सुश्री अरूणा मुल्हेरकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “काव्यरेणू” (कविता संग्रह) – कवयित्री : रेणुका मार्डीकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

कवयित्री- सौ रेणुका धनंजय मार्डीकर

प्रकाशक : पंचक्रोशी प्रकाशन, बारामती

कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर यांच्या ‘ काव्यरेणू ‘ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच  धुळे येथे झालेल्या शुभंकरोती साहित्य परिवाराच्या प्रथम राज्यस्तरीय संमेलनात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

एकूण बासष्ट कवितांचा हा संग्रह! यातील एकेक कविता जसजशी वाचत गेले तेव्हा मनात आले वा! काय अफाट प्रतिभा आहे ही!  पुस्तकाची शीर्षक कविता काव्यरेणू जी अगदी शेवट आहे तीच मी प्रथम वाचली आणि केवळ चार कडव्यात संपूर्ण पुस्तकात काय आहे ते समजल्यावर पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली.

या संग्रहात सगळेच आहे हो ! यात बालमन आहे, तारुण्य आहे, वार्धक्य आहे, मानवता आहे, लोभस निसर्ग आहे, अध्यात्म आहे. रेणुका ताई म्हणतात,

 शब्द शारदा अंतरी येऊन

 काव्य बहरले माझ्यामधले

 काव्यरेणू हे सर्वांसाठी

 ओंजळ भरुनी अखंड दिधले=

तर अशी ही काव्याने भरलेली ओंजळ आहे.

त्यांच्या निसर्ग कविता वाचताना  लक्षात येते की अधिकतर कविता पावसावरील आहेत.  त्यांच्या कवितातून पावसाची विविध रूपे पहावयास मिळतात.

ओल्या मातीचा सुगंध ही वर्षा ऋतूचे वर्णन करणारी कविता. ऋतू गाभुळला बाई. गाभूळला अतिशय समर्पक शब्द.  या एका शब्दाने मेघांनी भरून आलेले आभाळ आणि निसर्गाचे ओलेतेपण तात्काळ नजरेसमोर उभे राहते.  या ओळी पहा- 

                   वारा जाऊनी कानात

                   सांगे लता वल्लरींच्या

                   धूळ झटका रे सारी

                    आल्या सरी मिरगाच्या

चेतनगुणोक्ती अलंकारामुळे काव्य कसे जिवंत वाटते, निसर्ग टवटवीत दिसतो.

प्रभात समयी वरून येऊनी या कवितेत कवयित्रीने सुंदर पावसाच्या सकाळचे वर्णन केले आहे.

विरहाचा श्रावण ही कविता श्रावणातल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विरहाची व्यथा सांगते.

 आभास होतसे मजला

 मोगऱ्यात राणी दिसली

 तिज कवेत मी घेताना

 गंधाळून कळी ती हसली

…  किती सुंदर रूपक साधले आहे.

 शेतकऱ्याचे आणि पावसाचे फार जवळचे नाते काळजीची सल या कवितेत दिसून येते

 पाटाचं पाणी साऱ्या

 रानात फिरलं

 जोंधळ्याची रास लागून

 लक्ष्मी खेळलं

शेतकऱ्याच्या भाषेतील कविता असल्यामुळे अधिक जवळची वाटते.

ऋतू पावसाळी हे पावसावरील गीत आहे

 ऋतू पावसाळी धुंद धुंद झाला

 गिरी कंदरी ती फुले वनमाला

गीत असल्यामुळे लयबद्धता आली आहे

केळभ करतो सुंदर  नर्तन या पावसाच्या कवितेत छन छननन, दीड दा दीड दा,  थुई थुई या शब्दयोजनांनी पावसातील संगीत आणि नृत्य दृश्य झाले आहे.

सुगंधी झाल्या पहा पायवाटा ही पावसावरील कविता रेणुका ताईनी भुजंगप्रयात या वृत्तात लिहून त्यांनी छंद शास्त्राचाही अभ्यास केला आहे हे वाचकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

याव्यतिरिक्त .. त्या कोवळ्या सकाळी( सकाळचे वर्णन), ऋतुराज, वसंताचे वैभव वर्णन करणारी षडाक्षरी कविता, गुज सांगते ना झाड- वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारी अष्टाक्षरी कविता, वाट बाई वळणाची- गोव्याकडे जाणारा घाटातील वळणावळणाच्या रस्त्याचे ओवी अंगाने केलेले वर्णन, अशा अनेक निसर्गाच्या कवितांचा समावेश या पुस्तकात आहे.

रेणुकाताई त्यांच्या मनोगतात लिहितात की त्या निसर्गात आणि शेतीमातीत नेहमीच रमतात. निसर्ग पाहिला की त्यांना कविता स्फुरते. काव्यरेणूतील या निसर्गकविता वाचल्या की त्यांच्या मनोगतातील विधानाची सत्यता पटते.

कोणत्याही कवीचा प्रेम हा अगदी आवडीचा विषय नाही का? रेणुका ताईंच्या या संग्रहात प्रेम भावनेवर अनेक कविता आहेत. मग ते प्रेम प्रियकर~प्रेयसीचे असेल, पती-पत्नीचे असेल, वात्सल्य असेल, विरहातीलही प्रेमभावना असेल. या एकाच पुस्तकात सर्व भावना काव्यरूपात वाचताना मन आनंदून जाते.

 तुझी माझी रे जोडी ही शृंगार रसयुक्त प्रेम कविता! नवपरिणीतेचे मनोगत या कवितेत व्यक्त झाले आहे.

 सासरघरच्या उंबरठ्याशी नववधूच मी थरथरली

 मर्यादांचे कुंपण तरीही कळी पहा मोहरली.

…  या दोनच ओळीत एका नववधूची मानसिकता रेणुका ताई समर्थपणे दर्शवितात.

आणि शेवटी संसार परिपक्व होतो तेव्हा त्या लिहितात,

 फळ पिकल्यावर मधुर लागते

 तशीच आपली जोडी

 जीवन नौका तरुन जाईल

 अशीच त्यातील गोडी

.. .  शब्दयोजना कशी अगदी सहज आणि लयबद्ध आहे.

 चांदण्याच्या अंगणात

 चंद्र आणि चांदणीचा

 अनुराग गगनात

 चिंब ओलेत्या मनात या कवितेच्या या वरील ओळींतून कवयित्रीचे अनुरक्त मन व्यक्त होते.

नभी चांदवा येताना हे असेच एक प्रेम गीत!

 गोड गुलाबी चाहूल लागे नभी चांदवा येताना

 प्रीतीच्या त्या धुंद क्षणाला हळूच कवेत घेताना

….  ध्रुवपदच किती छान! हळुवार शब्दातून प्रीत भावना व्यक्त झाली आहे.

 चिंब चिंब जाहलो सख्या चांदण्यात या भिजताना

 सागर साक्षी होता तेव्हा श्वास नव्याने रुजताना

 कोजागिरीच्या चंद्रासंगे प्रेम गीत मग गाताना

 प्रीतीच्या त्या धुंद क्षणाला हळूच कवेत घेताना

…. हे शृंगारिक काव्य अगदी पुनवेच्या चंद्रासारखेच शितल आणि पवित्र वाटते. कुठेही उत्तान शृंगार नाही.

साथ तुझी देता मला या प्रेम कवितेतही कवीची लाडकी चंद्र,चांदणं, फुले ही खास प्रीती स्थानं आढळून येतात

 प्रीतीत मी मोहरलेली या प्रेम कवितेत रेणुका ताई म्हणतात,

 स्वर्ण आभा रवी किरणांची

  मुखचंद्रावर पडलेली

 गालावरची खळी सांगते

 प्रीतीत मी मोहरलेली

….  गुलाबी थंडीत प्रेमाला बहर येतो असे म्हणतात.

प्रेम रंगी रंगे थंडी ही अशीच एक प्रेम कविता .. अष्टाक्षरी या अक्षरछंदात लिहिलेली. शब्दयोजना किती समर्पक आहे पहा…

  थंडी गुलाबी गुलाबी

 इशारा केला ना गोड

 अनुराग रंगलेला

 सख्या साजणाची ओढ

स्त्री आणि तिला माहेरची आठवण येणार नाही, शक्य आहे? रेणुका ताईंच्या या संग्रहात मन गेले माहेरा ही माहेराची सय येणारी कविता.

 मन गेले ग माहेरा

 आमराई पिकलेली

 गंध आला आला आला

 मोहरून मीही गेली.

….  माहेरच्या वैभवाचा प्रत्येकच मुलीला अभिमान असतो. या कवितेत तो दिसून येतो.

भक्ती म्हटली की कवितेत प्रथम दिसतो तो कृष्ण. काव्यरेणूमध्येही गोकुळचा बासरीवाला आहे. भक्तीत तन्मय झालेल्या रेणुकाताईही कृष्णामध्ये एकरूप होतात. त्या म्हणतात,

 माझे मन धुंद होते

 सांजवेळी सायंकाळी

 अवचित वेणू वाजे

 वृंदावनी ये झळाळी

 क्षण पळभर एक

 कान्हामय सारे झाले

 एकरुप होऊन मी

 कृष्णा सवे पुन्हा आले

…. कधी मी बसावे अशा शांत वेळी ही कविता कृष्णभक्तीवरच आहे. सुमंदारमाला या वृत्तात ती

लिहिली आहे परंतु शब्दयोजना करताना कुठेही प्रयास पडल्यासारखे वाटत नाही. कंठ्यातील मोती सरसर सरकत जावेत तसे एक एक शब्द रेणुकाताईंच्या लेखणीतून उतरले आहेत.

राम लल्लाच्या चरणी घेऊया विश्राम हे भक्ती गीत त्यांनी लिहिले आहे.

पांडुरंगाच्या भेटीशिवाय भक्तीचे प्रदर्शन होणार नाही. आषाढीचा दिन या कवितेत पंढरपूरला जाणाऱ्या आणि जमलेल्या भक्तांची मनोवृत्ती रेणुकाताईनी चित्रित केली आहे.  त्या लिहितात,

 भगवी पताका फडके

 वारकरी मनात साठलं

 चिपळ्यांचा नाद बोले

 माऊली विठ्ठल भेटलं

 …. कविता वाचताना वाचकालाही कवयित्री पंढरपूरला घेऊन गेल्यासारखे वाटते.

रेणुका ताईंची आजीची पैठणी शांताबाईंच्या पैठणीची आठवण करून देते.

फडताळात एक गाठोडे आहे ..  त्याच्या तळाशी अगदी खाली  जिथे आहेत जुने कपडे कुंच्या  टोपी शेले शाली ..  त्यातच आहे जपून ठेवलेली एक पैठणी

पैठणीच्या घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले

 …. या शांताबाई शेळके यांच्या ओळी. आणि रेणुका ताई लिहितात,

 जुन्या काळ्यापेटीत वस्तू मौल्यवान

 आजीची पैठणी त्यात आनंदाचे दान

 आयुष्याचे सारे उन्हाळे पावसाळे

 पैठणीने पाहिले या सारे सुख सोहळे

 …. क्या बात है!

आयुष्याचा सातबारा – आयुष्यावरील फार सुरेख कविता. माणसाचा देह पंचमहाभूतांचा असतो यावर आधारित रेणुका ताई लिहितात,

चक्र अविरत चाले । ऊन वारा  माती पाणी

पंचतत्व संचारात । शरीराची ही कहाणी

जन्म आणि मृत्यू मध्ये । असे पोकळ गाभारा

त्यात असतो राखीव । आयुष्याचा सातबारा

…  किती प्रगल्भता आहे या विचारात!

माणसाकडे सर्व गोष्टी असूनही त्यात समाधान नसल्यामुळे तो कसा उपाशी सैरभैर फिरत राहतो याचे सार्थ वर्णन तुझा रिकामा झुला या आध्यात्मिक कवितेत रेणुकाताईने केले आहे.  त्या लिहितात,

अंतरात तो तुझ्याच आहे,  परि न दिसला तुला

सैरभैर हे मन फिरणारे,  तुझा रिकामा झुला

आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणाऱ्या रेणुकाताई त्यांच्या माय मराठीची कथा या अष्टाक्षरीत जात्यावरच्या ओव्या, अभंग, भारुड, लावणी, बखर, लोकगीते, कथा, कादंबऱ्या या सर्वच साहित्याने आपली मराठी भाषा कशी नटली आहे याचे वर्णन करतात.

आली दिवाळी माझ्या घरात, राखी पौर्णिमा नभांगणी, वसुबारस, चैत्रगौर अशा हिंदूंच्या पारंपारिक सणांविषयीच्याही कविता आहेत.

सर्वच बासष्ट कवितांचा परामर्श घेणे शक्य नाही, परंतु पूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर रेणुकाताईंचा अभ्यास, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, सकारात्मक मनोवृत्ती, आणि अत्यंत संवेदनशील मन  याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. त्या त्यांच्या मनोगतात म्हणतात ” कविता अंतरातून येते, ती तयार होत नाही.” काव्यरेणूतील सर्वच कविता अशा अंतरातून आलेल्या आहेत, म्हणूनच त्या वाचकांच्या थेट अंतकरणाला भिडतात.

त्यांच्या लेखनातील वैशिष्ट्य म्हणजे, कविता वृत्तबद्ध असो वा नसो, प्रत्येकच कवितेत लय साधली आहे, जी कोणत्याही पद्यप्रकारासाठी आवश्यक आहे.

रेणुकाताई एक प्रतिभाशाली कवयित्री आहेतच पण त्याचबरोबर त्या एक उत्तम चित्रकार आहेत. काव्यरेणू या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी स्वतः तयार केले आहे. त्यांनी काढलेल्या विविध रांगोळ्यांचा कोलाज करून मुखपृष्ठ तयार झाले आहे.  त्यांच्या या कलेला नक्कीच दाद दिली पाहिजे.

काव्यसंग्रह संपूर्ण वाचल्यावर माझी जी प्रतिक्रिया झाली तीच प्रतिक्रिया या पुस्तकाचे प्रस्तावना लेखक श्री विलास एकतारे यांचीसुद्धा झाली आहे, हे प्रस्तावना वाचल्यावर माझ्या तात्काळ लक्षात आले.

पुढील येणाऱ्या काळात सौ रेणुका धनंजय मार्डीकर  यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित होवोत आणि त्यांना भरभरून यश प्राप्त होवो या माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments