सौ.मनिषा विजय चव्हाण
अल्प स्वपरिचय
मी सौ.मनिषा विजय चव्हाण फार्मासिस्ट म्हणून मेडिकल मध्ये रूजू आहे. वाचनाची आवड आहे,पुस्तके वाचून अभिप्राय लिहिते. कविता लिहिते.
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘अस्तित्व’ – सुश्री सुधा मूर्ती – अनुवाद – प्रा ए आर यार्दी ☆ संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण ☆
पुस्तक – अस्तित्व
लेखिका – सुश्री सुधा मूर्ती
अनुवाद – प्रा ए आर यार्दी
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
पृष्ठसंख्या – १०४ पाने
पुस्तकाचे मूल्य – ११0 रुपये
संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण
मुकेश उर्फ मुन्ना याच्या जिवनपटावर आधारीत कादंबरी ‘अस्तित्व’.स्वतःचे अस्तित्व किती महत्वाचे आहे.अस्तित्व असणे ,ते जपणे म्हणजे जणू लढाईच.स्वतःचे अस्तित्व हरविलेल्या माणसाची अवस्था अतिशय दयनीय होते .
हिच गोष्ट आपणास ‘अस्तित्व’ कादंबरी वाचल्यावर कळते.
मुन्नाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो.
मग माझी आई कोण?तिने मला का टाकले? तिच्यावर अशी कोणती वेळ आली कि तिने मला दुस-याच्या स्वाधीन केले? हे शोधण्यासाठीचा त्याचा प्रवास,त्याने केलेला संपत्तीचा त्याग.आईवडिलांवरील त्याची श्रद्धा,प्रेम,त्याच्या स्वभावातील खरेपणा.सत्य स्विकारण्याची त्याची मानसिकता.सर्व काही ह्रदयाला भिडते.
स्त्रीचे परमपावन स्वरूप म्हणजे ‘आई’.
त्या आईची तीन रूपे यात अनुभवायला मिळतात.
जन्म देणारी आई, दूध पाजणारी आई.
पाळणारी, घडवणारी,संस्कारक्षम पूर्ण माणूस बनवणारी आई.
महान अश्या थोर मनाच्या माता यात दिसतात.दोघीही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत.दिला शब्द पाळताना,वचन निभावताना,सगळ्या गोष्टींसाठी झगडताना
करावा लागलेला त्याग, मनाचा मोठेपणा, विश्वास दिसून येतो.
आणखी एक म्हणजे जन्म कोणत्याही कुळात,गोत्रात ,देशात होऊ देत.माणूस घडतो तो फक्त आणि फक्त त्याच्यावर केल्या गेलेल्या योग्य संस्कारांमुळे हे या कादंबरी मध्ये प्रकर्षाने जाणवते.
रावसाहेबांच्या रूपात एक सच्चा दिलदार माणूस,खरेपणा जपणारा प्रेमळ बाप दिसतो.रक्ताचा नसताना,पोटी जन्म न झालेला, ज्याला आपला मानला तो आपलाच.तसेच अतिशय व्यवहारकुशल माणूस.
आपण म्हणतो भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका पण इथे भावनेला प्राधान्य देऊनच रावसाहेबांनी संपत्तीचे वाटे केले.ही संपत्ती माझी नसून मी याचा मालक नाही.ही सारी संपत्ती मुन्नाची आहे,तोच या सा-या संपत्तीचा एकमेव मालक आहे.ही त्यांची भावना,हा विचार उद्दात्त आहे.सत्यप्रिय,निष्ठावान,असेच त्यांचे व्यक्तित्व आहे.
संपत्तीचा मोहन बाळगता ती स्वतःहून दुस-याच्या स्वाधीन करणारा त्यांचा मुलगा मुकेश उर्फ मुन्ना पाळलेला नसून त्यांचा सख्खा मुलगाच शोभतो ना?
यापेक्षा नात्यातील गोडवा अजून काय असू शकतो?
आजच्या काळात अश्या संस्कारांची अतिशय गरज आहे अतिशय सोप्या भाषेत मांडणी…
वाचताना भावनाविवश व्हायला होते….
खूपच सुंदर आणि वाचनिय…
खरचं सगळ्यांनी वाचायला हवेच….
संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण
सांगली, मो. नंबर….9767090659
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈