सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “सीतायन – विद्रोह आणि वेदनेचे रसायन” – डॉ. तारा भवाळकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सीतायन

डॉ. तारा भवाळकर

मनोविकास प्रकाशन

पृष्ठे – 188,  मूल्य- २५०रु.

नुकतेच डॉ. तारा भावाळकर लिखित ‘सीतायन’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले.  लहानपणापासूनच सीतेच्या व्यक्तिमत्वाने लेखिकेच्या मनाचा ठाव घेतला.  आणि त्यांच्या मनात सजले ते सीतयन रामायण नव्हे. त्या लिहितात, ‘रामाविषयी,त्याच्या त्यागाविषयी, मातृ-पितृ- गुरू भ्क्तीविषयी, शौर्य- धैर्याविषयी लोकमानसात विलक्षण कौतुक, आदर आहे. पण त्याच वेळी सीतेविषयी विलक्षण सहानुभूती,, कळवळा, आदर, गरोदरपणी तिचा त्याग करणार्‍या रामाविषयी निषेध, अनादर, धि:कार दिसून येतो. ‘ विशेषत: स्त्रियांच्या लोकगीतात ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी म्हंटलय,

राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा

हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा 

रामायण ‘ हे भारतीय परंपरेतील अत्यंत प्रभावी असे मिथक (पुराणकथा) आहे. ही कथा अभिजनांच्या ग्रंथातून प्रवाहित होत आपल्यापर्यंत आली. तशीच मौखिक अशा लोकपरंपरेतूनही प्रवाहित झाली. लोक परंपरेतील विविध  रामायणांचा, विविध भाषी रामायणांचा अभ्यास करून तारा भावाळकर यांनी ‘सीतयन’ हे पुस्तक सिद्ध केले. त्या लिहितात,’ गाव-गाड्यातील कामकरी- कष्टकरी स्त्रियांनी आपले कष्टाची कामे करताना सीतेविषयी भरभरून लिहिलय. सीतेशी या भूमीकन्यांचं आतड्याचं नातं असावं, अशा जिव्हाळ्याने त्यांनी सीतेबद्दल लिहिलय. त्या दळण-कांडण करणार्‍या कृषिकन्या सीतेमध्ये आपलं रूप बघतात. त्यांच्या ओव्यातून तीन तीन सासवा तिला सासुरवास करतात. तिला मोडक्या झाडूने अंगण झाडावं लागतं. ती वैतागते.  तेव्हा सासू आणि चंगू नणंद रामाला चुगली करतात आणि राम सीतेकडून कधी रागावणार नाही, अशी शपथ घेतो.’ असा सगळा भाग त्यांच्या ओव्यातून येतो.  

डॉ. तारा भवाळकर

सीता सुंदर, आज्ञाधारक सून आहे. मुलगी आहे.  ती जेजूरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाते. अंकुशासाठी नवस बोलते. रामरायाची राणी असल्याने सुपाने सोनेही वाटते. वनवासात असताना ती सामान्य बाईसारखी ‘वल्ल्या धोतराचा पिळा खांद्यावर टाकून येते. रामाला पडसे –खोकला झाला, तर काढा देते. त्याचा घाम लुगड्याच्या घोळाने पुसते. अशा अनेक रमणीय सहजीवनाची चित्रे स्त्रियांनी आपल्या ओव्यातून रंगवली आहेत. या कष्टकरी बायकांनी सीतेत आपले रूप बघितले आहे.

सीतेचा सासुरवास भारतीय स्त्रीचं भागधेय म्हणून भारतभर चित्रित झालं आहे. समस्त भारतीय स्त्रीमनाने, सीतेमधे स्वत:ला अनुभवलं आहे. आहे. जणू सीतेने स्त्रियांना वेदनेचं वाण वाटलं आहे. सीतेला केसोकेसी झालेला सासुरवास तिने देशोदेशींच्या सयांना वाटला. तिला बहु बहु झालेला सासुरवास तिने गहू गहू सार्‍यांच्यात वाटला. सीतेला डोंगराएवढे झालेले दु:ख पाहिल्यावर बायकांना आपलं दु:ख, आपली उपेक्षा हलकी वाटते.

लोकमानसाने  जुन्या परांपरिक कथेचं जतन तर केलंच, पण त्यात आपल्या अनुभवाची, कल्पनेची नवी भर घातली. त्यांचं जीवन सीतेच्या मूळ कथेशी एकजीव होत राहिलं. इथे स्थल-काळाचा विचार होत नाही. मूळ घटना आपल्या अंनुभवाशी जोडून घेत स्त्रियांनी ओव्या रचल्या आहेत. दुसर्‍या वनवासाच्या वेळी सीता बाळंतीण झाल्यानंतर बाळुती धुवायला, कोल्हापूरच्या रंकाळा तलावावर आल्याचे वर्णन स्त्री-गीतातून येते.

राम-सीतेच्या वनवासाच्या निमित्ताने भारतभर विविध भागात अनेक दंतकथांचा पसारा निर्माण झाला आहे. अशा काही दंतकथा यात दिल्या आहेत. रामाच्या संसारात सीता दु:खी आहे. तिला अश्रू ढाळण्याशिवाय गत्यंतर नाही. ‘त्या अश्रूंनी डोंगरी पडला झरा’ किंवा ‘ डोंगरी झाली विहीर’ असं वर्णन येतं.

साताराजवळच्या कोरेगावजवळच्या डोंगरावर दर संक्रांतील केवळ बायकांची खास ‘सीतामाईची जत्रा’ भरते आणि तिथे, दिवसभर सीता वनवासाच्या ओव्या बायका गात असतात.  

लोकसाहित्यात सीता कुठे रावणाची मुलगी असल्याचा उल्लेख आला आहे, तर एका आदिवासी कोरकू गीतात सीता रावणावर भाळल्याचेही म्हंटले आहे.   

सीतेला रामाने पुन्हा वनात का पाठवले? आपल्या परिचित कथेपेक्षा लोकरामायणातील कथा वेगळं काही सांगते. इथे कैकयी रामाचे कान फुंकते, की सीतेच्या मनात अजून रावण आहे. ती कट कारस्थान रचते. सीतेला रावणाचे चित्र काढायचा आग्रह करते. सीता म्हणते, ‘मी फक्त त्याच्या डाव्या पायाचा अंगठा बघितला.’ कैकेयी तेवढाच काढायला सांगते. त्याच्या आधारे ती रावणाचे चित्र पूर्ण करते व सीतेने ते काढल्याचे सांगते. राम संतापतो आणि लक्ष्मणाला सीतेला वनात नेऊन वधायची आज्ञा करतो. ‘अंकुश पुराण’ या प्रकरणात, लेखिकेने विस्ताराने ही कथा मांडली आहे. तिला माहेरी पोचवतो, असं सांगून लक्ष्मण घेऊन जातो, पण तिला वेगळा रस्ता असल्याचे लक्षात येते.  ती म्हणते, माझ्या माहेरच्या वाटेवर दाट केळीचं बन आहे. या रस्त्यावर तर काटेरी बोरी-बाभळी आहेत.

सीताबाई म्हणे, नव्हं माहेराची वाट

तिथं केळीचं बन इथे वन आचाट

पुढे लक्ष्मण तिला वध करायला रामाने सांगितल्याचे सांगतो. सीता तयार होते. पण लक्ष्मण तिचा वध करत नाही. ती आटंग्या वनात राहू लागते. तिथे धाई धाई रडणार्‍या सीतेची, बोरी-बाभळी (बायका) समजूत घालतात. ‘वधायला नेली नार’ या चरणाने सुरू होणार्‍या अनेक ओव्या स्त्री-गीत सांभारात असल्याचे लेखिका सागते.

लोकमानसातील ‘रामायणात’ नव्हे ‘सीतायनात’ पुढे सीतेला वाल्मिकी ऋषी भेटत नाहीत, तर भेटतो, तातोबा, कुण्या गावातला जेष्ठ, समजूतदार, कनवाळू , वयस्क कारभारी. तातोबा ही खास लोकप्रतिभेची निर्मिती आहे, असं डॉ. तारा भावाळकर म्हणतात.

पुढे राम-लक्ष्मण, लावांकुश यांची भेट कशी होते? आपल्या परिचित कथेपेक्षा लोकपरंपरेतून आलेली कथा वेगळी आहे. इथे रामाचा राजसूय यज्ञ किंवा श्यामकर्णी घोडा नाही.

तातोबासाठी कमळे आणायला अंकुश तळ्यावर जातो. रामाचे शिपाई तिथे लक्ष्मणासह सहस्त्र कमळे न्यायला आलेले असतात. ते अंकुशाला चोर म्हणून पकडून ठेवतात. अंकुश आला नाही, म्हणून त्याला शोधत लव तिथे येतो. अंकुशाला सोडवतो. त्यांचे सैन्याशी युद्ध होते. मुलांचे युद्धकौशल्य पाहून राम विस्मित होतो. मुलांना धनुर्विद्या तातोबांनी शिकवलेली असते. मुलांना राम-लक्ष्मण, कुल- शील विचारतात.  मुले म्हणतात,

‘सीतामाई आमची माता लक्ष्मण आमचा काका

जनक आमचा आजा नाही पित्याची वळख

नाही पित्याची वळख ‘ असं म्हणणार्‍या, जात्यावर दळणार्‍या बायकांनी रामाशी केलेला तो विद्रोह आहे, असं लेखिकेला वाटतं.

पुढे नारद येतात. सगळा खुलासा करतात. मग राम रथात घालून लव- अंकुश, सीतेबरोबर आयोध्येकडे यायला निघतो.  लोकांच्यात उत्साह आहे.

‘समस्त नगरीचे लोक जानकीस भेटाया येती ‘. त्याच वेळी कैकयी पुढे येते. ती सीतेला विचारते,

कैकयी विचारते, सीतामाई सावळीला

 अंकुश रामाचा लहू कोणाचा आणीला.?’

लहू लव्हाळ्याचा केलेला सगळ्यांना माहीत आहे. सीता म्हणते,

‘सीता बोले आता काय सांगू सासूबाई । तुझ्या पोटामध्ये वाट दे ग धरणी आई’

कुठे हाच प्रश्न रामाने विचारला आहे. धारणी दुभंगली. तिने सीतेला पोटात घेतली. लक्ष्मणाला सीतेचे सत्व माहीत होते. तो संतापला. त्याने काकेयीचे सात पाट काढून, म्हणजे तिला विद्रूप करून रेड्यावर बसवून नगराबाहेर हाकलली. कपटी, कारस्थानी कैकेयीला शिक्षा देऊन अंकुश पुराण संपते. लोकसमूहात ते गाऊन दाखवलं जाई. त्याच्या कर्त्याबद्दलही लेखिकेने विस्ताराने लिहिले आहे. 

‘चित्रपट रामायण ‘ अशी दोन प्रकरणे यात आहेत. त्यात पहिले प्रकरण कन्नड आहे. दुसरे कन्नडच्या हिन्दी रूपांतरणाचे आहे. मूळ कन्नड लेखन हेळवणकट्टे गिरीअम्मा यांचे आहे. नाव वाचताना वाटलं होतं, एखाद्या चित्रपटाचे हे विवेचन असेल, पण वाचताना लक्षात आले, ते तसे नाही. चित्रपट म्हणजे चित्र. ते कुणाचे? तर रावणाचे. राम- सीता रावणावध करून अयोध्येला परतल्यावर, शूर्पणखा म्हणजे चंद्रनखी सीतेची बालमैत्रीण असल्याची बतावणी करत येते. सीतेशी गप्पा मारता मारता तिच्याकडून रावणाचे चित्र काढून घेते. सीतेच्या नकळत चित्रात डोळे चितारते आणि चित्र साजिवंत होते. पुढे रावण चित्राच्या चौकटीच्या बाहेर येतो. सीतेने चित्र काढले. म्हणजे रावण निर्माण केला, तेव्हा तो तिचा पुत्र झाला. राम मात्र पुन्हा रावणाशी युद्ध करायला तयार होतो. पिता-पुत्राचे युद्ध ही कल्पना सहन न होऊन  सीता घरणीच्या पोटात सामावते. असडे हे चित्रपट रामायण. रावणाचे चित्र सीतेने काढण्याची कल्पना, कन्नड, हिन्दी, बंगाली, इये. अनेक भाषातील रामकथांमधून आली आहे.

यापुढील प्रकरणात ‘च्ंद्रावती रामायण’ या बंगाली रामायणाच ऊहापोह केलेला आहे. मौखिक गीत-गायनाच्या प्रथेतून या रामायणाचे पिढ्या न् पिढ्या जतन झाले आहे. यात सांगितल्या गेलेल्या रामकथेचे संहितीकरण ‘चंद्रावती’ने केले, असे लेखिकेचे संशोधन आहे. ही संहिता पूर्णपणे लेखिकेला उपलब्ध झाली नाही. उपलब्ध संहितेचा श्री. जयंत सेनगुप्ता यांच्या सहाय्याने लेखिकेने मराठी अनुवाद केला आहे व तोही परिशिष्टमध्ये दिला आहे.  यात राम आणि सीता जन्माच्या अद्भूत कथा आहेत. रावणवध करून आल्यावर कैकेयीची मुलगी कुकवा सीतेच्या मागे लागते व रावणाचे चित्र काढ असा आग्रह धरते. सीता वारा घ्यायच्या ताडाच्या पंख्यावर रावणाचे चित्र काढते. परिश्रमाने तिला झोप येते. कुकवा तो पंखा सीतेच्या छातीवर ठेवते आणि रामाला चुगली करते की अजूनही सीतेच्या मनात रावणच आहे. राम संतापतो.  त्यापुढे संहिता उपलब्ध नाही. चंद्रावतीचे भाष्य आहे. ती म्हणते, ‘आग पेटवली कुकवाने आणि त्यात जळून जाणार आहेत राम, सीता आणि अयोध्या नगरीही. अयोध्येतील लक्ष्मी नष्ट होईल, जाळून जाईल.’ पुढे ती समारोपादाखल म्हणते, ‘आपली बुद्धी न चालवता दुसर्‍याचे ऐकून विश्वास ठेवणार्‍याचा असाच सर्वनाश होतो.’ अयोध्येच्या सर्वनाशाचे कारण खुद्द रामंच असल्याचे चंद्रावती सांगते.

बौद्धधर्मियांच्या जातक कथांपैकी रामायणाशी संबंधित दशरथ जातक आणि आदिवासींचे ‘सीतायन’ यांचाही परामर्श लेखिकेने पुस्तकात घेतला आहे..

तर असा विविध लोकांचा रामायण कथेकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन विषद करत त्या पार्श्वभूमीवर, सीतेकडे त्यांनी कसे बघितले, याची मांडणी या पुस्तकात केली आहे.                                                                                                                                                                                                                               भारतीय परंपरेने राम आणि सीता ही आदर्श दैवते मानली. त्यांच्याविषयी खूप काही नवीन माहिती या पुस्तकात मिळते. ती विचार करायलाही प्रवृत्त करते.

डॉ. तारा भवाळकरांनी अतिशय परिश्रमपूर्वक संशोधन करून हे पुस्तक सिद्ध केले आहे. हे महत्वपूर्ण पुस्तक तितक्याच नेटकेपणाने मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. चंद्र्मोहन कुलकर्णी यांचे अन्वर्थक आणि आकर्षक मुखपृष्ठ आहे. एकंदरीने ‘ सीतायन’ पुस्तकाचे मोल अनमोल आहे, असेच म्हणावे लागेल.

पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments