सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक – प्रेम रंगे,ऋतूसंगे
कवी – सुहास रघुनाथ पंडित
सुहास पंडित यांचा हा दुसरा कविता संग्रह. सध्याच्या विद्रोही आणि आक्रोशी कवितांच्या कोलाहलात यांची कविता वेगळ्या वाटेने चालताना दिसते. झुळझुळणार्या झर्याप्रमाणे, ती संथ, शांतपणे प्रवाहीत होते.. ती जीवनावर प्रेम करते. माणसांवर प्रेम करते. प्रेमभावनेवर प्रेम करते आणि निसर्गावरही प्रेम करते. काही कविता ‘गर्जायच्या’ आणि ‘गाजवायच्या’ असतात. त्या समूहमानाला आवाहन करतात आणि समूहाकडून टाळ्या मिळवतात. काही कविता स्वत:शीच वाचत, गुणगुणत समजून घ्यायच्या असतात. आणि वा: म्हणत त्यांना स्वत:शीच दाद द्यायची असते. सुहास पंडितांच्या कवितांची जातकुळी ही दुसर्या प्रकारच्या कवितांची. त्या वाचता वाचता आपोआप समजत जातात. त्यांची कविता अगदी साधी, सोपी, सुबोध आहे. प्रचारकी थाटाची, उपदेशपर, काही प्रबोधन करणारी अशी नाही. आपला अनुभव इतरांपर्यंत पोचावा, म्हणून त्यांनी कविता लिहिली. निसर्गाचा अखंड सहवास आणि माणसामाणसातील प्रेम, आपुलकी, नात्यांची जपणूक याशिवाय आपलं जगणं समृद्ध होऊ शकत नाही, असं त्यांना वाटतं, आणि ते खरेच आहे. आपण काही वेगळं, नवीन असं कवितेतून मांडलं, असं ते म्हणतही नाहीत. सार्वजनिक अनुभव ते सांकेतिक पद्धतीनेच मांडतात. मात्र त्यांचे शब्द, कल्पना येतात, ते विशिष्ट लय घेऊन येतात. वृत्तात बद्ध होऊन येतात. छंद-वृत्त यावर त्यांची चांगली पकड आहे. आपला आशय मांडण्यासाठी त्यांना शब्दांची कसरत करावी लागत नाही. ‘शब्द त्यांच्या सोबतीला’ नेहमीच राहिले आहेत. त्यांच्या कविता, त्यांच्या मनाचे भाव प्रकट करणारी भावगीतेच आहेत. त्यांची कविता भावगीतकार भा. रा. तांबे यांच्याशी त्यांची कविता नाळ जोडते.
श्री सुहास रघुनाथ पंडित
‘अचानक भेट’ या कवितेत ते सांगतात, तिची अचानक भेट झाली, की जीवनात सुखाची बरसात होते, पण निरोप घेताना मात्र एकांतात तिच्याशिवाय रात्र घालवायाची कशी?’ या विचाराने ते अस्वस्थ होतात ‘अपुरी आपुली भेट’ कविता वाचताना ‘अभि ना जाओ छोडकर, ये दिल अभी भरा नाही.’ या सुप्रसिद्ध गीताची आठवण येते. पण त्यापुढे जाऊन ते विचारतात, ही अपुरी भेट पुरी कधी होईल? ते म्हणतात, ‘शब्दच होतील पक्षी आणिक गातील गाणी तव दारी.’ तू मात्र तो अर्थ समजून घे, म्हणजे माझ्या मनाला पुन्हा उभारी येईल.’ प्रेमाचे नाते हे स्पर्शाच्या आणि शब्दाच्या पलीकडले असल्याचे ते सांगतात आणि तिनेही ते समजून घेतले आहे. म्हणूनच मग प्रीतीचे गीत ती मनातच गाते. म्हणते, ‘मी कधीच ‘नाही’ म्हटले नव्हते तुला … उमलायाचे? उमलू दे तुझ्या मनातील प्रीतफुला. ‘ होकार देण्याची ही तर्हाच न्यारी नं? ‘ध्यास’ कवितेत तिला भेटायचा ध्यास त्याला लागलाय. की त्याला भेटायचा ध्यास तिला लागलाय. कवितेची गंमत अशी की हा ध्यास त्याला लागलाय की तिला? स्पष्ट होत नाही, पण ते म्हणतात,
स्वप्न होते, सत्य होते, काय होता भास तो
गुंतले हे ह्रदय माझे एकच आता ध्यास तो
एकदा हृदये परस्परात गुंतली आहेत. परस्परांची ओळख पक्की झाल्याने आता प्रेमाची अमृतवेल बहरेल आणि जीवनात सुखाची बरसात होईल. मग तसेच होते. दुराव्याचा काळ संपतो. ती येते. लक्ष फुलांच्या गंध कुपीतील सुगंध उधळत येते. देवघरातील लक्ष ज्योतींचा प्रकाश होऊन येते. लक्ष कल्पना कवि प्रतिभेसह मनात फुलवत येते. धुंद जीवनी कसे जगावे, समजावत ती येते. ती म्हणजे श्वासातून फुलणारी साक्षात कविता त्याला वाटते. आता दुरावा संपतो. दोघे एकमेकांची होतात. सुखाचे घरटे बांधले जाते. या नव्या नव्हाळीत असतेस घरी तू तेव्हा मन फुलापाकरू होतं आणि जगण्याचं अत्तर होतं. ‘तुझा असा सहवास लाभता, चिंता, व्याधी सारे मिटते. ते तिच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक लिहितात, ‘ व्रत कसले हे जन्मभराचे घेशी? … ना मागशी पण अनंतरूपे देशी ‘ यामुळे आश्वस्त होत तिच्यावर सगळं घर सोपवून आपण निर्धास्त झाल्याचे ते सांगतात. त्यांना जगण्याचं उत्तर सापडतं. कोणतं? ते काही लिहिलेलं नाही. त्यांनी ते सुचवलय. ते उत्तर म्हणजे तिचं अस्तित्व. तिचं असणं.
अनेक दिवसांच्या सहवासानंतर तिच्या मनातली दु:खे, खंत, आनंद त्याला अचूक कळतात. मुलांच्या आठवणीने ती दु:खी, सैरभैर झाली आहे, हे लक्षात येताच, ते तिला समजावतात,’ सहज जाणतो’मध्ये ते म्हणतात, पंख फुटले की घरट्यातून पाखरे उडून जाणारच. ‘असती सुखरूप कशास चिंता गगन तयांना खुले
‘पंख लाभता नाते त्यांचे नव्या युगाशी जुळे
विश्वासाचा बांधुनी सेतू हासू येवो तव वदनी’ तुझ्या माया-ममतेचा आणि सदिच्छांचा आशीर्वाद तेवढा त्यांना लाभू दे म्हणजे झालं.
दिवस सरतात. वय वाढतं. मन प्रगल्भ होतं. तशीच कविताही प्रगल्भ होते. सूर्यास्ताच्या वेळी ते म्हणतात, लोकांतातील गप्पा नकोत. एकांतातील जवळीक साधू . आता हिशेब कसला मागायचा, जे आहे, ते आपली शिल्लक आहे. आपलेही काही चुकले असेल, सगळी काही तिची चूक नसेल, याचीही त्यांना जाणीव होते. इतकं जगणं झाल्यावर आताच कुठेशी ओळख झाली., असेही त्यांना वाटते आणि ते म्हणतात,
‘असेच राहू चालत आणिक अशीच ठेवू साथ सदा.
आता जराशी ओळख झाली, परस्परांवर होऊ फिदा ‘
तर ‘विश्रांतीचा पार जुना’ मध्ये ते सांगतात,
‘खूप जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना
खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा पार जुना ‘ पुढच्याच कवितेत ते म्हणतात,
विसरायाचे अन् सोसायाचे आता सारे झाले गेले’
त्यांच्या बहुतेक सगळ्या कवितांचा केंद्रबिंदू ती आहे. अर्थात काही कविता हटके, वेगळे सूर आळवणार्याही आहेत. ‘एक झाड गुलमोहराचं’ ही कविता आईविषयीच्या भावना व्यक्त करणारी. ‘वाढतो आपण तिच्याच सावलीत गोळा करतो पाकळ्या
ती नेहमीच जपत असते फुलं आणि कळ्या.’ म्हणजे मुलं- नातवंड. ती दिसताक्षणीच मन तिच्याकडे ओढ घेते. आपण कसेही वागलो तरी तिच्या मनात मात्र नसते पाप, म्हणजे त्यांच्याविषयीचे वाईट विचार. ’वधूपित्यास’ ही कविता यातली एक सुरेख कविता. वधुपित्याची मन:स्थिती जाणणारा कुणी आत्मीय म्हणतोय, आल्या क्षणाला सामोरा जाणारा तू आज का केविलवाणा झालाहेस? मन घट्ट कर आणि तिची पाठवणी कर. दु:ख होतय? खुशाल रडून घे घळघळा . आजच्या दु:खाच्या धारातून बरसणार आहेत उद्याच्या अमृतधारा. ‘सोड हात फिरव पाठ जाऊ दे तिला गाणं गात. तिचा सूर तिला सापडेल डोळ्यांमधलं स्वप्न फुलवेल. तू फक्त वाचत रहा तृप्ती तिच्या चेहर्यावरची अन् बरसात करत रहा आशीर्वाद आणि शुभेच्छांची ‘
आणि एक कविता ‘शहाणपण’. या कवितेच्या पुढची. ‘बाबा, तुम्ही काळजी करू नका. सांभाळीन मी सगळं’ असं मुलगी म्हणते, तेव्हा बाबाला प्रतीत होतं, ‘मुलीची झाली बाई आणि बाईची झाली आई. आणि घेतलं तिने ‘शहाणपण’ अंगभर लपेटून गच्च पदरासारखं.
‘ऋणानुबंध ‘ हीही एक अशीच वेगळी कविता. ते म्हणतात, मी कधी ऋण काढले नाही. पण ऋणी मात्र झालोय. ‘इथली व्याख्या , नियम सगळंच निराळं. ज्याचे ऋण अधीक, त्याचाच मी प्रेमाभाराने गौरव केला. ‘ या ऋणाच्या बंधनाने मज असे बंदिस्त केले.
ज्यांनी मला बंदिस्त केले, मी त्यांना हृदयस्थ केले.’ हे ऋण त्यांच्या कवीवरील प्रेमभावनेचे आहे.
पुस्तकात निसर्गचित्रांचे एक सुंदर सजलेले दालन आहे. शब्दातून सुरेख अशी निसर्ग दृश्ये कवीने डोळ्यापुढे उभी केली आहेत. चैत्रापासून श्रवणापर्यंतच्या ऋतूंची लावण्य रुपे, त्यांच्या नाना कळा इथे शब्दातून अवतीर्ण होतात. प्रत्येक कविता, त्यातील प्रत्येक ओळ उद्धृत करण्याचा मोह होतो. भिंतीवर चढणार्या वेलीबद्दल त्यांनी लिहिलय,
किती मुरडावे, किती लचकावे, वळणे घ्यावी किती
सहजपणाने चढून जाते वेल ही भिंतीवरती.
किंचित लवते, कधी थरथरते, शहारते कधी वार्यानी
सांजसकाळी, कातरवेळी, बहरून येते कलिकांनी
सुहासजींना बागकामाची अतिशय आवड आहे. त्यामुळे त्यांची रोजची सकाळ निसर्गाच्या, त्यातील झाडा-पेडांच्या सहवासात जाते. ते करताना वेलीचं जे सहज दृश्य नजरेस पडलं, त्याचं किती सहज दर्शन त्यांनी या ओळीत घडवलय.
चैतन्याच्या लाख खुणा मध्ये ते म्हणतात,-
डोंगरमाथ्यावरती कुरळे कुरळे मेघ दाटतील.
इंद्रपुरीचा दरबारी मग सौदामिनीचे पाय थिरकतील.
वनावनातून होईल आता जलधारांचा धिंगाणा
हिरव्या कोंबामधून फुटती चैतन्याच्या लाख खुणा
प्रत्येक ओळीतून आलेल्या हिरव्या शब्दाची पूजरुक्ती असलेली ‘हिरवाई’ ही कविता, चित्त न लागे कुठेही ही मोरावरची कविता, रात्र काळी संपली, रानवाटा , किरणोत्सव, सूर्याचे मनोगत अशा आणखी किती तरी चांगल्या कविता यात आहेत. खरं तर सगळ्याच कविता चांगल्या आहेत, असं म्हणायला हवं. इंद्रधंनुष्य. मोहक. नाना रंग ल्यालेलं. त्याला धारणीमाता म्हणते,
काळ्या माझ्या रंगावरती जाऊ नको तू असा
रंगांची मी उधळण करते विचार तू पावसा
फळे, फुले अन् पानोपानी खुलून येती रंग
रूप पाहुनी माझे गगनी होशील तूही दंग
दोन कविता यात अशाही आहेत, की ज्यात निसर्गाचे लावण्यरूप नाही. पाऊस कोपतो तेव्हामध्ये अतिवृष्टी आणि अनावृष्टी दोन्हीबद्दल लिहिले आहे. क्रुद्ध जाहली कृष्णामाई ( संथ वाहते कृष्णामाईच्या चालीवर) मध्ये त्यांनी लिहिले, मानवनिर्मित सर्व चुकांची ती जाणीव करून देते. ते लिहितात, निसर्ग छोटा, आपण मोठे मस्ती मगही अशीच जिरते.
शक्ती, बुद्धी व्यर्थची सारे विवेक नसता काही.
ती मग आपल्या हजार जिव्हा पसरून अपुल्या सारे कवेत घेते.
नाही म्हणायला या दोन कविता तेवढ्या प्रबोधनपर आहेत.
तर असे हे सुहासजींच्या कवितांचे नाना रंग. नाना आविष्कार. नजरबंदी, नव्हे मनबंदी करणारे.
निसर्गाच्या सहवासात त्यांचे प्रेम फुलते. पंडितांची प्रेमभावना व्यापक आहे. ती व्यक्तिपुरती मर्यादित नाही. ती निसर्ग, समाज, देश या सार्यांना स्पर्शून जाते.
पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈