श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “रसाळ गोष्टी”… लेखक : विश्वनाथ – अनुवाद : जुई जेऊरकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तकाचे नाव : रसाळ गोष्टी ( बाल-कथा संग्रह)
लेखक : विश्वनाथ
अनुवाद : जुई जेऊरकर
९८५०६२२८८६
प्रकाशक : अक्षरशिल्प प्रकाशन
पाने : ३४
मूल्य : रु. १२५\~
जुई जेऊरकर. इयत्ता पाचवी…..
काय करायचं असतं या वयात ? शाळेचा अभ्यास, एखादा क्लास, खेळणे, बागडणे आणि टी. व्ही. किंवा मोबाईल पाहणे. बरोबर ना ? पण काहीं मुलांचं असं नसतं. ती मुलं थोड्या वेगळ्या वाटेनं जाणारी असतात. हीच वाट कायम धरली तर ती त्यांना खूप दूर घेऊन जाते आणि ध्येयाचे शिखरही काबीज करते. जुई ही अशी वेगळ्या वाटेने जाणारी. पाचवीची परीक्षा झाली. वाचनाची आवड असल्यामुळे ‘ रसीली कहानियाॅ ‘ हा ‘ विश्वनाथ ‘ यांचा कथासंग्रह वाचायला घेतला. एक कथा वाचून झाल्यावर मराठीत अनुवाद करावासा वाटला व तो केला. (हा वारसा तिला वडिलांकडूनच मिळाला आहे. तिचे वडील श्री. बळवंत जेऊरकर हे साहित्य अकादमी सन्मानित हिंदी साहित्याचे अनुवादकार आहेत )वडिलांकडून शाबासकी व प्रोत्साहन मिळाले. मग काय, सर्वच कथांचा अनुवाद केला. पुस्तक काढायचे पण ठरले. पण आधी कृष्णेचा पूर आणि मग कोरोनाचे संकट यामुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले. नंतर मात्र पुन्हा नव्या उमेदीने मागे लागून काही महिन्यांपूर्वीच या अनुवादित कथांचा संग्रह प्रकाशित झाला आणि आपल्या हाती आला.. ‘ रसाळ गोष्टी ‘. कथासंग्रह.
या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत. सर्व कथा या बाल व कुमार गटातील मुलामुलींनी वाचाव्यात अशा आहेत. यात संस्कारही आहेत आणि मनोरंजनही आहे. विषयांची विविधताही आहे. यात खरेपणाचे फळ काय मिळते हे सांगणारी कथा आहे आणि विद्येचे महत्व पटवून देणारी कथाही आहे. मातृभक्ती आणि देशभक्ती, साधेपणा आणि श्रमप्रतिष्ठा, भूतदया, धर्मप्रेम, श्रद्धा, मित्रप्रेम अशा विविध विषयांबरोबरच कंजूषपणातून घडणारा विनोद सांगणारी कथाही आहे. अत्यंत साध्या शब्दांचा वापर केल्यामुळे कुठेही अनुवादातील कृत्रिमपणा जाणवत नाही. मुलांना आवडतील अशा कथा मुलांच्या हाती देऊन प्रस्तावनेत ज्येष्ठ साहित्यिक श्री. दयासागर बन्ने यांनी म्हटल्याप्रमाणे जुईने लावलेली शब्दवेल आणखीनच बहरत जाईल यात शंकाच नाही. सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनीही तिची पाठ थोपटली आहे.
आकर्षक मुखपृष्ठ, सौम्य रंगसंगती, बोलकी चित्रे, मऊ मुलायम कागद अशा सर्व अलंकारांनी सजलेला हा बाल कथा संग्रह अनुवादित बाल साहित्यातील लक्षणीय टप्पा ठरेल हे नक्कीच. शिवाय फ्लीपकार्ट, ॲमेझाॅन वर पुस्तक उपलब्ध करून जुईने ऑनलाईन जगातही प्रवेश केला आहे.
येणारी सुट्टी ‘एंजॉय’ करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना ‘गिफ्ट’ म्हणून आवर्जून द्यावे असे हे पुस्तक आहे.
जुईच्या या पहिल्या प्रयत्नानंतर तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈