवाप्रमाणेच तिसरं पुस्तक आहे.
त्यांची भाषा सोपी सहज कळणारी,प्रसंग ,माणसं नेहमी आपल्या आयुष्यात येणारी,मनोरंजक म्हणून मला भावते.
त्यांनी लिहिलेल्या ह्या कथासंग्रहात वेगवेगळ्या विषयांवरील कथा आहेत.
‘लिव्ह इन’ ही कथा आजच्या काळात अतिशय समर्पक आहे. कित्येक जणांची मुलं परगांवी किंवा आपापल्या नोकरी धंद्यात मग्न. आईवडिलांना द्यायला वेळ नाही. त्यातून त्यांचा किंवा तिचा लाईफ पार्टनर नसेल तर उतार वयात आलेला एकाकी पणा ह्या वर डोळसपणे केलेला विचार ह्या कथेत मांडला आहे.कथेचा शेवट कलाटणी देणारा आहे.
सुश्री गौरी गाडेकर
ह्यांच्या सगळ्याच कथेची भाषा सोपी.प्रसंग, व्यक्ती जिवंतपणे रेखाटण्याची हातोटी . हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.
केळ ‘ही महत्त्वाची कथा आहे.जी.ए.कुलकर्णी यांच्या कैरी व तुती या कथांची पश्चात कथा आहे.
ह्या कथेमध्ये त्या काळातील प्रेमळ, भाबडी माणसे, दुस-यासाठी पराकोटीचा त्याग करणारी निस्वार्थी माणसं, दुष्ट प्रवृत्तीचा मालक,आणि शेवटी सगळी सूत्रं फिरवणारी नियती असं जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं केलेलं आहे.
इंग्रजीचे सर ही कथा तर खूपच छान. शालेय जीवनातील या सरांनी केलेले संस्कार नायिकेच्या मनांत खोलवर होते की ती त्यांचा चेहेरामोहोरा विसरली .पण त्यांचे विचार वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते.त्या सरांच्या द्वारे लेखिका आपल्याला बरंच काही सांगून गेली. ही कथा वाचतांना मला माझेच प्रतिबिंब थोड्या फार प्रमाणात दिसले.
‘मालाडचा म्हातारा’ ही कथा एकाआईच्या मुलीवरच्या निस्सीम प्रेमाची, तिच्यासाठी केलेल्या त्यागाची, तर एका स्वाभिमानी स्रीने आपल्या संसारासाठी केलेल्या कष्टांची, सर्व माणसांची मने समजून घेणारी काकी अशा स्रीच्यावेगवेगळ्या व्यक्तीरेखा लेखिकेने रेखाटल्या आहेत.त्या सगळ्याजणी आपल्यातल्याच आहेत असा भास होतो
‘तसली’ ही कथा छान बाळबोध चि.सौ.कां.ची आणि तिचा झालेला गैरसमज त्यातून झालेला विनोद. खूपच गंमतीशीर ‘शाप ‘ ही कथा त्यातील सुमी, मेनका,आई ह्या व्यक्ती आपल्या समोर उभ्या रहातात. मनांतून जात नाही.खरचं एखाद्या घराण्याला असा शाप असू शकतो का? इतकं सुंदर वर्णन लेखिकेने केले आहे.म्हातारे सासरे,मनोरुग्ण सासू,छोटा मुलगा सगळ्यांची जबाबदारी पेलताना प्रेयसीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कृतघ्न पुरुष बाहेर कसा आकर्षित होतो ह्यांचे लेखिकेनेह्रदयस्पर्शी वर्णन केलं आहे
अनुताप ही कथा ह्रदयस्पर्शीआहे.आपल्याला नेहमी वाटते आपल्या आई वडिलांचे कधी कधी चुकले पण खरंतर त्यांना त्या त्या वेळी जसा प्रसंग आला त्याला तोंड देण्यासाठी तसे वागावे लागलं. जेव्हा आपण तशा प्रसंगातून जातो आणि आपली मुलं किंवा नातेवाईक आपल्याला दोष देतात तेव्हा आपल्याला आईवडिलांना दोष दिल्याचा पश्चात्ताप होतो.
लेखिका कधीकधी आपल्याच घरांतले प्रसंग सांगते असे आपल्याला वाटते .
‘प्राक्तन ‘ ह्या कथेत एकच व्यक्ती चित्र रेखाटताना किती सकारात्मक भाव दाखवते तीच व्यक्ती कथेत सगळं अनुभव दाखवताना वेगळे भाव दाखवते.अशी तक्रार स्वतः कथा लेखकाकडे करते.ही नेहमीपेक्षा वेगळीच कल्पना आहे.
एकूण थोडक्यात सांगायचे तर भाषा सरळ सोपी,व्यक्ती,प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडणारे ,वाचून अंतर्मुख करणारे असतात. रोजच्या जीवनात येणारे ताणतणाव, अनुभव,याचे वर्णन हुबेहुब असते .त्यामुळे वाचकांचे कथांशी बंध जुळून येतात.सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह आहे.
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
पुस्तकाचे समीक्षण छान केले आहे.