? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “फास्ट फूड” – लेखिका : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. लीला जोशी ☆ 

लेखिका : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक : शिवसृष्टी प्रकाशन

पहिली आवृत्ती : मधुश्री प्रकाशन तर्फे १९९८ (रु.९०/—)

तिसरी आवृत्ती :  १८ अक्टूबर २०१८

किंमत : रु. २४०/—

सौ. उज्ज्वला केळकर

साहित्याची अनेक दालनं आणि त्यात सहजपणे वावरणारे लेखकही अनेक, पण त्यातलं लेखनाच्या दृष्टीनं वावरायला अवघड दालन विनोदी लेखनाचं. सर्वच प्रकारच्या साहित्य निर्मितीला प्रज्ञा आणि प्रतिभेची जोड लागते हे अगदी खरं असलं तरी अस्सल विनोदी लेखनासाठी लागणारी प्रज्ञा आणि प्रतिभा काही वेगळीच. ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या फोटोग्राफीला कौशल्य आवश्यकच असलं तरी अजाण बालकाची नेमकी पोझ कॅमे-यात टिपायला लागणारं कौशल्य वेगळंच, तसंच विनोदी लेखनाचं आहे. त्यामुळेच अस्सल विनोदी लेखन करणा-या लेखकांची संख्या खूपच मर्यादित, त्यात विनोदी लेखिकांची संख्या तर जवळजवळ हाताच्या बोटांवर मोजण्याजोगी. अशा या मोजक्या लेखिकांमध्ये ‘फास्ट फूड’ मुळे आणखी एका लेखिकेची भर पडलीय ती सौ.उज्ज्वला केळकरांची.

सौ. उज्ज्वलाताईंनी अर्पणपत्रिकेच म्हटल्याप्रमाणे ‘जीवनातील गांभिर्याकडे हसत-खेळत बघण्याची दृष्टी’ ही गोष्ट विनोद निर्मितीसाठी अतिशय आवश्यक. अशी दृष्टी उज्ज्वलाताईंकडे आहे. तसंच या दृष्टीतून केलेल्या समाजाच्या, परिस्थितीच्या आणि व्यक्ती-व्यक्तीच्या निरीक्षणाचं प्रतिबिंब विनोदी कथेत उमटविण्याची ताकदही त्यांच्या प्रज्ञेत आणि प्रतिभेत निश्चितच आहे, हे त्यांच्या ‘फास्ट-फूड’ या पहिल्याच कथासंग्रहानं सिध्द केलंय.

‘विषयाची विविधता ही लेखिकांच्या लिखाणात क्वचित आढळणारी जमेची बाजू’ हे ‘फास्ट-फूड’ चं प्रमुख वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खुद्द ‘फास्ट-फूड’ या कथेत फास्ट-फूडच्या हव्यासाची घेतलेली फिरकी झक्कासच. पण कथेचा शेवटही निर्णायक. ‘शिक्षक-दीनाची’ ष्टोरी तर एकदम बेस्ट. अगदी कथेच्या शीर्षकातील दीर्घ ‘दीन’ पासूनच. कथा संपूर्णपणे ग्रामीण भाषेत लिहिताना लेखिका कुठेही अडखळलेली तर नाहीच, उलट लेखिकेला नित्य ग्रामीण भाषेत लेखन करण्याचा सराव असावा इतक्या सहजतेनं कथेनं ग्रामीण बाज टिकवून धरलाय. कथेत उभं केलेलं ग्रामीण वातावरणही हुबेहूब.

‘मीही लेखक आहे’ हे ठसविण्याची शर्यत लागल्यासारखं प्रचंड प्रमाणात निर्माण होणारं साहित्य, त्यातला व्यावसायिकपणा, त्यामुळे त्याच्या दर्जावर होणारा निकृष्ट परिणाम यावर हसत-हसवत प्रकाश टाकणारे, ‘साहित्याचे साचे’, तसंच ‘मी मंगलाष्टके करते’, ‘हातभर कविसंमेलनाची वावभर कहाणी’ यासारख्या अनेकांच्या अनुभूतीला प्रत्यक्ष उजाळा देणा-या कथा, विनोदी लेखनाचं गमक लेखिकेला नेमकं सापडलंय याची साक्ष देतात.

‘माझा नवरा, माझी पाहुणी’ ही कथा विनोदी धाटणीची असली तरी स्त्री-पुरुष मनाच्या आंदोलनांचं चित्र सहजपणे पुढे उभं करते. 

निवडणुका, वरसंशोधन, पाहुणे हे तसे परिचित विषय; पण ‘स्वर्लोकात इलेक्शन’, ‘वन्संसाठी वरसंशोधन’, ‘असे पाहुणे येती’ या कथा थोड्या वेगळ्या वाटेनं जाऊन आपला ठसा उमटवतात. प्रतिभेवीण काव्यलेखनाची हौस भागवून घेणा-या कवींची संख्या सध्या मोजण्या पलिकडची (आणि येणा-या उदंड कविता-पिकाची चव चाखण्यापलिकडची) अशा कवींचं प्रतिनिधित्त्व ‘फास्ट-फूड’ मधल्या शारदारमणांनी किती बेलामूल केलंय याचा प्रत्यय ‘शारदारमण गिनीज् बुकात’ आणि ‘शारदारमणांची सेटी’ वाचणा-यालाच कळेल.

संग्रहातल्या सर्व अकरा कथा वाचताना स्पष्ट जाणवणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक कथा लिहिण्यापूर्वी लेखिकेनं त्या कथाविषयाचा केलेला पूर्ण अभ्यास. या जमेच्या बाजूनं संग्रहाचा दर्जा उंचवायला नि:संशय मदत केलीय. त्यामुळेच ‘फास्ट-फूड’ केवळ विनोदाचं लेबल लावलेला संग्रह ठरत नाही. (एका कथेच्या शीर्षकासाठी कंसात लिहिलं होतं – विनोदी कथा. प्रत्यक्ष कथेत विनोद-कथा म्हणण्यासारखं काहीच नसल्यामुळे बहुधा लेखक अगर संपादकांनी अगोदरच हसवण्याची सोय केली असावी.) 

वाचकाला हसवत-हसवत अंतर्मुख करणं हे विनोदाचं बलस्थान. ‘फास्ट-फूड’ मधल्या कथा वाचताना या बलस्थानाचा प्रत्यय बहुतांश कथांमध्ये येतो. सध्या रोज नवनवीन पुस्तकं मोठ्या संख्येनं प्रकाशित होत असली, तरी खरा वाचनानंद देणा-या पुस्तकांची संख्या फारच मोजकी. म्हणूनच कथांमध्ये क्वचित आढळणारा परिचित कल्पनांचा वापर आणि एखाद्या कथेचं जरासं रेंगाळणं, हे अपवाद वगळल्यास एकूणच ‘फास्ट-फूड’ हा लेखिकेचा पहिलाच विनोदी-कथासंग्रह त्यांच्या लिखाणाबद्दलच्या वाचकांच्या अपेक्षा वाढवणारा आहे यात शंका नाही.

परिचय :- सौ. लीला जोशी

संपर्क – ‘गंधाली’ वारणाली रोड, विश्रामबाग, सांगली ४१६४१५

लेखिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 e-id – [email protected]

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments