सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “सरीवर सरी” – लेखिका अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक  : सरीवर सरी – (कविता संग्रह) 

कवयित्री : अरुणा मुल्हेरकर.

प्रकाशक : शाॅपीझेन ऑनलाईन अहमदाबाद

पृष्ठे : ८१

मूल्य : रु २६८/—

सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री. अरुणा मुल्हेरकर यांचा ‘ सरीवर सरी ‘  हा तिसरा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहात त्यांच्या एकूण ५१ कविता आहेत आणि या सर्व कवितांमधून त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले आहेत. यात प्रेम, निसर्ग, सामाजिक समस्या, अन्याय, भक्ती, नारी सन्मान, देशभक्ती,आध्यात्म अशा विविध विषयांवर त्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे काव्यरचना केलेल्या आहेत.

या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य असे आहे की यातील बहुतेक कविता या वृत्तबद्ध आहेत.मात्रावृत्त आणि अक्षरगण वृत्तांच्या चौकटीतील आहेत.   शिवाय यात अभंग, सुमित, गझल,बालगीत आणि इतर काही नाविन्यपूर्ण काव्यप्रकारांचाही समावेश आहे.  अशा विस्तारित काव्य क्षेत्रातला अरुणाताईंचा संचार मनाला थक्क करणारा आणि कौतुकास्पद  आहे.

अरुणाताई त्यांच्या मनोगतात म्हणतात की त्यांनी कोविडकाळात लेखन क्षेत्रात प्रवेश केला.म्हणजे अगदी  अलीकडच्याच काळात. मात्र त्यांचा सरीवर सरी हा काव्यसंग्रह वाचताना त्या नवोदित साहित्यिक आहेत यावर विश्वासच बसत नाही कारण इतकं त्यांचं काव्य परिपक्व आहे.

प्रतिभा, बहुश्रुतता आणि अभ्यास या तीन काव्य कारणांना काव्यशास्त्रात महत्त्व आहे आणि या तीनही संकल्पनांचा प्रभाव त्यांच्या कवितांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. 

या संग्रहातील त्यांची पहिलीच कविता देहात चांदणे फुलले वाचताना एक अत्यंत हळुवार, तरल भाव वाचकाच्या मनावर उतरतो. या शृंगार रसातल्या काव्यात त्या म्हणतात,

 तो स्पर्श रेशमी होता

 तनुलता कशी थरथरते 

झेलूनी मदनाचे बाण

 देहात चांदणे फुलते

खरं म्हणजे ही संपूर्ण कविता रसग्रहणात्मक आहे. प्रियकराच्या स्पर्शाने देहात चांदणे फुलते ही कल्पनाच किती रम्य आहे! सहज आणि कोमल शब्दांचा साज, रसगंधयुक्त, नादयुक्त आणि लयबद्ध आहे.

बंधनात मी या काव्यातल्या( वृत्त हरी भगिनी)

 बंधनात राहूनिया मी 

जीवन माझे अनुभविले

 वादळ वारे तुफान आले

 जीवन सुंदर जाणीयले

या ओळी जीवनावरचा सकारात्मक विचार अगदी सहजपणे मांडतात. शिवाय त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून झरणारे शब्द एक वेगळेच सौंदर्य घेऊनच कागदावर उतरतात याची वाचकाला प्रचिती येते.

आनंदकंद वृत्तातील आयुष्य हेच आहे ही गझल कसं जगावं याविषयी भाष्य करते.  यातलाच हा एक शेर..

 कमळात भृंग घेतो 

अडकून जो स्वतःला 

रस पान तोच करतो 

पाहून तू राहावे

यातलल्या प्रत्येक शेरातील खयालत आणि मिसरा  इतका सुंदर आहे की अगदी उत्स्फूर्तपणे या रचनेला दाद  दिली जाते.

सत्य ही कविता ही खूप लक्षवेधी आहे.

जीवन जगताना काही सत्यं नाकारता येत नाहीत. वृद्धत्व हे असेच एक सत्य. या कवितेत कवियत्रीचा आरशाशी झालेला संवाद खरोखरच मनाला भिडतो. आरसा जसं बाह्यरुप  दाखवतो तसंच मनातलं अंतरंग जाणून घेण्यासही प्रवृत्त करतो. आणि नेमका हाच विचार अरुणाताईंनी यात मांडलेला आहे.

 उघड मनाच्या कवाडाला

 स्वीकारून तू सत्याला

 जगत रहा क्षण आनंदाचे

 खुलविल तुझ्या रूपाला

आनंदाने जगणे म्हणजेच वृद्धत्वावर मात करणे आणि पर्यायाने बाह्य रूपाला खुलवणे. वा! किती सुरेख संदेश! शब्द थोडे पण आशय मोठा.

अरुणाताई प्रेमगीतात जितक्या रमतात तितक्याच ईश्वर भक्तीतही तल्लीन होतात.

एका अभंगात त्या म्हणतात,

 कृष्ण आहे मागे।

 कृष्ण आहे पुढे। 

कृष्ण चहुकडे। भगवंत।।

हा  अभंग वाचताना मला सहजच शांता शेळके यांच्या गीताची आठवण झाली. 

मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश

माझ्याकडे देव माझा 

पाहतो आहे. अरुणाताईंच्या या अभंगातही हाच भक्तीचा भाव आणि गोडवा जाणवतो.

हेलकावे ही काहीशी जात्यावरची ओवी वाटावी अशी कविता.

 दळताना कांडताना 

सय येते माहेराची

 झोके घेत मन माझे 

दारातल्या अंगणाची

एक हळवं माहेराची ओढ असलेलं स्त्री मन या काव्यातून जाणवतं.

कालगती हे एक सुंदर निसर्ग काव्य आहे. विविध ऋतूंचे सुरेख वर्णन यात आहे आणि कालचक्र महात्म्य यात कथीत केलेले आहे.

 वसंत येतो वसंत जातो

 ग्रीष्माची मग होते चढती

 ऋतु मागुनी  ऋतू हे सरती

 यास म्हणावे कालगती..

अरुणाताईंजवळ एक वैचारिक, सामाजिक मन आहे याची जाणीव त्यांच्या का? या कवितेत होते.

 वेलीवरच्या कळ्या कोवळ्या

 का हो आपण खुडता 

जन्मा आधी गर्भामध्ये 

कसे त्यांना कुस्करता

संपूर्ण कवितेत स्त्रीभृणहत्येवर अत्यंत कळकळीने आक्षेप घेतानाच त्यांनी नारी जन्माचा सन्मान केला आहे.

तो आणि ती या कवितेत पोवाडा आणि लावणी याची केलेली तुलना अतिशय मनोरंजक आहे.

लोक वाङ्मय, लोकसंगीत महाराष्ट्राची शान असे म्हणत त्यांनी मराठी साहित्यातल्या लोक भाषेला मानाचा मुजरा केला आहे.

सरीवर सरी या शीर्षक कवितेत त्यांनी लेखणी विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मन असते सैरावैरा 

त्यासी लेखणी आवरी

 शब्दफुलोरा फुलतो 

वर्षती सरींवर सरी 

सरीवर सरी हे शीर्षक वाचल्यावर सहज वाटते की ही पाऊस कविता असेल पण अरुणाताईंनी खुबीदारपणे या शब्दरचनेला कलाटणी देऊन शब्द फुलंच्या सरी लेखणीतून कशा वर्षाव करतात ते अगदी मार्मिकपणे सांगितले आहे.

खरं म्हणजे या काव्यसंग्रहातल्या सर्वच कविता अतिशय रसास्वाद देणाऱ्या आहेत.  या कवितांतून कवियत्री अरुणाताईंचे शब्द वैभव, शब्दप्रचुरता, आणि शब्दयोजना किती प्रभावी आहे ते जाणवते. काव्यरचनेतला कुठलाही शब्द ओढून ताणून आणल्याचे जाणवत नाही. शब्दालंकार आणि अर्थालंकाराची योजकता अत्यंत सहज आहे. त्यामुळे वाचक काव्य भावाशी आणि काव्यार्थाशी  अत्यंत सहजपणे जोडला जातो.

अरुणाताईंचा वृत्तबद्ध काव्याभास आश्चर्यजनक आहे. अगदी प्रथितयश, सुप्रसिद्ध, नावाजलेल्या अनेक कवींच्या काव्यपंक्तीत समाविष्ट होण्या इतक्या त्यांच्या वृत्तबद्ध कविता दर्जेदार आहेत. माझ्या या लिखिताचा इतर वाचकांनाही अनुभव येईलच.

त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये म्हणजे सुंदर, पारदर्शी, निर्मळ विचार, रसमयता,  नाद मधुरता आणि लयबद्धता.  त्या स्वतः संगीत विशारद असल्यामुळे सूर, ताल आणि लय यांच्याशी त्यांचं असलेलं नातं त्यांच्या कवितांतून  प्रामुख्याने जाणवतं. आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे ते त्यांचं संवेदनशील मन, हृदयातला ओलावा, घटनांकडे पाहण्याचा त्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र दृष्टिकोन आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच त्यांच्या सुंदर कविता. साहित्य आणि संगीत हातात हात घालून आले की कसा रोमांचकारी चमत्कार घडतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरुणाताईंच्या भारदस्त कविता.

सरीवर सरी या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अजित महाडकर यांची प्रस्तावना लाभली आहे हा एक दुग्ध शर्करायुक्त योगच म्हणावा.

जाता जाता एक,अगदी न राहवून नमूद करावेसे वाटते की वडिलांचा वारसा कन्या कशा रीतीने चालवू शकते. सुप्रसिद्ध साहित्यिक कै. ज.ना. ढगे यांचा साहित्यिक वारसा त्यांची  ही कन्या समर्थपणे चालवत आहे हे अभिमानाचे नाही का?

 अरुणाताई तुमचे खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढील साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments