श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ बाल साहित्य – “कुछ समझे बच्चमजी ?” – लेखिका : सुश्री वर्षा चौगुले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक            कुछ समझे बच्चमजी ?  

लेखिका          वर्षा चौगुले

प्रकाशक        अक्षरदीप प्रकाशन

पृष्ठे                72

मूल्य             70/

वर्षा चौगुले यांचं  ‘ कुछ समझे बच्चमजी ‘ हे पुस्तक  नुकतंच  वाचनात आलं. पुस्तकाच्या नावावरूनच लक्षात येईल की हे पुस्तक  बालगोपालांसाठी आहे. वर्षा चौगुले यांनी विपुल बाल साहित्य  लिहिले आहे. तसेच बाल साहित्य चळवळीतही  त्या सक्रिय असतात.त्यामुळे मुलामुलींशी  संवाद साधणे त्यांना छान जमते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक !

जिज्ञासा हे बालमनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना सतत कसले ना कसले प्रश्न  पडलेले असतात. हे असंच का, ते तसंच का, असे प्रश्न  त्यांची पाठ सोडत नाहीत. शिवाय आपण  लहान असलो तरी आपण ‘तितके काही’ लहान नाही असा एक समज असतो. त्यामुळे ती सारखी स्वतःची तुलना  मोठ्यांबरोबर      करत असतात. त्यामुळे त्यांना काही सांगायला जावं तर पटेलच याची खात्री नसते. शिवाय त्यांच्या वयाचे असे काही खास प्रश्न किंवा समस्या असतात. काही सांगायला जावं तर फारच उपदेश करताहेत असं  वाटतं. काही सांगू नये म्हटलं तर त्यांच्या चुका कशा सुधारणार ? त्यांना चांगल्या सवयी कशा लावणार ? त्यामुळे  बालक आणि पालक या दोघांमध्ये सुसंवाद  कसा साधायचा हा एक प्रश्नच असतो. पण या  प्रश्नाचं  उत्तर  हे पुस्तक  वाचल्यावर  मिळतं. मुलांना समजून घेऊन, त्यांच्याच भाषेत, कधी गोड बोलून, कधी एखादी गोष्ट  सांगून, तर कधी एखादे उदाहरण  देऊन  त्यांना समजावून  सांगितले तर ते त्यांनाही पटते. मग त्यांच्या मनातील शंका आणि गैरसमज दूर होतात. हे सगळं पटवून देणारं हे पुस्तक !

मुलांना अभ्यासाचा कंटाळा तर येतोच. पण अन्य  काही वाचा म्हटलं तर तेही नको असतं. खाण्याच्या बाबतीत  आवडीनिवडी असतात. स्वच्छता, टापटीप, शिस्त  हे सगळे नावडते विषय. शिवाय मोठ्यांच्या गरजा, फॅशन्स  यावरही त्यांचं लक्ष असतं. पाठांतर  टाळणे, टीव्ही बघणे ,चांगलं  वाईट यातला फरक न कळणे,  यासारखेही प्रश्न  असतातच. ते सोडवायचे असतील तर त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, संवाद  साधला पाहिजे. तो कसा साधावा ते हे पुस्तक  वाचल्यानंतर  पालकांना समजू शकेल. तसेच मुलांच्या मनातील गैरसमज  हे पुस्तक  वाचल्यावर  नक्कीच  दूर होतील. अशाप्रकारे पालक व पाल्य असे दोघांनाही उपयुक्त असे हे पुस्तक  आहे. 

मुलांना समजावून सांगत असतानाच नकळतपणे संस्कार  होत असतात. संस्कारक्षम वयातील ‘बच्चमजी’ सहज समजू शकतील असे हे पुस्तक  त्यांनी अवश्य  वाचावे असे आहे. हातात छडी न घेता वर्षा चौगुले यांनी शिक्षिकेची भूमिका उत्तमपणे पार पाडली आहे.

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments