श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “प्रेरणादायी पुस्तके” – लेखक : श्री सुबोध जोशी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

सर्वसाधारणपणे आपण एका वेळेला एक पुस्तक  वाचतो. काही लोकांना वेगळ्या विषयांवरील दोन पुस्तके आलटून  पालटून  वाचायची सवय असते. पण एकाच वेळेला, एकाच पुस्तकात नऊ पुस्तकांचा खजिना सापडला तर ? ही किमया  केली आहे सांगलीचे प्रा.सुबोध अनंत जोशी यांनी.

श्री.सुबोध जोशी सरांचे ‘प्रेरणादायी  पुस्तके ‘ हे पुस्तक  नुकतेच प्रकाशित  झाले व वाचायलाही मिळाले. आयुष्याला प्रेरणा देणा-या व व्यक्तिमत्त्व  विकासाला चालना देणा-या नऊ पुस्तकांचा परिचय   या एकाच पुस्तकात करुन देण्यात आला आहे. एका लेखमालेच्या निमित्ताने लिहीलेले हे लेख आता पुस्तकाच्या स्वरुपात आपल्यासमोर आले आहेत. भारतीय लेखकांनी इंग्रजीत लिहीलेल्या नऊ पुस्तकांचे सविस्तर  विवेचन या पुस्तकात करण्यात  आले आहे. मुख्यतः प्रेरणा देणारी व वाड्मयीन  मूल्य असलेली पुस्तके यासाठी निवडण्यात आली आहेत. ही पुस्तके  व त्यांचे लेखक खालीलप्रमाणे.:— 

1   You Can Win…. शिव खेरा 

2   You Are Unique…. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम 

3   Smile Your Way To… Accomplishment and Bliss… कमरुद्दीन 

4   The Best Thing About…. You Is You…अनुपम खेर 

5 Count Your Chickens …  Before They Hatch… अरिंदम् चौधरी.

6 Secrets of Happiness… तनुश्री  पोडेर

7 “The Heads – We Win; ” The Tails – We Win”… कर्नल पी.पी.मराठे

8 Winners and Losers… उज्वल पाटणी

9 The Tao of Confidence… एरी प्रभाकर 

श्री.जोशी यांनी या नऊ पुस्तकांचा परिचय  करून दिला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर हे पुस्तकांचे परीक्षण नाही, तर पुस्तकाच्या सर्व  अंगोपांगांचे  रसग्रहण आहे. या पुस्तकांच्या परिचयाशिवाय  पुस्तकातील वाड्मयीन सौंदर्यही त्यांनी दाखवून दिले आहे.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य  म्हणजे लेखकाने आपल्या प्रस्तावनेत काही मुद्द्यांवर  चर्चा केली आहे. प्रेरणा किंवा प्रेरक शक्ती म्हणजे काय ? प्रेरणाविषयक सिद्धांत, फ्राईड यांचा जीवनप्रेरणा-मृत्यूप्रेरणा सिद्धांत, मॅस्लोने  यांची गरजांची क्रमवारी, अशा अनेक संकल्पनांचा उहापोह  प्रस्तावनेत केला असल्यामुळे, मूळ पुस्तकांतील विविध लेखकांचे विचार समजून घेण्यास मदत होईल  हे नक्कीच. उत्तम व्यक्तिमत्त्व  संपादन करून  परिपूर्तता गाठणे हे अंतिम ध्येय कसे गाठता येईल  याविषयी मार्गदर्शन  करणारी ही पुस्तके आहेत. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ आणि ‘भारतीय  परंपरेतील आत्मशोधन’ यातील साम्यही लेखकाने दाखवून दिले आहे. प्रेरणादायी पुस्तक म्हणजे यशाचा शाॅर्टकट नव्हे हे लक्षात ठेवून जो याचे वाचन करेल त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे सहज शक्य  होईल, असा विश्वास  लेखकाने शेवटी व्यक्त  केला आहे.

पुस्तकांचा परिचय  करुन देत असताना लेखकाने प्रत्येक  पुस्तकातील महत्वाचे मुद्दे वाचकासमोर ठेवले आहेत. त्यामुळे मूळ पुस्तकांतील मुद्देसूदपणा लक्षात  येतो. तसेच आपल्या मनातील अनेक संकल्पनांविषयी असलेला गोंधळ, गैरसमज  दूर होण्यास मदत होईल असे वाटते. त्यामुळे श्री.जोशी सरांच्या या पुस्तकाच्या वाचनानंतर  त्यांनी  सुचवलेली पुस्तके वाचणा-यालाच संपूर्ण  ‘फळ’ मिळेल, हे मात्र  नक्की.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य  त्याच्या निर्मितीत दडले आहे. प्रा.सुबोध जोशी यांनी जी लेखमाला लिहिली होती, ती कल्याण येथील प्रा.मुकुंद बापट यांच्या वाचनात आली व या मालिकेचे रुपांतर पुस्तकात  व्हावे असे त्यांना वाटले. प्रा.जोशी यांनी तशी परवानगी देताच या पुस्तकाचा जन्म  झाला. परंतु विशेष असे की श्री. बापट सरांनी प्रकाशन खर्च स्वतः केला व लेखक प्रा.जोशी यांनी कोणतेही मानधन घेतलेले नाही. हे पुस्तक खाजगी वितरणाद्वारे  जास्तीत  जास्त  लोकांपर्यंत  पोहोचावे व लोकांना जीवन घडवण्यासाठी प्रेरणा मिळावी या एकाच  हेतूने हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित केला आहे.

… हे सुद्धा प्रेरणादायीच नाही का ?

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments