पुस्तकावर बोलू काही
☆ “एक भाकर तीन चुली“ – देवा झिंझाड ☆ परिचय – डाॅ.स्वाती पाटील ☆
पुस्तक – एक भाकर तीन चुली
लेखक – देवा झिंझाड
प्रकाशन – न्यु इरा पब्लिशिंग हाउस
पृष्ठसंख्या – ४२४
किंमत – रु. ४२६/-
…अगदीच दोन दिवसापूर्वी वाचून पूर्ण केलेली,देवा झिंजाड लिखित कादंबरी ‘एक भाकर तीन चुली.
‘दोन दिवस झालेले आहेत वाचून, तरीसुद्धा डोक्यातून कादंबरीचा विषय जात नाही. अशा पद्धतीने अतिशय हृदयाला, मनाला भिडलेली, हृदयस्पर्शी कादंबरी म्हणून याचं वर्णन करता येईल .श्री देवा झिंजाड यांनी अतिशय संवेदनशीलतेने स्त्री मनाचा वेध घेऊन लिहलेली, प्रत्येक शब्द काळजातून आलेला,अशी ही भावस्पर्शी कादंबरी वाचताना एकही पान असं रहात नाही की जे वाचूनआपले डोळे होत नाहीत. म्हटलं तर हा साठ वर्षाचा कालखंड जो कुठलीही कल्पनाशक्ती न वापरता ,कोणतीही फँटसी, अवास्तवता न चितारता ,आपल्यापुढे सजीव उभा केलेला आहे .आपण कादंबरी वाचत नाही तर आपण एखादा सिनेमा किंवा एखादी वेब सिरीज पाहतो की काय अशा पद्धतीने ते सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. स्त्री कुठल्याही जातीतली, धर्मातली असू दे, कुठल्याही वर्गातली असू दे , तिच्या नशिबी रूढी ,परंपरा ,यांचा काच आणि फास लागलेला आहे. कोणतीही प्रथा असू दे, त्याचा शेवटचा बळी ही स्त्री च ठरलेली आहे . यामध्ये भावकी, गरिबी, व्यसन, पुरुषसत्ताक पद्धती या सगळ्यांचं वर्णन या कादंबरीत ठळक पद्धतीने केलेलं आहे आणि या सर्वाचा परिणाम हा सर्वात शेवटी स्त्रियांवरच झालेला आहे हे सुद्धा सत्य अधोरेखित केलेलं आहे.अर्थात हा सर्व सत्य भाग आहे आणि हे सर्व भोगलेल्या,जगलेल्या स्त्री ची ही कहाणी आहे . या स्त्रीबरोबर दहा ते पंधरा वर्ष हा कोंडमारा, घुसमट ,ही समाज व्यवस्था सहन केलेला तिचा मुलगा आहे. या मुलाने तिच्या पूर्व आयुष्याचा धांडोळा घेऊन ही कादंबरी लिहिली आहे जी पूर्णपणे वास्तवदर्शी आणि सत्य आहे .कादंबरीची नायिका ही जी ‘पारू ‘ आहे ती आपल्याला आपल्या आई मध्ये, मावशीमध्ये ,आजी मध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या गाव खेड्यामधल्या कुठल्या न कुठल्या स्त्रीमध्ये काही अंशी पाहायला मिळतेच. यामधला एकही प्रसंग असा नाही की जो वास्तवाशी कोणाच्याही मिळत जुळत नाही .टोकाची अवहेलना ,टोकाचा त्रास, अत्यंत घुसमट, आणि पारंपरिक समाज व्यवस्थेची बळी ठरलेली ही पारू आपल्याला काय शिकवते? ती शिकवते, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी संघर्षा करीत जगावं कसं? तिच्या संघर्षा पुढे आपल्यासारख्या अनेक स्त्रियांची दुःख अक्षरशः कणभर आहेत. इतकं दुःख तिच्या नशिबी आलेल आहे आणि ज्यामध्ये तिची काहीही चूक नाही .पुरुषसत्ताक मनुवादी समाज व्यवस्थेने घेतलेला हा स्त्रीचा बळी आहे .कादंबरीचं कथानक मी इथे सांगणार नाही, कारण कादंबरी मुळातच वाचली पाहिजे आणि ही कादंबरी नाहीच ही सत्यकथा आहे. फक्त एकच सांगते, की या कादंबरीने मला काय दिलं? या कादंबरी ने मला संघर्ष करायला शिकवतानाच
आजूबाजूच्या, तळागाळातल्या, सर्व स्तरातल्या, सर्व स्त्रियांकडे संवेदनशीलतेने पाहायला शिकवलं . प्रत्येक आयुष्यात आलेल्या स्त्रीने किती भोगल असेल ,किती सोसलं असेल याची किमान जाण तरी ठेवावी .आज मी शहरात राहते, अनेकजणी निमशहरात राहतात ,परंतु माझ्या पुष्कळ भगिनी या गावखेड्यामध्ये आहेत, पारू सारखं दुःख अनेकींच्या वाट्याला आलं असेल आणि याचा दोष कोणाला द्यायचा मनुवादी समाज रचनेला की स्त्रियांच स्त्रियांना त्रास देतात हे वाक्य खरं करणार्या स्त्री जातीला,की पुरुषसत्ताक,अहंकारी बुरसटलेल्या विचारसरणीला आणि समाज व्यवस्थेला .अगदी प्रत्येकाने विचार करावा अशी कथा आहे. या कादंबरीने आजच्या शहरीकरणामध्ये,सुद्धा बेस्ट सेलर हा किताब मिळवलेला आहे .तीन महिन्यांमध्ये चौथी आवृत्ती संपत आलेली आहे आणि आत्तापर्यंत 26 पुरस्कार या कादंबरीला मिळालेले आहेत. एफबी वर इन्स्टा वर वेगवेगळ्या संमेलनामध्ये कादंबरीचा उदो उदो होत आहे .खूप लोक बोलत आहेत ,वाचत आहेत आणि चर्चा करत आहेत. हेच या कादंबरीचे यश आहे. ‘देवा झिंजाड ‘या मनाने स्त्रीवादी असलेल्या लेखकाने अतिशय समर्थपणे हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचवल आहे, काळजापासून पोचवलेल आहे. काळजातले शब्द आहेत, कुठल्याही अलंकारिक शब्दांचा उपयोग करण्याची गरजच पडलेली नाही. किंवा कुठल्याही कल्पनाशक्तीची भरारी मारण्याची गरज पडली नाही. जे जगलं, जे भोगलं ते सरळ सांगितलेल आहे पण ते इतकं काळजाला भिडतं , आणि असं असू शकतं का ?आणि हे अस का असाव ? असा प्रश्न पडतो.आणि हे उलथून टाकल पाहिजे ,अशा निश्चयाने आपल्या मुठी आवळल्या जातात हे या कादंबरीचं यश आहे. मराठी पुस्तकाला एवढी मागणी वाढते की तीन महिन्यांमध्ये चौथी आवृत्ती संपत येते हे या कादंबरीचे यश आहे . मराठी साहित्य विश्वामध्ये एका स्त्री मन समजून घेणाऱ्या,संवेदनशील लेखकाची भर पडली हे या कादंबरीचे यश आहे.
पुस्तक परिचय – डॉ.स्वाती पाटील
सांगली
मो. 9503628150
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈