सुश्री विभावरी कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ महर्षी वाल्मिकी… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
निखळ वाचनाचा आनंद घ्या…
महर्षी वाल्मिकी….
लेखक : विश्वास देशपांडे.
प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे.
अचानक “महर्षी वाल्मिकी“ हे विश्वास देशपांडे लिखित पुस्तक हातात पडले. एखादे पुस्तक पाहताक्षणीच आवडून जाते आणि मनाची पकड घेते. तसंच या पुस्तकाच्या बाबतीत झाले.
आकर्षक मुखपृष्ठ, छोटेखानी पण वेगळेपण नावापासूनच जपणारे, व आत्तापर्यंत माहिती नसलेले आगळे वेगळे पुस्तक. पुस्तकाची रचना अतिशय उत्कृष्ट व उत्सुकता वाढवणारी आहे. सुरुवातीच्या पानावर लेखक परिचय व त्यांची साहित्य संपदा या विषयी माहिती आहे. त्या नंतर पुस्तकाविषयी लेखकांचे मनोगत पुस्तकाची थोडक्यात माहिती देणारे व उत्सुकता वाढवणारे आहे. त्यात भर घालणारी श्री.प्रमोद कुलकर्णी यांची सुंदर प्रस्तावना! मनोगत व प्रस्तावना वाचून कधी ते पुस्तक वाचते आहे असे होऊन गेले.
श्री विश्वास विष्णु देशपांडे
विशेष म्हणजे दहा लेख असून अनुक्रमणिका नाही. त्यामुळे एकच गोष्ट वाचत आहोत असे वाटते आणि सलग वाचन केल्याशिवाय राहवत नाही. पुस्तक वाचताना त्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. निसर्ग, ऋषींचा आश्रम, शिष्यगण, नदी, पक्षी, या सर्वांचा आपण एक भाग आहोत असे वाटते.
क्रौंच पक्ष्याच्या हत्येमुळे पूर्वाश्रमीच्या आठवणींच्या रूपात त्यांचा जीवनपट उलगडत जातो. जी गोष्ट शालेय जीवनात ७/८ ओळीत संपत होती तीच गोष्ट पुढच्या तीन लेखात अतिशय बारकाव्यासहित वाचायला मिळते.
वाटमारी करणाऱ्या रत्नाकरचा पश्चाताप, व रामनामाच्या तपश्चर्येमुळे झालेला अनाकलनीय बदल – म्हणजे वाल्मिकी ऋषींमध्ये झालेले रूपांतर फारच रंजक व वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. रामनाम, मनापासून झालेला पश्चाताप व स्वतः मध्ये बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी.
मला असे माहिती होते की नारद मुनींच्या सांगण्यानुसार वाल्मिकींनी तप सुरु केले. पण तेही सत्य समजले व नारदांकडून पुढील कार्याची प्रेरणा मिळाली हेही समजले. देवर्षी व ब्रह्मदेव यांच्या भेटीचा वृत्तांत अतिशय रोचक व अध्यात्मिक उंचीवर घेऊन जातो. विशेषतः मनुष्य आपल्या कर्माने भाग्यरेषा बदलू शकतो– हे मनुष्याच्या हातात आहे– हे विशेष महत्वाचे वाटले.
त्यांनी रामकथा कशी लिहिली? याचे उत्तर मिळाले. खरोखरच दिव्य शक्तींच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. रामकथा त्यांच्या डोळ्यासमोर कशी साकारली हेही समजले.—- वाल्मिकी ऋषींनी रामायण काव्यात समाजाला उपयोगी व चिरंतन तत्वे रंजक रीतीने मांडली आहेत. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आदर्श आजही उपयुक्त आहेत. मानवी भावभावना अतिशय उत्तम रीतीने साकारल्या आहेत. त्यातून आदर्श राजा, समाज याची चिरकाल टिकणारी शिकवण मिळते.
हे पुस्तक खूप अभ्यासपूर्वक आपल्या समोर आले ( माझ्या माहिती प्रमाणे हे एकमेव असावे ), आणि बरीच माहिती मिळाली. गैरसमज दूर झाले. वाल्मिकी खरंच महान होते. इतके चिरकालीन टिकणारे महाकाव्य लिहून ठेवले, मात्र स्वतःची माहिती कुठेच ठेवली नाही.
आपल्यापर्यंत महर्षी वाल्मिकी यांचा जीवनपट आपल्या लिखाणातून पोहोचवणाऱ्या देशपांडे सरांचे मनापासून आभार ! कितीही आभार मानले तरी कमीच आहेत.
परिचय – विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈