?पुस्तकावर बोलू काही?

☆ “हाती ज्यांच्या शून्य होते” – लेखक : श्री अरुण शेवते ☆ परिचय – सौ. जस्मिन रमजान शेख ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : “हाती ज्यांच्या शून्य होते”

संपादकः  श्री अरुण शेवते

प्रकाशक : ऋतुरंग प्रकाशन,मुंबई

३५ वी  आवृत्ती : ऑगस्ट २०१७

पृष्ठः २३२

किंमतः २५०/-

शून्य म्हणजे काहीच नाही असेच आम्ही शाळेत शिकलो अन् आता शिकवतो. पण हे पुस्तक वाचल्यानंतर कळलं की शून्याला किती किंमत आहे, शून्य किती शक्तिवान आहे. ज्यांच्या हाती बाकी  उरलेली असते, ते त्या बाकीच्या बेरीज वजाबाकीतच अडकून पडतात. मात्र ज्यांच्या हाती शून्य असते ते नवे विश्व निर्माण करतात. अवघ्या विश्व निर्मितीची शक्ती या शून्यात आहे.

लेखकाच्या  मनोगतातील पहिले वाक्यच मेंदूला झिणझिण्या आणणारे आहे. कर्तृत्ववान माणसाच्या ऐश्वर्यामागे दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. खरंच यशाच्या शिड्या चढून वर गेलेली व्यक्ती आपण पाहतो, पण त्या शिड्यांच्या जुळवाजुळवीचे श्रम किती भयानक आणि कष्टप्रद असू शकतात याचा विचारच कोणी करत नाही. आणि विशेष म्हणजे त्यांच्या लखाखत्या यशापेक्षा तो श्रमाचा काळाकुट्ट अंधारच इतरांचे आयुष्य उजळवणारा ठरतो. या अंधारातील प्रकाश शोधण्याचं आणि ते सर्वांपुढे मांडण्याचं शब्दरुपी ,उत्तूंग असे कार्य लेखक, संपादक अरुण शेवते यांनी केलेले आहे.

या संग्रह पुस्तकात गदिमा,सुधीर फडके, ए.पी.जे.अब्दुल कलाम, यशवंतराव गडाख, लता मंगेशकर, महेमूद, कर्मवीर भाऊराव पाटील, एम.एफ.हुसेन, सुशीलकुमार शिंदे, निळू फुले, अशा आपल्या भारतातील, तर शेक्सपिअर, अब्राहम लिंकन, चार्ली चापलीन, स्टीव्ह जॉब्स, ग्रेटो गार्बो अशा अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कीर्तिमान व्यक्तींच्या आयुष्यातील गडद सावलीचे दर्शन आपल्याला घडवून आणलेले आहे.  एका एका हिऱ्याचे पैलू खुलवून दाखवले आहेत. 

मंधू मंगेश कर्णिक यांच्या ‘ नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होतो ‘ असे शिर्षक असलेल्या लेखामध्ये ए.  पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील बरेच बारकावे टिपलेले आहेत. त्यातील काही वाक्ये आणि त्यांचे अनुभव कलाम यांच्या प्रेमळ, संवेदनशील मनाचे रहस्य उलगडून समोर आणतात. ती वाक्ये म्हणजे        “प्रार्थना, उपासना सर्वत्र एकाच पवित्र भावनेने केली जाते “ हा महान मंत्र त्यांना श्री रामेश्वरम येथील शिवमंदिरातील घंटानादाने आणि नजीकच्या मशिदीतील आजान यांनी शिकवला. ‘ सर्व जगातील माणूस हा एकच आहे आणि त्याचे कल्याण साधण्यातच परमेश्वराची खरी उपासना आहे.’ त्यांच्या  पुढील आयुष्यातील यशाचे गमक इथे सापडते. 

श्यामला शिरोळकर लिखित ‘ ग्रँड इंडियन सर्कसचे सर्वेसर्वा विष्णुपंत छत्रे, यातून श्री छत्रे यांच्या आयुष्यातील अनेक घटना आपल्याला प्रेरकच ठरतात. ‘आपल्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडावे ‘ असे विचार लहानपणापासूनच विष्णूपंत यांच्या मनात थैमान घालत होते. त्यांच्या चाबुकस्वाराच्या नोकरीपासून ते ग्रँड सर्कसच्या उभारणीपर्यंत त्यांच्या जीवनात आलेले चढ उतार वाचताना प्रत्येक घटना डोळ्यासमोरून चित्रपटासारखी सरकत जाते. हातात काहीही नसताना हजारो लोकांपुढे विल्सन सर्कसच्या मॅनेजरसमोर  त्यांनी केलेली गर्जना त्यांनी एका वर्षात पूर्ण केली. त्यांचे धाडस, हुशारी आणि जिद्द वाचकाला बरंच काही शिकवून जाते.

तसेच  कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवणारे स्टीव्ह जॉब्ज,  पोस्टमास्तर असलेले पण पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले अब्राहम लिंकन, खाटीकखान्यात नोकरी करत, रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता जगविख्यात नाटककार बनलेले शेक्सपिअर,  कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी करत, घर व कुटुंब सांभाळत स्वतःच्या कलेवर जग जिंकणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर, गदिमा, गुलजार, एम.एफ. हुसेन, धीरुभाई अंबानी अशा अनेक दिग्गज लोकांच्या जीवनातील संघर्षाचे आणि त्यातून संपादन केलेल्या उत्तुंग यशाचे चित्रण या संपादकीय पुस्तकात वाचायला मिळते. या सर्वांच्या आयुष्यात एकच सामाईक गोष्ट होती ती म्हणजे शून्य ! त्यांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले. जगापुढे एक आदर्श ठेवला. 

शेवटी संपादकीय मनोगतात मा. अरुण शेवते म्हणतात, “ तुम्हीसुद्धा हाती शून्य असताना स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण करू शकता.” …..  हे वाक्य प्रत्येकाला आकाशात उंच भरारी घेण्याचे बळ देते. म्हणूनच हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे.

परिचय : सौ. जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments