श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “अंतर्नाद ” – (कविता संग्रह)- कवयित्री : सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : अंतर्नाद (कविता संग्रह)
कवयित्री : मंजुषा मुळे
पृष्ठे : १११
मूल्य : रु. १००/-
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.
परिचय : श्री सुहास रघुनाथ पंडित
सौ. मंजुषा सुनीत मुळे
सौ. मंजुषा मुळे यांचा ‘अंतर्नाद’ हा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह. त्याला श्री. प्रवीण दवणे यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीची प्रस्तावना. त्यातून कविता हा आवडीचा विषय. त्यामुळे हा कविता संग्रह वाचून काढणे अगदी स्वाभाविक होते. काही कविता वाचल्यावर लक्षात आले की हा संग्रह फक्त पाने उलटवण्यासाठी नाही, तर लक्षपूर्वक वाचण्यासाठी आहे. मग त्या दृष्टीने अभ्यासच सुरू झाला आणि आता खूप छान छान कविता वाचायला मिळाल्या याचा आनंद आहे. तो आनंद सर्वांना वाटावा म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न !
विषयांची कमालीची विविधता असलेल्या या काव्यसंग्रहाची सुरुवातच सौ. मंजुषा मुळे यांनी एका जीवनविषयक कवितेने केली आहे. शब्द, हास्य, अश्रू यातून जीवनाचा अर्थ शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. स्वतःला माणूस म्हणवून घेण्यासाठी शब्द कसे असावेत, हास्य कसे असावे हे सांगताना नात्यांचं नंदनवन फुलवता यावं अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.
जगातील स्वार्थीपणाचे अनुभव “ चंद्र “ या कवितेतून चंद्राकडूनच वदवून घेणे ही वेगळीच कल्पना फार भावते.
जगण्याच्या प्रवासात आपली साथ कधीही सोडत नाही ते म्हणजे आपलं मन. या मनाचं आणि घनाचं असलेलं अतूट नातं त्यांच्या ‘वळीव’ या कवितेतून त्यांनी सुंदरपणे विशद केलं आहे.. मनाची होणारी फसगत पाखराच्या रूपातून पहायला मिळते.
असं हे त्यांचं कविमन प्रेमरसात नाही भिजून गेलं तरच नवल ! ‘आतुर’ आणि ‘येई सखी’ यासारख्या प्रेमकविता लिहिताना त्यांची लेखणी मृदू होते. खरं प्रेम म्हणजे काय हे त्या ‘प्रेम’ या कवितेतून स्पष्ट करतात. निसर्गातील सुंदर प्रतिकांचा वापर कवितेचे सौन्दर्य वाढवतो. — ‘ नाही आडपडदे, नाही आडवळणं…. नितळ निर्मळ झऱ्यासारखं सतत झुळझुळत असतं…… ’ ही निखळ प्रेमाची व्याख्या फार बोलकी आहे.
तर प्रेमभंगाच्या दु:खात होरपळत असतांनाही ‘ आपल्या प्रीतीचे निर्माल्य झाले ‘ ही कल्पना प्रेमाचे पावित्र्य उच्च पातळीवर नेऊन ठेवते.
स्त्री सुलभ वात्सल्य भावना त्यांच्या ‘हुरहूर’ या कवितेतून दिसून येते. पिल्ले घरातून उडून गेल्यावर ‘ मनी दाटे हुरहूर | रीत वाटे ही उलटी | पिल्लू भरारे आकाशी | घार व्याकुळे घरटी ||’ ही एका आईची भावना मनाला भिडलीच पाहिजे अशी.
स्त्री जीवनाविषयी भाष्य करताना ‘जातकुळी’ या कवितेत त्यांनी आकाशातील चांदण्यांचा दाखला दिला आहे. आजूबाजूला माणसांचा, सख्यांचा गोतावळा असला तरी स्त्रीचे विश्व हे तिच्यापुरते, तिच्या कुटुंबापुरते मर्यादित असते. ‘आखला परीघ भवती, तितुकेच विश्व आम्हा’ अशी खंत त्या व्यक्त करतात. याचबरोबर ‘ मी कोण ‘ या स्वतःला पडलेल्या प्रश्नाचं अगदी मार्मिक उत्तरही त्यांनी अगदी सोप्पं करून टाकलेलं आहे.
‘पूजा’ ही कविता म्हणजे भक्तीचा नेमका मार्ग दाखवणारी कविता असेच म्हणावे लागेल. पंढरीच्या वारीचे वर्णन करणारी, भक्तांच्या मनातील भाव व्यक्त करणारी अशा दोन कविता त्यांनी लिहिल्या आहेत. परमेश्वर हा आपला सखा आहे, पुत्र आहे की भाऊराया आहे असा प्रश्न त्यांना पडतो. देवाकडे त्यांनी मागितलेले एक वेगळंच ‘ मागणं ‘ त्यांच्या वैचारिक वेगळेपणाचं द्योतक आहे.
त्यांच्या वैचारिक आणि चिंतनात्मक कवितांचा विचार केला तर अनेक कवितांचा उल्लेख करावा लागेल. या कविता गंभीर प्रकृतीच्या, विचार करायला लावणा-या असल्या, तरी भाषेची कोमलता, चपखल प्रतिकांचा वापर, कल्पना आणि काव्यात्मकता यामुळे बोजड वाटत नाहीत.
‘वास्तव’ या रुपकात्मक, लयबद्ध कवितेतून सध्या सर्वांच्याच आयुष्यात घडणारे वास्तव त्यांनी अतिशय उत्तम अशा उदाहरणांनी समजावून दिले आहे. गंध म्हणजे फुलाचे मूल. गंध फुलापासून दूर जातो. फूल तिथेच असते. गंध फुलाकडे म्हणजे स्वतःच्या घराकडे कधीच परतून येत नाही. फूल मात्र त्याच्यासाठी झुरत असते. कर्तृत्वाचे पंख लावून लांबवर उडणारी चिमणी पाखरं घराकडे परततच नाहीत, तेव्हा घरातील थकलेल्या त्या जीवांचे काय होत असेल हे सांगण्यासाठी यापेक्षा सुंदर दुसरे कोणते उदाहरण असेल?
माणसाची संपत्तीची हाव संपता संपत नाही. पण इथून जाताना काहीही घेऊन जाता येत नाही हे त्यांनी साध्या सोप्या शब्दात ‘हाव’ या कवितेतून सांगितले आहे. ‘भान ‘ या आणखी एका कवितेत त्यांनी दिलेला उपदेशात्मक संदेशही तितकाच मोलाचा आहे. ‘घरटे अपुले विसरू नको’ किंवा ‘मातीला परी विसरू नको’ यासारखी सुवचने त्या सहज लिहून जातात.
‘अंधाराला उजेडाचे कोंब फुटावे, तसे मातीच्या गर्भातून उजळू पहाणारे नवचैतन्याचे अंकूर ‘ ही ‘आषाढमेघ ‘ कवितेतील कवीकल्पना मनाला भावून तर जातेच, पण त्यांच्या आशावादी मनोवृत्तीवर प्रकाश टाकते. जगण्याचे चक्रव्यूह भेदत असताना आपल्या वाट्याला आपले स्वतःचे असे किती क्षण येतात?अशा वेगळेपणाच्या संजीवक क्षणांची कवयित्री वाट पहात असते. कारण हे ‘ क्षण ‘च वादळवा-यात तेवत राहण्याचे बळ देत असतात.
जगणं सुसह्य होण्यासाठी त्या वेळीच सावध करतात आणि जगताना स्वतःला कसं सावरलं पाहिजे हे ‘सावर रे’ या कवितेतून सांगून जातात. जगतानाची अलिप्तता ‘उमग’ या कवितेतून दिसून येते.
देवाच्या हातून घडलेल्या चुका दाखवण्याचे धाडसही त्यांनी ‘चूक’ या कवितेतून केले आहे.. चूक देवाची दाखवली असली तरी कविता माणसांविषयी, त्यांच्या गुणदोषांविषयीच आहे. ‘गती’ या कवितेतून त्यांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. ‘ संसाराच्या खोल सागरी, अलिप्त मन अन् मती ‘ यासारख्या अर्थपूर्ण काव्यपंक्ती यात वाचायला मिळतात. आयुष्याचे केलेले उत्तम परिक्षण त्यांच्या ‘श्वास’ या चिंतनात्मक कवितेतून वाचायला मिळते. ‘अश्रूं’वरील त्यांचे चिंतन हे खूपच वेगळे पण वैशिष्ट्यपूर्ण आहे……. एकूणच त्यांच्या चिंतनात्मक कविता वाचल्यावर त्या आयुष्याकडे किती गंभीरपणे आणि वेगवेगळ्या नजरेने पाहतात हे समजून येते. म्हणून तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी ‘आपली मती वापर ‘अशी कळकळीची विनंती त्या करतात.
कलावंताची आत्ममग्नता त्यांच्या ‘चांदणे’ या कवितेत अनुभवायला मिळते. जगाची पर्वा न करता स्वतःच्याच धुंदीत जगणारी कवयित्री या चांदण्यात चमकताना दिसते.
अशी आत्ममग्नता असली तरी वास्तवाचा स्वीकार करताना त्यांची लेखणी काहीशी उपरोधिक बनते. मनाला मनातून हद्दपार केल्याशिवाय जगणं शक्य होणार नाही याची जाणीव करून देऊन फाटलेलं आभाळ पेलायचं रहस्यही त्या सांगून जातात. ही ‘समज’ त्यांना अनुभवातून आणि आयुष्याच्या निरीक्षणातूनच आली आहे.
त्यांच्यातील वैचारिक गांभीर्यामुळे त्यांच्या हातून सामाजिक आशयाच्या अनेक कविता लिहून झाल्या आहेत. ‘गर्दी’ सारखी कविता आधुनिक समाजाचे दर्शन घडवते. ‘वृद्धाश्रम’ मधून त्यांनी वृद्धाश्रमाचे केलेले चित्रण आणि वृद्धांची मानसिक अवस्था लक्ष वेधून घेते. — “ अन्नासाठी जगणे की ही जगण्यासाठी पोटपूजा ? मरण येईना म्हणून जिते हे.. जगण्याला ना अर्थ दुजा “ हे शब्द मनाला फारच भिडतात.
’त्याने ‘ मांडलेल्या ‘ खेळा ‘ चे वर्णन करतांना जगातील उफराटा न्याय त्या सहज शब्दात दाखवून देतात. माणसाकडून चाललेल्या वसुंधरेवरील अन्यायाचे ‘कारण’ शोधण्याचा त्या प्रयत्न करतात. निसर्गातले दाखले देत देत त्या एकीकडे ढोंगीपणाचा निषेध करतात तर दुसरीकडे सकारात्मकतेतून ‘सुख’ शोधण्याचा मार्ग दाखवतात. ‘आमचा देश’ किंवा ‘जयजयकार’ या सारख्या कवितेतून भ्रष्टाचारग्रस्त समाजाचे चित्रण पहावयास मिळते. हे चित्र बदलून समानतेची, मानवतेला शोभेल अशी ‘दिवाळी’ यावी अशी अपेक्षा त्यांना आहे. स्वराज्यातून सुराज्याकडे जाण्यासाठी समाजाला त्या आवाहन करतात. ” मर्कट हाती कोलीत तैसा, स्वैराचारा जणू परवाना | दुर्दशेस या आम्हीच कारण, उठवू न शकतो निद्रिस्त मना ” हे त्यांचे शब्द फार अर्थपूर्ण आहेत.
‘कारागीर’ ही एक उत्तम रूपकात्मक कविता वाचायला मिळते. स्वतःला सर्वशक्तीमान समजणा-या मानवाची अवस्था काय झाली आहे हे आपण अनुभवतो आहोत. शेवटी शरणागती पत्करुन पश्चात्ताप करण्याची वेळ आलेलीच आहे. हेच अत्यंत प्रभावी शब्दात कवयित्रीने व्यक्त केले आहे. ‘राष्ट्र… पण कुणाचे?’ किंवा ‘साठी’ या सारख्या विडंबनात्मक कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. ‘ कळा ‘ या एकाच शब्दातून ध्वनित होणारे विविध अर्थ सांगतांना ‘ चंद्राच्या कला ‘ असा उल्लेख थोडा खटकतो.
याबरोबरच त्यांच्या निसर्गकविताही उल्लेखनीय आहेत. ‘सांजसकाळ’ या कवितेतून निसर्गात दररोज घडणा-या घटनांचे त्यांनी खूप वेगळ्या नजरेने पाहून नाट्यमय रितीने वर्णन केले आहे. पावसाच्या धारांमध्ये लपलेलं संगीत त्यांनी इतक्या सुंदर शब्दात ऐकवलंय की ही मैफिल संपूच नये असं वाटतं, पण ‘पाऊस’च ही मैफील संपवतो आणि आपण मात्र त्या श्रवणीय सूरांत हरवून जातो. लयबद्ध, गेय अशा भावगीताच्या वळणाने जाणारी ‘ साक्षात्कार ‘ कविता वाचतांना आपल्यालाही कृष्णसख्याचा साक्षात्कार घडून जातो. ‘ धुके ‘ ही कविता म्हणजे कल्पनाविलासाचा उत्तम नमुनाच आहे.
बालपणापासून मनाच्या कोप-यात लपून बसलेली कविता, संधी मिळताच डोके वर काढीत होती. शब्दांचा तो नाद मनाला ऐकू येत होता. मनातल्या भावना शब्दबद्ध करून सर्वांसमोर आणाव्यात असं वाटत होतं. या सा-याचं फलित म्हणजे ‘अंतर्नाद’ हा कविता संग्रह ! त्यांचा अंतर्नाद आता रसिक वाचकांच्या हृदयाला हात घालत आहे. आत्मचिंतन करून मुक्तपणे मांडलेले विचार, जीवनाविषयी दृष्टीकोन मांडतानाच निसर्गाशी असलेलं नातं जपणं, आस्तिकता जपतानाच सामाजिक जाणिवांचे भान असणं, जे जे वाईट आहे त्याची चीड येऊन त्याविषयी आपला संताप आक्रस्ताळेपणा न करता व्यक्त करणं, कधी उपहासाचे चिमटे काढणं तर कधी स्वप्नात रंगून जाणं…. अशा विविधांगांनी नटलेल्या कवितांचे दर्शन त्यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहात होते. त्यामुळे त्यांनी नकळतपणे रसिकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. त्यांच्या हातून अशाच कितीतरी उत्तमोत्तम रचनांची निर्मिती होत राहो या सदिच्छा.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈